चहा पोहे
संदीप जवळ जवळ सुरेश काकांच्या घरून पळूनच आला. धापा टाकत स्वयंपाक घरात आईच्या समोर येऊन उभा राहिला. आनंदून जावे की पळून जावे? तो गोंधळला होता.
काय सांगावे आईला ? त्याला सुचेना
आई ! मला नको पुन्हा पाठवू सुरेश काकांकडे. चिडून बोलला.
अरे! काय झालं सांगशील तर.
काही नाही, नाही जाणार आता, बस .
आणि आई समोरून निघून गेला. नंतर त्याची आई कामाच्या गडबडीत त्याला त्याबद्दल विचारायचं विसरून गेली . तिच्या दृष्टीने हा विषय तिथेच संपला होता पण संदीपच्या डोक्यातून नाही .
सुरेश काका हे संदीपच्या बाबांचे , विजयरावांचे खास मित्र, ऑफिसमधले सहकारी, जिवलग मित्र .
कित्येक सुखदुःख त्यांनी एकमेकांसोबत वाटून घेतले .
सहाजिकच त्यांचे परिवारही एकमेकांच्या जवळ होते.
छोटे-मोठे समारंभ, सण, वाढदिवस, बायकांचे हळदीकुंकू यासाठी दोन्ही परिवार जसे जमेल तसे एकत्र येत असे.
सुरुवातीचे काही वर्ष शेजारी शेजारी राहत होते.
त्यामुळे घरी येणे जाणे बोलणे असायचेच .
दोन्ही घरचे मुलं एकाच शाळेत. संदीप आणि काकांचा मुलगा एकाच वर्गात तर त्यांची मुलगी एक वर्ष मागच्या वर्गात.
साहजिकच मुले ही एकत्र खेळत मजा करत.
दोन्ही कुटुंब साधारण , कुठलाही बडेजाव नाही, हेवादावा नाही. म्हणूनच त्यांचं चांगलं जमायचं.
मुले लहान होते शाळेत असेपर्यंत सगळं ठीक होतं. भेटणं, जाणं-येणं, बोलणं .
दोन्ही घरची मुले मोठी झाली शिक्षणासाठी इतरत्र गेली. मुलांच्या भेटीगाठी मंदावत गेल्या .
कधी सुट्ट्यात जमलेच तर भेट होत होती सगळ्यांची .
पण दरवेळी सगळेच एकत्र येतील असं क्वचितच होई.
पण सुरेश काका काकू आणि संदीप चे आई वडील यांनी मात्र एकमेकांकडे जाणे येणे सुरूच ठेवले . रिटायरमेंट नंतर त्यांना तर जास्तच वेळ मिळू लागला . तसा मुलांना कमी.
सुरेश काकांना दोन मुले एक मुलगा एक मुलगी .
इकडे संदीपचा मोठा भाऊ आणि एक बहीण असे तीन.
संदीप शेंडेफळ लाडात वाढलेला. सावळासा रंग गुटगुटीत, टपोरे डोळे, झुपकेदार केस.
संदीप इंजिनियर झाला तरी त्याचं बाळसं कायम ठेऊनच.
दोन्ही घरची मुले आपापल्या मार्गी लागून कमावती झाली.
संदीप इंजिनियर झाला. नोकरीनिमित्त एका कंपनीत आणि तिकडेच स्थायिक झाला.
एकदा असेच काही कारणाने घरी आला होता.
सुरेश काका अनायासे आले होते. संदीपची भेट झाली आणि त्याला लक्षात आलं की काका राहून राहून त्याला सारखे बघत आहेत. पुन्हा पुन्हा चौकशी करत आहेत.
अधून मधून घरी फोन केला की संदीपची आई बोलायची,
अरे, सुरेश काका येऊन गेले , तुझी चौकशी करत होते, कसा आहेस वगैरे.
असाच मध्ये काळ गेला . सुट्ट्यात किंवा कामानिमित्त घरी संदीप आला की काका त्याला त्याच्या घरी येण्याचा आग्रह करत. पण हा टाळायचा किंवा कमी वेळासाठी येत असल्याने आधी मित्रांना भेटायचा , मग काकांकडे जायचं राहून जायचं .
असं दोन-तीन वेळेस झालं
एकदा आई म्हणाली, अरे , ते कितीदा बोलवत आहेत तर जाऊन ये ना एकदा . आधी काय जात नव्हता का त्यांच्या घरी ठीक आहे म्हणाला
संदीप आल्याचा कळालं की सुरेश काका हजरच . त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, काहीच कळायला मार्ग नव्हता. त्याला घरी घेऊन गेले मुख्य म्हणजे एकट्यालाच . त्याला जरा नवल वाटलं. घरी आधीच सांगून ठेवल्यासारखं त्याला जाणवलं .संदीप ची द्विधा मनस्थिती काकांना कदाचित जाणवत असावी . त्यांच्याकडे गेल्यानंतर संदीपला लहानपणी जात होता तसं वातावरण वाटलं नाही कारण त्यावेळी काका काकूंच्या नजरेतले भाव वेगळेच वाटले. त्यांच्या भेटीला खूप काळ लोटला होता म्हणून असेल कदाचित .त्याला दोघेही त्याच्या नोकरीची , कामाची , कुठे राहतो, याची खूप चौकशी करत होते.
तो थोडासा मोघम बोलून निघण्याच्या तयारीत आला की काही कारण काढून जबरदस्तीने थांबवत होते. मध्येच एकमेकांना डोळ्यांनी खुणा करत होते . त्याला काही अंदाज येईना पण तो अलर्ट झाला , कुठेतरी पाणी मुरतंय.
त्याची चाललेली घाई बघून काकू म्हणाल्या थांब चहा करते. खूप दिवसांनी आला असा मुळीच जाऊ देणार नाही .
काकू पाच दहा मिनिटात बाहेर आल्या पण चहा न घेताच. तो काकूंच्या हातातल्या चहाच्या कपाची वाट पाहू लागला.
त्यांच्या मागून त्यांची मुलगी चहाचा ट्रे घेऊन खाली मान घालून आली. तो आल्यापासून ही मुलगी त्याला कुठेच दिसली नव्हती. आणि अचानक चहाचा ट्रे घेऊन आली आणि खूष दिसत होती अंगावर मोरपंखी रंगाचा ड्रेस, केसांचा काळपट तपकिरी रंग, ड्रेस ला शोभुंन दिसतील असे कानातले, आणि चमकीची टिकली कपाळावर चमचम करत होती. मध्येच हसत होती लाजत होती. हातात ट्रे घेऊन हळूच एक तिरपा कटाक्ष टाकून ती त्याच्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसली .
काहीतरी कारण काढून काकू आत गेल्या आणि थोड्यावेळाने काकांना पण आवाज देऊन आत बोलाऊन घेतले .
तसा संदीप चपापला . आता त्याला हळूहळू उलगडा होऊ लागला. तसा त्याने कसा बसा चहा घशाखाली उतरवला आणि घराकडे धूम ठोकली. हा ध्यानीमनी नसतानाचा पण आखीव रेखीव कार्यक्रम संपन्न झाला होता. असा हा चहा पोह्याचा कार्यक्रम चहा वर निपटला. संदीपने गोंधळून जाऊन घराकडे धूम ठोकली .
मोहिनी राजे पाटनुरकर
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
खूप छान पण संदिप ला राग येण्यासारखं अस काही नव्हतं