कागदाचा चिटोरा-लेख
तुषार ऑफिसमध्ये एका कंपनीला मेल करण्यात गर्क होता. काहीही करून आज त्याचा मेल कंपनीला मिळणे गरजेचे होते.
अचानक त्याला हुंदक्यांचा आवाज आला आणि अस्पष्ट रडणं ही ऐकू आलं . त्याने सभोवार नजर फिरवली. केबिनमध्ये तो एकटाच होता.
मग रडतोय कोण?
त्यानी केबिन बाहेर डोकावलं आणि पुन्हा खुर्चीवर बसला. हुंदक्यांचा आवाज येतच होता. आवाज कोपऱ्यातून येत होता. त्याचं सहज लक्ष गेलं, कोपऱ्यात एक कागदाचा चिटोरा पडलेला होता.
तुषार अवाक झाला.
त्याचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता .
होय , तो चिटोरा हमसून हमसून रडत होता.
तुषारने चिटोरा हातात घेतला आणि…..
काय आश्चर्य तो माणसासारखा बोलू लागला.
तू मला विसरला ना?
तुषार ला सुचेना काय बोलावे ? काय करावे?
तुझ्या किती लहानपणापासून मी तुझ्या सोबत आहे.
तुझा जन्म झाला आणि त्याचा दाखला म्हणून मी तुझ्या सोबत होतो. तुझ्या जन्माची बातमी घेऊन मीच (तार ) तुझ्या आजी कडे गेलो होतो.
बालपणीच्या भिंगऱ्या, विमान च्या रूपात मी तुझ्यासोबत खेळलो.
*आता तु विसरला ना?*
स्वतः भिजून मी तुला होडीचा आनंद दिला. इतकेच काय, तुझ्यासाठी पतंग होऊन कितीदा स्वतःला फाडून घेतलं. तुझ्या आनंदासाठी.
शाळेत जायचा तेव्हा नवीन नवीन पुस्तकांचा वास तुला आवडायचा. कितीदा तरी मी तुला पाहिले माझा वास घेताना.
*आता तू मला विसरला*
तुला माहिती आहे ? माझा जन्म कसा होतो ?
काय काय दिव्यातून जाऊन मी तुझ्या पर्यंत येतो.
लाकूड, बांबू , चिंध्या, गवत यांच्या लगद्याचे तंतू दाबून वाळवून मी तयार होतो.
माझ्या रंगीत पताकांनी तु 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला शाळा सुशोभित केली होती.
*आता तु मला विसरला ना?*
तु विसरला असशील, पण मला आठवते तू माझ्या मदतीनेच एकदा परीक्षेत कॉपी केली होती.
तुझ्या घामाघूम झालेल्या हातामुळे मी पण ओला झालो होतो.
तुझ्या पहिल्या वहिल्या प्रेमाच्या पहिल्या संदेशाचा मी साक्षीदार आहे.
*पण आता तु मला विसरला*
माझ्याच साक्षीने तुम्ही दोघे पती-पत्नी झालात.
तुझ्या प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणी मी साथ सोडली नाही.
वर्तमान पेपर वाचताना तुझ्या सोबत .
कादंबरी वाचताना तुझ्यासोबत.
तुझ्या पहिल्या पगाराची कोरी नोट म्हणून तु मला सतत जवळ बाळगायचा.
*आता तु मला विसरला*
एकविसावं शतक आलं . नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं. वृक्षतोड कमी व्हावी म्हणून माझा वापर कमी झाला. आणि तंत्रज्ञानाच्या मोहात, माहितीत , गरजेत तू हळूहळू मला विसरला .
पण माझ्या अंगावर तुझ्या बोटांचे ठसे मी कायम जपले.
वाऱ्याने केबिनचे दार वाजलं आणि तुषार भानावर आला. त्याच्या हातात कागदाचा तुकडा तसाच होता.
तुषारने खिशातून पाकीट काढलं, त्याच्या छोट्या कप्प्यात एक शंभर ची नोट घडी करून ठेवली होती.
आणि हसून म्हणाला….
*मी विसरलो नाही तुला*.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा











वाह
Ty
Khup chan lihiles 🌹🌹🌹
Thank you
सुदंर
सुंदर … लिहिले