१७ गुंता-स्त्री मनाचा
आता मी गाणं शिकायचे ठरवले. मी एका संगीत शिक्षकाकडे मुलांना घेऊन गाणं शिकायला जाऊ लागले. घरातील सर्व कामे आटोपून सुट्टीच्या दिवशी मुलांना बाहेर नेणं, मुलांच्या मित्रांना घरी बोलावून छोटी बच्चे पार्टी करणे ,त्यासाठी खाऊ तयार करणे इत्यादी करण्यात खूप आनंद वाटायचा. मुलांच्या आनंदात , हसण्यात मी हरखून जाई.
सायंकाळी पहारेकरी , विद्यार्थिनी यांच्यासोबत मस्त गप्पा रंगत. विद्यार्थीनी त्यांच्या गावाच्या आठवणी, घटना सांगत .त्यातून त्यांचे रितीरिवाज कळायचे. नवीन नवीन गोष्टी माहित व्हायच्या . त्यातूनच मुलगी पहिल्यांदा मासिक पाळी ला बसली की आमच्याकडे नारळ टाकतात, असे एका मुलीने सांगितले.
म्हणजे त्या मुलीला शेजारी व नातेवाईक महिला घरी येऊन हिरवा चुडा भरतात, नवीन कपडे घालतात. नारळ, तांदुळाने तिची ओटी भरतात. आणि शेजारी व नातेवाईक मंडळींना जेवण देतात. असा तो महत्त्वाचा कार्यक्रम असतो .असे पहिल्यांदाच माहित झाले. दिवस असा कामात निघून जात असे. पण रात्री त्याचे शब्द आठवत राही.
हिम्मत असेल तर ही माझी नोकरी सोडून दे....
मी विचार करू लागे…
हिम्मत असेल तर मी लावलेली नोकरी सोड… हे त्याचे वाक्य आठवले आणि सुमी विचार मग्न झाली. तिला आठवले ,
मी एमपीएससी चा अभ्यास करण्याचा विचार करू लागले . त्या अनुषंगाने जाहिराती बघणे सुरू केले .त्यात माझ्या सोयीचे पद शोधत असे. काही पदांसाठी फॉर्म भरून परीक्षेची तयारी केली सुरू केली.कित्येक वेळा परीक्षाही दिल्या. पण यश आले नाही. मी प्रयत्न सुरू ठेवले आणि एक दिवस यश आले. माझे नाव निवड यादीत पाहून सुखद धक्का बसला . माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. यावरून माझ्या लक्षात आले की मला जरी बऱ्याच गोष्टी येत नव्हत्या तरी त्या मी शिकू शकते .अशी कोणतीही गोष्ट नाही जी शिकता येणार नाही.
मला आठवते मी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मंचावरून बोलायला घाबरत असे. मी भीतीपोटी तसा कधी प्रयत्नच केला नाही. आता इथे विद्यार्थिनींकरिता वेगवेगळे उपक्रम राबवताना, विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणे हे नित्याचेच झाले. म्हणजे जबाबदारी आली की ती गोष्ट आपसुकच येते असे मला समजले.
यथावकाश नवीन पदाची आदेश प्राप्त झाले. हे एक राजपत्रित अधिकाऱ्याचे पद होते. नवीन पदावर रुजू होताना आधीच्या खात्याचे अनुभव पाठीशी होतेच. तेथील विद्यार्थिनींनी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत भावविभोर होऊन मला निरोप दिला. त्यांनी मला साडी-चोळी व भेटवस्तू दिल्या , त्यामागच्या त्यांच्या भावना माझ्यासाठी अतिशय मूल्यवान होत्या.
विद्यार्थिनींनी निरोप समारंभाचे छान आयोजन केले होते. त्यात माझ्याबद्दलचे छान छान अनुभव सर्वांनी सांगितले .कर्मचाऱ्यांनी देखील भावूक अंतःकरणाने माझ्याबद्दल, माझ्या स्वभावाबद्दल ,माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल चांगल्या आठवणी सांगितल्या होत्या. मी माझ्या भाषणात त्यांच्या या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली . निरोपाचा तो प्रसंग अत्यंत हृद्य होता. या कर्मचारी व विद्यार्थिनी सोबत माझे एक अत्यंत आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. या अनोळखी गावात माझे कोणीही नसताना ,माझी छोटी छोटी मुले घेऊन मी एकटी केवळ यांच्या सहकार्याने राहत होते. माझे डोळे आसवांनी आपोआप भरून आले.
नवीन नोकरीचे ठिकाण म्हणजे महानगर होते. येथे रीतसर रुजू झाले . येथे माझे औपचारिक स्वागत करण्यात आले.येथील स्टाफ आधीच्या पेक्षा खूप मोठा होता. तेथील लोकं साधे सरळ स्वभावाचे व प्रेमळ होते. इथे सर्व व्यावहारिकता होती. त्यामानाने कामाचा व्याप बराच मोठा होता. माझ्या राहण्याचे ठिकाणापासुन कार्यालय आठ ते दहा किलोमीटर अंतरावर होते. रोज मी माणसांच्या गर्दीच्या लोंढ्यासोबत दुचाकीने कार्यालयात जात असे. आणि परत येताना तोच गर्दीचा लोंढा घरापर्यंत सोबत असे.
कुठे सिग्नल लागला की एकाच वेळी हा प्रवाह जागीच थांबे. परत सिग्नल सुटला की पुढे पुढे सरकत जाई. सुरुवातीला अशा गर्दीची मला सवय नव्हती.परंतु नंतर ते अंगवळणी पडले. एखादवेळी रस्त्याने गर्दी कमी असली की चुकल्या चुकल्यासारखे वाटे.
मी जशी माझ्या आयुष्यात प्रगती करीत होते . मुलेसुद्धा आपापल्या शिक्षणात चांगली व समाधानकारक प्रगती करीत होते. मी तालुक्याच्या ठिकाणी बराच काळ नोकरीनिमित्त राहिल्यामुळे मुलांवर तेथील साधी राहणी व सहिष्णुतेचे संस्कार झाले होते. ते पुढे त्यांना खूप उपयोगी ठरले .
क्रमशः
https://marathi.shabdaparna.
कथामालिका आवडल्यास नक्की प्रतिसाद द्या.
नवीन शहरात सुमीच्या आयुष्याची नवीन सुरुवात…. , खूप प्रेरणादायी संघर्ष आहे सुमीचा.
पूर्ण कथा मालिका सलग वाचल्यामुळे खूप आवड लीं सुमीम्च्या आयुष्याला खूप छान वळण दिल