तोच चंद्रमा नभात
तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तुही कामीनी
भावगींताच्या ओळींप्रमाणे
नभातला रोज उगवणारा चंद्र ही तोच…
रात्रही तीच आहे
दोघांची ऐकमेकांस सोबत आहे…
माझ्या एकांतात माझ्या सोबत मात्र
तू कुठेच नाहीस
सागराची अविरत कानावर पडणारी गाज
उसळून किनाऱ्याकडे सख्याला भेटायला यावं
तशा बेफाम धावणा-या लाटा. रम्य एकांती रजनी अंबरात तिचा सखा रजनीकांत…
नजारा अगदीच मनात वादळ उठवीत होता
हृदयाच सुकाणू कसं तरी सावरत तारु किनाऱ्याकडे जाईल का? याचाच विचार करीत होते.
अंबरात रजनीकांताचे आगमन झाले.
शंशाक झाडामागुन डोकावून जणू मला चिडवत होता.
त्याला म्हटल अरे तु ही एकटा
मी सुध्दा एकटी विरहनी
पण तो तर तारकांसोबत विहरत होता.
माझा सखा कुठे या विरहात होता.
आठवांच धुकं हळूहळू गडद व्हायला
लागलं .धुक्याच्या पल्याड स्वप्न,
अल्याड एक जीतं जागतं अस्तित्व
कणाकणाने झुरणीला लागलं…
त्या लाटांसारख फेसाळत
किना-यावर आपटत होतं
पुनःश्च किनाऱ्याकडे आवेगाने जात होतं.
लाटांमध्ये व माझ्यामध्ये एकच साम्य
तिच अन माझं किना-याकडे येवून आपटणं
व परत अस्तित्वाच्या शोधात माघारी फिरण
नीरव शांततेत स्वत्वाचा शोध घ्यायचा
मनाशी पक्क केलं.
नकोच ते लाटांच्या तडाख्यात
स्वतःला झोकून देणे.
कातळावर आपटून रक्तबंबाळ होणे.
धुसर स्वप्नांच्या मागे धावत सुटणे,
ठेचकाळत पडणे व…
स्वतः च स्वतःला आधार देत उठणे.
रजनीकांत परतीच्या प्रवासास निघाला आहे. आपणही परतावे असे सतत वाटत आहे. अस्तित्वाच्या शोधात माझ्यात मला शोधायचयं माझा आधार व्हायचयं
एकदा मागे फिरुन बघायचं अनोळखी धूसर झालेल्या पाऊलखुणांवर माघारी फिरायचयं . स्वप्नवत भेडसावणा-या स्वप्नांना नकाच येवू सांगायचयं….
माझ्यातील मी कुठेतरी हरवले होते.
आधाराच्या कुबड्या कोणी देईल का
याची वाट पहात होते.
माझी जगण्याची धडपड
आधार हिरावून घेणारा गमतीने पहात होता. माझ्या चाचपडण्याचा आनंद घेत होता.
आयुष्यात मी काही करु शकणार
याची ग्वाही तो देत होता.
आता मनाशी निर्धार केला , मृगजळा पुढेही जाणार आहे दिसणारे मृगजळ भेदणार आहे.
धुसर झालेल्या वाटा मी शोधणार आहे.
रस्यावरची वळणे शिताफीने आक्रमणार आहे. एका नव्या दिशेकडे आता मी निघणार आहे.
माझं स्वत्व पणाला लावलयं मी जिंकणार आहे. आधाराच्या कुबड्यां शिवाय मी चालणार आहे..
माझ्या स्वप्नात आता एकटीच असणार आहे…
शीला रंगारी
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
सुदंर
मनःपूर्वक आभार