शनिवार असला म्हणजे तिची सकाळपासूनचीच घालमेल असे.
पाय दिवाणखान्यापर्यंत आणि डोळे मात्र खिडकीबाहेरच्या फाटकाकडे…
शनिवारी तिची लाडकी लेक येणार असे.
दर शनिवारी हा कार्यक्रम ठरलेला असे.
त्यावेळेस माझी इंटर्नशिप चालु होती.आठवडाभर काम करून शनिवारी घरी यायचे .घरी आले कि हातातली बॅग खाली ठेऊन तिला मिठी मारायचे,तिचा चेहरा चिंचपाण्याने धुतलेल्या गौरी प्रमाणे दिसायचा.
हातपाय धुवून येते तोवर डायनिंग टेबलवर गरमागरम जेवणाचे ताट हजर असायचे.अधुनमधुन बाबांची लुडबूड चालू असायची,सहजतेने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सारे लक्ष माझ्याकडे द्यायची.
तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती. फक्त आठ वर्षांचा सहवास तो…पण त्या आठवणी तिच्या मनात कायमच्या कोरल्या होत्या.तिच्या मते आई आणि मुलीचे नाते म्हणजे ह्दयाशी ह्रदयाचे नाते .
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गच्चीत झोपत असू त्यावेळी ती आम्हाला एक एक आठवणी सांगत असे . काळ्याभोर आकाशाच्या पडद्यावर लुकलूकणाराऱ्या चांदण्यासह आम्ही तिच्या गोष्टी ऐकायचो.तिची गोष्टी सांगण्याची ढब ही काही आगळी असे,कि समोरचा ही त्यात एकरूप होऊन जाई .
दुपार झाली कि मोठ्या पलंगावर मी पहूडायचे ती मात्र माझ्या उशाशी बसुन तिच्या मृदू स्पर्शानी माझे केस कुरवाळायची.
‘आजीच्या ओव्या म्हण ना ग! ‘
मी आग्रह करायची.तिच्या हळूवार कोमल आवाजात ती म्हणू लागायची.
गेल्या कुण्या गावा याच्या जाण कुठवरी
सांगते निरोप बाळराजा वाटेवरी
आंगड्याच होत बाळ घोंघडीच झाल
दुबळ्या आईच पांग फेडाया निघाल
पड पड पाण्या मृगा आधी रोहिणीचा
पाळणा हालतो भावा आधी बहिणीचा
भावाबहिणीच भांडण जसे झाकाळले नभी
बहिणीच्या डोळा पाणी भाऊ चिंतावला मनी
शेजि शिकविती गुळवाट्या खाया देती
माय शिकविती कडूनिंब प्याया देती
मायालेकीच भांडण जशी दुधाला उकळी
लेक धरिती अबोला माय मनात मोकळी
लाडाची लेक माझी , लयी लाडकी होवू नको
जाईल परघरी, वेडी माया लावू नको
आई आई म्हणते आई केव्हढी जिन्नस
महिमाच सोन नाही लागत कानस
जीव माझा गेला तुला कळल रानात
आता माझ्या बाळा कडू लागल पानात
जीव माझा गेला सून गंगेमधी उभी
अजून येईना लेक संसाराची लोभी
जीव माझा गेला सून धरिती पदर
स्वर्गीच्या वाटी लेकीमैनांचा गजर
तिच्या ओव्या ऐकत कधी झोप लागायची कळायचे नाही .
ती म्हणायची लहानपणी ह्या ओव्या ऐकल्या की माझे रडू लगेच थांबायचे पण आज मात्र तिच्या ओव्यांच्या आठवणीने माझे अश्रू अनावर होतात.
आई आणि मुलीच्या प्रेमाचे सुंदर वर्णन.
ओव्या पण सुरेख.
Chan
सुंदर