आई कविता




आई कविता
 
सरोगसी-आई कविता
आई कविता
 
आज बाळ बाहेर आले माझ्या गर्भातून
कुस उजवली माझी
अंधारलेल्या गर्भातून प्रकाशात आलेला जीव
माझ्या रक्तावर  पोसलेला
नाळेने माझ्यात गुंतलेला
महीनोन्महीने त्याच्या  ह्दयाची
स्पंदने ऐकलीत मी
आतल्याआत त्याचे स्पर्श अनुभवून
सुखात कित्येकदा भिजले
 तू कसा दिसत असणार
  मनोमन खूप कल्पना केलेल्या
 आज तू माझ्यातून बाहेर आल्याआल्या
  माझ्यापासून विलग केला गेलास
 मी कुस विकली होती नऊ महीन्यांसाठी
तुझी मालीश,जावळ्याचा स्पर्श …..
तुला न्हाऊ माखू घालणे….
सगळेच विकले कुशीसोबत.
काहीही नाही यातले
 शास्त्र किती पूढे गेले
पण आईच्या भावनांची आवर्तने
कशी थोपवणार?
तुला आठवून  फुटलेला पान्हा
कसा आटवणार?
नऊ महीने माझ्यात सामावलेल्या बाळा
आता कुठे दिसला तर मी ओळखेन का तुला?
मी तर फक्त तुझी स्पंदने ओळखते
 
प्रिती

 
माझी आई

नव्हतीच तिची साडी कधी
गर्भरेशमी की जरतारी
पण पदरात तिच्या होती
शिकवण जीवनाची सारी

होते गर्भात तिच्या, तेव्हाही
शिकविले असेल मजला
काही तंत्र दुःख सोसण्याचे
थोडी सुख शोधण्याची कला

जरी नव्हते शिक्षण पुरते
नाही काही अडलेच तिला
भूतदया की जीवनशास्त्र
होते ठाऊक सारेच तिला

बळ देऊन पंखांत माझ्या
दिले खुले आकाश आंदण
जीवन जरी वैशाख ताप
स्मृती तिच्या शीतल चांदणं

मेघना


घुंगरु

छम छम छम छम
घुंगराचे आवाज ऐकले कि
तुझे घुंगरु आठवतात
पोटातील भूकेसाठी
व्याकुळतेने वाजवलेले

छम छम छम छम
आवाजाने आजही
मन हादरते अन्
पोहचतो तुझ्या लावणीच्या दरबारी
मनात विचारांचे कल्लोळ घेऊन

तू कसे झेलले
असतील स्पर्श आसुसलेले
अन् नजरा वखवखलेल्या
माझ्या रडण्याचा आवाजही
पोहचला असेलच तुझ्यापर्यंत
तेव्हा तू कसा आवरला असेल
फुटलेला पान्हा

छम छम छम छम
आवाजाबरोबर मोठा होत गेलो
घुंगराबद्दल घृणा वाढत गेली
तू घुंगरु वाजवतेस म्हणून
आकस वाढला तुझ्याबद्दलही

पण आई मी
कितीही नाकारले आज
तरीही मनातून मी जाणतो
माझा बंगला,गाडी उभे आहेत
केवळ तेव्हा वाजणाऱ्या घुंगरामुळे
त्याच्या छम् छम् छम् आवाजामुळे…

प्रिती

माझी आई

मी जन्मले तेव्हा
तुझे माझे एक नाते
मी मुलगी तुझी
अन् आई तू माझी
तेव्हा पासून आतापर्यंत
तुझे जगणे माझ्या साठी
अन् माझे तुझ्यासाठी
मी तुझाच अंश तुझ्या सारखीच
शरीराने अन् मनानेही
आचाराने अन् विचारानेही
संस्काराने अन् कर्तुत्वानेही
मी जिंकल्याचा तुला आनंद
तुझा आनंद माझे बळ
पुढे पुढे जाण्याची तुझी प्रेरणा
माझे यश तुझी पुर्तता
दोघीही सफल… संपुर्ण..
अन् तुझे निघुन जाणे
जीवन माझे रिते होणे
ह्रदयाचा एक कप्पा
आठवणींनी भरलेला
कधी ओघळले ह्रदयातून
कधी डोळ्यातून धारा
मी शोधते तुला वेडी
आकाशीच्या त्या ता -यामध्ये
कधी ढगांच्या आकारामध्ये
या देहाच्या अंतापर्यंत
तुझे अस्तित्व माझ्यामध्ये… माझ्यामध्ये

—- निर्मला मेंढे—-

आईपण ही जन्मास येते तेव्हाच

.जन्मास येते बाळ
आणि आईपणही
जन्मास येते तेव्हाच
कधीही बिनधास्त
तासनतास झोपणारी ती
आता वारंवार झोपेतून
जागी होऊ लागते
सततच्या जागरणाने
डोळे लागतात चुरुचुरु
आणि
संयम शिकत जाते हळुहळु
बाळाच्या रडण्याने,
कमी जास्त झोपण्याने,
मन शंका कुशंकानी येते भरून
दूध पाजताना वात्सल्य
भरास येऊन
मन येऊ लागते उचंबळुन
स्वतः बद्दल अति सजग
असलेली ती
दिवसच्या दिवस
आरशात पाहत नाही कधी
आईपण निभावताना
जबाबदारीने,
चिडचिडते आणि
कुरकुरतेही कधी कधी
मात्र
मनाच्या नाजूक संभ्रमित
अवस्थेत सुद्धा
तिचे आईपण
होत जाते अधोरेखित
स्वछंद जीवन हळूहळू
विसरत जाताना
बाळ तिच्या आयुष्याचं
केंद्र बिंदु बनत जातं

सौ वीणा विश्वास चव्हाण

 
महती आईची

 

आई तुझी लीला

असेही महान
किती गुणगान

गाऊ तुझे,,,,

आईविना सारे

जग सुने सुने
असह्य जगणे

तुजविण,,,,

तुझे उपकार

कसे फेडू आई
थोरही पुण्याई

तुझी असे,,,,,

आईच्या मायेची

सर नसे कोठे
वात्सल्य ते भेटे

आईपाशी,,,,,

नको अनादर

आईचा कुठेही
मायमाऊलीही

ईशरुपी,,,,,

आई नाम आज

लिहिले प्रेमाने
होऊनिया दंग

मनातून,,,,

✍️सौ.पद्मजा जोशी
पुसद

माय

तु वेदनेच्या गर्तेत…….
कण्हणारे तुझे सूर अनाथ……
टिटवीच्या सुरात कोणी पेरले मृत्यूचे भय……..
अवकाश भंडावून सोडणाऱ्या तुझ्या बाळंत कळा……..
जवळ नाही कुणाचाही मायेचा उमाळा…….
तरीही माये तुझ्या नाजूक अस्तित्वाने तू लढलीस…………
तुझ माणूस पण गृहित न धरणाऱ्या
व्यवस्थेच्या हाती दिलास उद्याचा प्रकाश……
तुझ्या बाळंत कळांचा झंजावात ओसरताच……..
थापलिस भाकर पोसण्यास.. …पिढी…..
तुला कुठला ग माये आईच्या हातचा
ऊन ऊन …..शीरा
तरीही तू सर्वांसाठी आयुष्यभर येडी गबाळी…….छाया
माय तू रुजवणारी मृदा .गंध तुझा आकाशी……. गंध तुझा आकाशी…,.. ‌‌

सिंधु व्हटकर-सोनवणे.

खळगी पोटाची

आता कशी भरावी खळगी
बसली माय विवंचनेत
घेई लेकराले मांडीवर
मन भाबड लागेना कशात

आग धगधगे चुलीमधी
वाडगा रिता गेला जळून
पाही एकटक छताकडे
अश्रु ढाळीत मूग गिळून,,

सुने पांढरे कपाळ तिचे
असा कसा नशिबाचा फेरा
दाना पाण्याविना जगताना
रोजच उर कापे चराचरा

माय माऊली प्रेमळ ती
वात्सल्याने भारलेली
गरिबीत ही चालवी गाडा
पोट पाठीला भिडलेली

चुली सारखाच डोम्ब आगीचा
माय लेकराच्या पोटातही उठे
वाडग्यातल्या मुठभर शिताचा
चुलीवर दम घुटे,

कोमेजली लेकरही
उपाशी पोटी मांडीत
वाट पाहे भाजी भाकरीची
मिळून कवा जाईलं पोटात

कसं जगावं माऊलींन
दोन लेकरासवे आयुष्यात
थकून गेली माय माऊली
बसली डोळे लावून आकाशात

कशी करावी तडजोड
माऊलीने लेकरांसाठी
आणता येईल का हसू
कधीतरी चिमण्यांच्या ओठी

सौ.पद्मजा जोशी
पुसद,

 

 

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
 
Email
whatsapp no,
9867408400
 
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
 
 
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!