मैत्रीपलीकडचं नातं -स्त्री-पुरुषाचं
By-माधुरी जोशी
मित्र-मैत्रिणीशिवाय जगता येत ?
कुणालाही विचारलं तरी उत्तर नाहीच येईल. तरीही या नात्याला समाजात फारसा सन्मान नाही . आमची
शेवटची पिढी ज्या पिढीने फ्रेंडशिप डे शिवाय मैत्री साजरी केली . थोडक्यात काय !मित्र म्हणजे आयुष्यातील अशी व्यक्ती जिला माहिती आहे कुठल्या परिस्थितीत हात घट्ट पकडायचा आणि कधी तो अलगद सोडायचा .
प्रत्येकाला बेस्ट फ्रेंड नावाचा आरसा हवा असतो . कायम खरं बोलणारा आरसा. आता तू सुंदर दिसतेस इतकंच न सांगता तू सुंदरच आहेस याची जाणीव करून देणारा तर कधी प्रतिक्रिया न देता फक्त ऐकून घेणारा , हसऱ्या चेहऱ्या मागचे दुःख जाणणारा ,
हक्काने सोबत करणारा आणि एकटेपणाची गरज असेल तेव्हा ती समजून बाजूला होणारा.
आपण खरे कसेआहोत याची लाज न बाळगता कबुली देता येईल असा.
सतत बदलणारी आपली रूपं ,तितक्याच समंजसपणे सामावून घेणारा ,निरपेक्ष प्रेम करणारा , झालेल्या चुकाही माफ करून आपलसं करणारा , आपण एकटे नाही याची जाणीव सतत देणारा.आपल्या सामर्थ्याची परत परत आठवण करून देणारा , खूप जवळचा तरीही फक्त खरे तेच सांगणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ‘तो’ किंवा ‘ती ‘ च्या पलीकडचं नातं असणारा.आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रतिबिंब असणारा निर्मळ आरसा.
आजकालच्या वाढत्या गर्दीत माणूस माणसांनी वेढलेला असतो पण त्याला कोणी सखा नसतो, भरल्या समुद्रात तहानेने व्याकुळ असावे अशी ही अवस्था. आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट परिस्थितीत जोडीदार बरोबर
असतोच पण त्यातून बाहेर मार्ग काढताना येणाऱ्या कठीण प्रसंगाना आणि अडथळ्याला तोंड देतांना आपल्याला सहृदय मित्राची गरज भासते . जो विश्वास आणि धैर्याने assurance देईल ,काळजी करू नको, तू यातून नक्की मार्ग काढशील.मी आहे ना
तुझ्यापासून कितीही दूर असलो तरी कायम तुझ्या सोबत असेन ही खात्री देणारा , मनाने
आपल्या अगदी जवळ असणारा.
मैत्री ही एक सद्भावना आहे ,एक दृढ भावबंध आहे.
मैत्री एका विशिष्ट वयात जमते जेव्हा जीवनात अन्य हव्यास वाढीला लागलेले नसतात किंवा संपलेले असतात. जबाबदारींचा गुंता नसतो,तेव्हा मैत्री मूळ धरते आणि मनात घर करते. बोलण्यामुळे ,संवादामुळे ती वाढते ,मन मोकळे करण्यामुळे लाभणारी प्रसन्नता मैत्रीचं देऊ शकते . परस्परांविषयी वाढणारी ओढ आणि गाढ विश्वास मैत्रीचा आधार असतो.सततच्या सहवासापेक्षा भावनिक उत्कटतेने एकमेकांना भेटणे ,परस्परांशी हितगुज करणे ,काही क्षणांचे प्रेम अनुभवणे ही मैत्री.
खरी मैत्री म्हणजे भावभावनांची समरसता आणि व्यक्तिमत्वाची समरूपता . त्यात कसलेच गणित नाही, जमाखर्नाही. ती लाभाविण केली जाणारी प्रीती.
मैत्री निरपेक्ष असते योगायोगाने ती जमते. मिळते जुळते स्वभाव ,आवडीनिवडी मैत्रीला पोषक ठरतात … ती उघड,सरळ आणि पारदर्शक असते , ती
मिरवावी लागत नाही , लपवावी लागत नाही , ती केवळ समानतेच्या पातळीवर नांदते.
कृष्ण आणि अर्जुन ,कृष्ण आणि सुदाम यांच्यात मैत्री होऊ शकते. कामानिमित्त गोळा होणारी आणि स्नेहापोटी जमणारी माणसे खूप फरक आहे त्यात.
मैत्री एक भाव आहे , भूमिका आहे ,संबंध आहे.
भावनिक संबंधाचे सार मैत्रीत आहे. स्वार्थरहित ओढ आणि सुखदुःखात घडणारा सहभाग , प्रांजळपणे बोलणे हे मैत्रीचे रंग आहेत.
अशी मैत्री मुलामुलीत आणि स्त्री -पुरुषात असू शकते का ?
तत्वतः ती सहजशक्य आणि अधिक आनंददायक आहे , पण सामाजिक दुराग्रहामुळे ,मनुष्यसुलभ दुर्बलतेमुळे ती अनेकांना पेलत नाही. शुद्ध स्नेह आणि उदात्तरम्य स्त्रीत्व याची युती ही आवश्यक आहे. पुरुषाच्या मनोवृत्तीत थोडे तरी स्त्रीत्व आणि हळुवारपणा असावा,स्त्रीच्या वृत्तीत थोडा तरी पोलाद असावा. देवाला सुद्धा अर्धनारी नटेश्वर होण्याचा मोह पडला,
मग माणसांच्या जगात अशा मैत्रीला स्थान का नसावे ?आनंद द्विगुणित करण्यासाठी,दुःखाचे क्षण कमी करण्यासाठी मित्राला कडकडून मारलेली मिठी समाजाला का मंजूर नसावी ?
त्याला आक्षेप का असावा ? संवेदनाक्षम तंतुवाद्याची एक तार छेडली तर जवळ असणाऱ्या सर्व वाद्यांचा तारा झंकारतात.
मैत्रीच्या तारा अशाच असतात.
त्यामुळे जीवनात संगीत निर्माण होते. ज्यांना मित्र आहेत त्यांनी ते जपावेत ,ज्यांना नसतील त्यांनी ते शोधावेत. मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवर पण येऊ नये.
मी आहे ना !
अशी सतत ग्वाही देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या माझ्या आवडत्या मित्रास समर्पित ।
(लेख आवडल्यास अवश्य प्रतिक्रिया द्या.










सुंदर ,परिपक्व लेख
मैत्रीच्या विविध परिभाषा खूप छान मांडल्या.
👌👌👌👍
छान लिहिले
खूपच छान उतारवयात काय सगळ्याच वयात मैत्रीची गरज असतेच दोघानाही खुपभरी….
समृद्ध वैचारिक बैठक !!, मैत्रीचे अनेक बारकावे सहजपणे उलगडले आहेत .अशीच लिहिती रहा.