१६-गुंता-स्त्री मनाचा
सुमीला ते अत्यंत तणावाचे दिवस आठवले, सुमीला हे कळून चुकले होते की, तिच्या नवऱ्याला घटस्फोट नको होता. कारण त्यामुळे त्याला माझ्याकडून मिळणारा पैसा बंद होणार होता. या एकाच उद्देशाने त्याची तगमग होत होती. मुलांबद्दल किती ओढ होती हे तर मला माहीतच होते.पदोपदी तो ” तुझी मुले” असाच त्यांचा उल्लेख करीत असे.त्याच्याकडे कधी मुलांची काही तक्रार केली असता,
ती तुझी मुले आहेत ,मला त्यांचे काही सांगू नको, तुझी तू पाहून घे
.अशी वाक्ये ठरलेली असत.आणि बापाचे प्रेम ते काय? तो मुलांना कितीसा वेळ द्यायचा, जास्त तर तो बाहेर गावीच राहायचा. मुलांना त्याचा लळा लागू नये म्हणून मुलांशी अंतर राखूनच वागायचा .त्यामुळे मुलांसाठी घटस्फोट देणार नाही, ही शक्यताही नव्हती.
पण माझ्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर त्यांने भांडून ,माझा पूर्वेतिहास उजळणी करून, मी किती चुकीची आहे ,मला कसे काहीच कळत नाही , मला निर्णय घेता येत नाही, मला व्यवहार कळत नाही , मी किती मूर्ख आहे इत्यादी दर्शवण्यात त्याने कोणतीही कसूर ठेवली नाही . पण तरीही मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याने तो आता धमकी देऊ लागला की,
तू मला घटस्फोट दिला तरी मी येईल व पैसे घेऊन जाईल. तु काहीच करू शकणार नाहीस .नाही तर भर रस्त्यात तुझा खून करेन इत्यादी .पण मी सहन केलेल्या त्याच्या अत्याचारापुढे मला ही धमकी तकलादू वाटली. माझा निर्धार पक्का होता. त्यानंतर त्यांने असेही आवाहन केले की,
तुझ्यात हिंमत असेल तर, ही मी लावलेली नोकरी सोड आणि एकटी जगून दाखव .माझ्या भरोशावर मी तुला मजा मारू देणार नाही.
त्याशिवाय त्याने अत्यंत घृणास्पद आरोप लावले की,
मी बाहेर गावी गेल्यानंतर तुझे इतर कोणा सोबत संबंध जुळले असतील म्हणून तुझी मला घटस्फोट देण्याची हिम्मत झाली.
मी प्रत्युत्तर देण्याच्या मनःस्थितीत नव्हते तरी म्हणाले ,
मी तुमचा अमानुष अत्याचार सहन केला. तुम्ही बाहेर गावी जाता तेव्हा तिकडे किती बायकांसोबत तुमचे संबंध असतील कोण जाणे? मी येथे विधवे सारखे आयुष्य जगते आहे .म्हणून मला तुमच्यासोबत आता यापुढे राहायचे नाही बस्स.
तो म्हणाला
आता मी जाणार नाही असे वचन देतो . मग तर झाले. मी तुला सोडून कुठेही जाणार नाही
.तो तडजोडीच्या स्वरात म्हणाला. मी म्हणाले
माझे गेलेले आयुष्य, माझ्या मुलांचे गेलेले बालपणाचे दिवस तुम्ही परत आणू शकता काय ? आता तुम्ही जिथे जायचे तिथे जा, आनंदाने राहा. मला पुन्हा आपले तोंड दाखवू नका.
तो कुठल्यातरी विचारात असल्यासारखे दर्शवत सोफ्यावर बसला.
दुसऱ्या दिवशी त्याच्या भाऊ वहिनी आणि पुतणी सोबत तो बाहेरगावी निघून गेला. ते सर्व गेल्यानंतर मला हायसे वाटले. मनावरचे दडपण कमी झाले .तो असताना मनावर खूप दडपण आल्यासारखे वाटे.
त्यानंतर मला मोकळे वाटू लागले. मी आपल्या कामात व्यस्त झाले. मुलांची देखभाल, शाळा, त्यांचा डबा आणि ऑफिस. आता मी स्वतंत्र होते. त्याला नाकारल्याने त्याचा पुरुषी अहंकार डिवचला गेला होता. आणि मी असे करू शकले याबद्दल स्वतःलाच आत्मविश्वास वाटून आनंद झाला .यापुढे त्याने जे जे शिकायला मनाई केली होती. ते ते सर्व शिकायचे असे ठरवले .सर्वप्रथम माझी मोठी अडचण दुचाकी शिकण्याची होती. मला कार्यालयीन कामाने कुठे जायचे म्हटले तर पायी जावे लागे. तालुक्याच्या ठिकाणी रिक्षा मिळत नव्हता. माझा वेळ आणि शक्ती दोन्हीचा अपव्यय होत होता. त्यामुळे मला दुचाकी शिकणे अत्यंत आवश्यक होते. कर्मचार्यांच्या मदतीने दुचाकी शिकले. शिकल्यानंतर कोण आनंद झाला ? पंख फुटल्यासारखे वाटू लागले .
व्वा..सुमे… जगायला शिकली.
मीच मला शाबासकी दिली. यापूर्वी एकदा मी नवर्याकडे दुचाकी शिकवण्याचा हट्ट केला होता. तेव्हा त्याने माझ्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून, माझ्या अंगावर दुचाकी पाडून त्याच्या सायलेन्सरने माझा पाय भाजला गेला होता. तो जवळच उभा राहून हसत होता. ती दुचाकी त्याने लवकर उचलली नाही.त्यामुळे जखम जास्त झाली होती. तो व्रण आजही पायावर कायम आहे. आज ती घटना प्रकर्षाने आठवली.
…
क्रमशः
सुमीच्या आयुष्यात पुढे काय होते….वाचा पुढील लिंकवर
https://marathi.shabdaparna.in/१७
कथामालिका कशी वाटत आहे.प्रतिक्रिया अवश्य द्या.
व्वा, सुमी जगायला शिकली.
छान.. आत्मविश्वास वाढला