मराठी लावणी
पिकलंय जांभूळ झाडाचं,,,
तुम्ही चाखून नका हो पाहू,
खुशाल पहा दुरून पाव्हनं
झाडाला हात नगा लावू
झाडं झुकलया फळाच्या वझ्यान खाली
याला लदबद काळी भोर जांभळं आली,
बघून राजसा ,असे हरखून नका हो जाऊ,,,,,,
खुशाल पहा दुरून पाव्हन,
झाडाला हात नगा लावू
रंग काळ्या भोर जांभळा चा घालतोया भुरळ
चव घ्यायाला जीभ करी वळवळ,
थोडं जिभेला आवरा हो राया,,,,
तोंडाला पाणी सुटू नका हो देऊ,,,,,
खुशाल पहा दुरून पाव्हन
झाडाला हात नगा लावू
चव काळ्याभोर जांभळाची आंबट गोड
चाखाया भेटतील जरा थांबा हो थोडं
असे खायाला अधीर नका होऊ,,,,,,,,
खुशाल पहा दुरून पाव्हन
झाडाला हात नगा लावू
या झाडाला हात नगा लावू,,,,
या झाडाला हात नगा ला,,,,,वू
लावणी उपवर झाले वयात आले
उपवर झाले वयात आले
शीळ घालती पोरं
ऐवज माझा जवानीचा ह्यो
लुटण्या आलेत चोरं
औंदा पूरं झालं माझं वरीस सोळा
बघून मला आजूबाजूला होती पोरं गोळा
किती जपू मी ,शिलास माझ्या लागून ऱ्हायला घोर
ऐवज माझा जवाणीचा ह्यो, लुटण्या आलेत चोरं
आजकाल वाढलाय माझा ज्यादाच ह्यो नखरा
कशी सावरू मी या उडत्या बेभान पाखरा
कवा कवा मनात माझ्या थय थय नाचे मोरं
*ऐवज माझा जवाणीचा ह्यो ,लुटण्या आलेत चोरं*
आली अंगा अंगास उभारी चांगली
जशी टपोऱ्या दाण्यांन कणसंच भरली
म्हणूनच भवती भिरभिर पिंगा घालती पाखरं
ऐवज माझा जवाणीचा ह्यो ,लुटण्या आलेत चोरं
उपवर झाले वयात आले,
शीळ घालती पोरं
ऐवज माझा जवानीचा ह्यो
लुटण्या आलेत चोरं
लावणी सोळा शिंगार
तुम्हासाठी सजते मी करते सोळा शृंगार
दिलबरा, तुम्हीच माझ्या दिलाचं सावकार
किती हौस मजला हो नटण्या मुरडण्याची
नाही सवड राया तुम्हाला मला हो बघण्याची
माझ्या ही मनाचा करा की थोडा विचार
दिलबरा तुम्हीच माझ्या दिलाचे सावकार
नेसले मी चंद्रकळा काळ्या ठिपक्यांची
त्यावर चोळी शोभे राया लाल रंगाची
चांदण्यात रुप माझं बघा कसं खुललया फार
दिलबरा तुम्हीच माझ्या दिलाचे सावकार
आज बघते मी वाट तुमची सख्या साजणा
थोडा वेळ काढून महाली लवकर या ना
कळ सोसवेना आता मला अधीर झाले फार
दिलबरा तुम्हीच माझ्या दिलाचे सावकार
लावणी कळ जवानीची
अंग अंग हे मुसमुसलं, अन दाटते चोळी
काय सांगू कळ ज्वानीची,
येते अशी अवेळी
नऊवारी माझी हाय हो राया लाखमोलाची
त्यावर चोळी घट्ट घातली
चम चम चांदण्याची
मनात नाचे मोर साजणा…. या सांज वेळी
काय सांगू कळ ज्वानीची,येते अशीअवेळी
अंग अंग हो माझं राया गेलं शहारून
ज्वाणीची कळ येते साजणा आज उफाळून
कशी आवरू तुम्हीच सांगा
कळ वेळोवेळी
काय सांगू कळ ज्वाणीची,
येते अशी अवेळी
तुम्ही दिसता समोर होई मनात घालमेल
किती दिस असा राया चालायचा खेळ
आज लवकर या तुमी सोडून रातरपाळी
काय सांगू कळ ज्वाणीची,
येते अशी अवेळी
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










Sundar