गुंता- स्त्री मनाचा
भाग १८-नोकरी व घर
आज सुट्टीचा दिवस होता. सुमीने घराचे पडदे स्वतःच्या आवडत्या फिक्या निळ्या रंगाचे बनवून घेतले . घराचा काही भाग आवडत्या रंगाने रंगवायचे ठरवले व तशा पेंटर ला सूचना दिल्या. तसेच आज नवीन डायनिंग टेबल विकत आणायचे व मुलांसह बाहेर जेवण करायचे ठरले होते. त्याप्रमाणे सुमी मुलांना घेऊन हॉटेलमध्ये जेवायला गेली. मुले खाद्यपदार्थाची ऑर्डर करण्यासाठी मेनूकार्ड वर चर्चा करत होती.
मुलांचे ते आनंदी चेहरे बघून सुमी भूतकाळात हरवून गेली. तिला आठवले नवरा असताना असे आनंदाचे क्षण फारच कमी वाट्याला आले. तो घरी आला की मुलांवर, माझ्यावर सदा चिडचिड करायचा, लहान-लहान कारणावरून मारहाण करायचा. तो घरात असेपर्यंत घरातलं वातावरण तणावपूर्ण असायचे. पण तो गेल्यापासून मोकळे वाटते, जीवन किती सहजसुंदर आहे. या लहान लहान गोष्टी मध्ये किती आनंद आहे.. पण या स्वातंत्र्यासाठी सुद्धा किती संघर्ष करावा लागला.ती विचारमग्न झाली…
घटस्फोटाच्या निर्णयानंतर त्याला बाहेर गावी जाऊन सहा ते आठ महिने झाले असतील. एकदा असाच अचानक तो माझ्याकडे आला. वेळ सायंकाळची होती. कार्यालयातून नुकतेच मी घरी पोहोचले होते. त्याने आल्यानंतर घरात शिरण्याचा प्रयत्न केला. मी त्याला मनाई केली. आतापर्यंत तो माझ्या बहिणीसोबत राहत असल्याचे मला कळले होते. तो मला पैसे मागू लागला. मी स्पष्ट नकार दिला. त्याने मुलांना घेऊन जाण्याची धमकी दिली. माझ्या डोक्यात तिरस्काराची आग पेटू लागली. त्याला त्वरित निघून जाण्यास सांगितले.
त्याच्या चारित्र्याविषयी प्रथमच मी खालच्या पातळीवर पण सत्य बोलले.पैसे देण्यासाठी मी बधत नाही हे बघून तो मुलांना घेऊन जाण्यास मुलांचे हात पकडू लागला .मी त्याच्यापासून मुलांना सोडविण्याचा प्रयत्न करताना माझी शक्ती कमी पडली. त्याने मला धक्का देऊन खाली पाडले आणि पुढे जाऊ लागला .मी लगेच घरात जाऊन मिरचीपूड आणली व त्याच्या डोळ्यात भिरकावली .तो आगीने ओरडू लागला. तुला जिवंत सोडणार नाही असे बरळू लागला. मी लगेच मुलांना त्याच्या तावडीतून सोडविले व त्याला म्हणाले,
” जा.. तुझ्या बायकोकडे.. पुन्हा येऊ नको माझ्याकडे. तिच्यासाठी तू मला आज वर छळत होतास ना .आणि पुन्हा इकडे दिसला तर तंगडे तोडून ठेवेन. लक्षात ठेव”.
माझ्या डोळ्यातून आणि संपूर्ण शरीरातून रागाचा व तिरस्काराचा लाव्हा बरसत होता.
त्यानंतर त्याने माझी बदनामी करण्यासाठी माझ्या कार्यालयात येऊन जोरजोरात माझ्या बद्दल,
” ही चरित्रहीन आहे, नवरा सोडून राहते ,मला घटस्फोट देत आहे, हिला दुसरे लग्न करायचे आहे .हिला नोकरीचा घमंड आहे.”
इत्यादी दुषणे देऊन मला शिवीगाळ केली .बरेच दिवस मला कार्यालयात जाण्याची व कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नजरेस नजर मिळवण्याची हिम्मत होत नव्हती. तसेच समाजात इतरही ठिकाणी व नातेवाईकांमध्ये त्याने माझ्या बदनामीची काहीच कसूर ठेवली नाही.
कसेबसे अपमानाचा घोट पिऊन कार्यालयात रुजू झाले. वरिष्ठांकडे विनंती करून दुसरीकडे बदली करून घेतली .आणि दैनंदिन कामाला सुरुवात केली . अशा रीतीने मी अनेक मनस्तापानंतर स्वतंत्र झाले .एका कर्त्या पुरुषाप्रमाणे सर्व कर्तव्य व जबाबदाऱ्या पूर्वीप्रमाणेच पार पाडत होते.
तिकडे माझा नवरा व माझी बहीण हे अधिक बिनधास्तपणे एकत्र संसार करीत असल्याचे कळले. त्यांनी निर्लज्जपणाची हद्द ओलांडली होती.
मी मुलांच्या शिक्षणावर व त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर माझ्या वैयक्तिक जीवनाचा व समस्यांचा परिणाम होऊ नये म्हणून हा विषय मुलांसमोर कधी काढला नाही. मुले मोठी होऊ लागली त्यांनी त्यांच्या निवडीप्रमाणे शिक्षणाचे मार्ग निवडले दोन्ही मुले इंजिनीअरिंगच्या शिक्षणासाठी मोठ्या शहरात नामांकित कॉलेजमध्ये गेली .मी एकटी पडले .
मुले रोज फोन करून विचारपूस करीत होते .पण त्यांच्यापेक्षा त्यांच्या काळजीपोटी मी त्यांना वारंवार फोन करीत राही. दरम्यान माझी नोकरी व घर हा जीवन जगण्याचा दिनक्रम बनला. पण एकटेपणामुळे मुलांची खुप आठवण यायची .अधेमध्ये त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन भेट घेऊन यायची, तर कधी सुट्टी मध्ये मुले घरी यायची. मुलांच्या सहवासात ते दिवस फुलपाखरासारखे भुरकन उडून जायचे….
दरम्यान कार्यालयातील एक सहकारी दिपक एकदा जवळ येऊन म्हणाला,” मॅडम तुम्हाला काही मदत लागली, काही अडचण असेल तर मला निसंकोच सांगा. मला तुमच्या परिस्थितीची जाणीव आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका. मला पण बायको मुले आहेत.”
मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तोच म्हणाला तुमच्याबद्दल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सहानुभूती आहे .आम्ही तुम्हाला गेल्या तीन वर्षापासून पाहतोय. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे .माझ्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका प्लीज . मी त्याला माझ्या बद्दल सहानुभूती दाखवल्याबद्दल धन्यवाद दिले.
दिपकसारखा मित्र सुमीच्या आयुष्यात आल्यानंतर तिचे आयुष्य बदलले का?
आधीच्या भागाची लिंक
https://marathi.shabdaparna.in/१७
कथामालिका कशी वाटत आहे….comment करुन नक्की कळवा.
प्रिय वाचक तुम्हीही शब्दपर्णवर लिखाण प्रकाशित करु शकता.
छान