रैना बीती जाए-song review in marathi
वाट बघणे…किती जीवघेणे असते ते वाट बघणाराच जाणतो.निमिषागणिक वाढलेली आर्तता, ह्दयाची वाढत जाणारी स्पंदने, मनात काळजीने घातलेले थैमान…कसे वर्णन करता येईल वाट बघण्याचे.
इंतजार का फल मीठा होता है…..खूपदा ऐकलेले वाक्य.पण इंतजार करतांना होत असलेली मनाची तगमग
इंतजार करणाराच समजू शकतो.
मैफिल सजली आहे. जीवनात एकटेपण वाट्याला आलेले आनंदबाबू मद्याचा आधार घेत शरीर आणि मनाचा कसातरी तोल सांभाळत रस्त्याने चालत आहेत.
रात्रीची वेळ वातावरणातील उदासीनता अजूनच वाढवत आहे. सर्वत्र पसरलेला अंधार आणि लांबून ऐकू येणारे गाण्याचे आर्त सूर जणू पहाट आता उगवणारच नाही याची ग्वाही देत आहे.
स्वरांमधल्या आर्ततेकडे आनंदबाबूंचे पाय आपसूक ओढल्या जातात.
आयुष्यात फक्त दुःख वाट्याला आलेली पुष्पा गात आहे.
रैना बीती जाये, श्याम ना आये
निंदिया ना आये, निंदिया ना आये
रैना बीती जाये …
रात्र एकेक प्रहर ओलांडून पुढे जात आहे पण राधाचा श्याम अजून तिला भेटायला आला नाही. राधाची व्याकुळता वाढत चालली. श्याम आल्याशिवाय निद्रादेवी प्रसन्न होणार नाही.
शाम को भूला, श्याम का वादा
संग दिये के, जागी राधा
निंदिया ना आये, निंदिया ना आये
रैना बीती जाये …
संध्याकाळी भेटण्याचे दिलेले वचन संध्याकाळ झाल्याबरोबर विसरला का तू?
रातभर जळणाऱ्या दिव्यासोबत आता मीही जळत राहणार तू येईपर्यंत.
तू दिसल्यावरच मन शांत होणार आता.
किस सौतन ने रोकी डगरिया
किस बैरन से लागी नज़रिया
निंदिया ना आये, निंदिया ना आये
रैना बीती जाये …
कोणी माझी सवत तर नाही ना तिकडे?
तिने तर तुझा रस्ता अडवला नाही?
आपल्या दोघांना तिच्यामुळे तर विरह सहन नाही ना करावा लागत आहे?
बिरहा की मारी, प्रेम दीवानी
तन मन प्यासा अंखियों में पानी
निंदिया ना आये, निंदिया ना आये
रैना बीती जाये …
तुझ्या विरहात व्याकुळ बनलेली विरहिनी तुझ्या प्रेमात वेडी झालीय.
माझा देह तुझ्या स्पर्शासाठी आणि मन तुझ्या प्रेमासाठी आसुसले आहे.
बघ माझ्या डोळ्यात तुझ्या आठवणीने किती आसवे जमा झाली. आता त्या डोळ्यात झोप येणार कशी?
अमरप्रेम सिनेमाचे संगीत राहूल देव बर्मनचे.
रात्रीची निरव शांतता आणि शांततेला आरपार चिरत जाणारा आलाप ऐकतांना अक्षरशः अंगावर शहारे येतात.
आनंद बक्षींनी लिहिलेल्या गाण्यातील व्याकुळता लता मंगेशकरने अजून वाढवली आहे.
पडद्यावर विरहनी बनलेली ,शेवटच्या कडव्यात आसवांनी टपोऱ्या डोळ्यात केलेली गर्दी असे विविध भाव पुष्पा बनलेल्या शर्मिला टागोरने लीलया दाखवले आहेत.
आणि तिचे विरहगीत सुरु असतांना आलेले आनंदबाबूच्या(राजेश खन्ना) चेहऱ्यावर आलेले एकटेपणा आणि हतबलतेचे भाव बघितल्यावर गाण्याचे शब्द थेट ह्दयापर्यंत पोहचतात.
हे सुमधुर गीत मनु अतुल यांच्य गोड आणि सुरेल आवाजात ऐका शब्दपर्ण YOU TUBE CHANNEL वर











Sundar 🌹🌹🌹
Wahwa
अप्रतिम 👍