दिस जातील दिस येतील-शापित-रसग्रहण-song review in marathi
दिस जातील दिस येतील-शापित-रसग्रहण-song review in marathi

दिस जातील दिस येतील-शापित-रसग्रहण-song review in marathi

दिस जातील दिस येतील-शापित-रसग्रहण

१९८२ साली आलेला  शापित- सिनेमाचे नाव बरेच काही बोलून जाते.दिग्दर्शन राजदत्त यांनी केले.
गरिबीचा शाप असलेले जोडपे.दिग्दर्शन राजदत्त यांनी केले.
त्यातील दिस जातील दिस येतील…हे गाणे.
लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसात ज्यांनी संघर्ष  अनुभवला ते या गाण्यातील शब्दांबरोबर पटकन समरस होतात.हे गाणे अनेकांना जवळचे वाटते
गाण्यात गरिबीच्या वेदना आहेत पण हे दिवस संपतील हा विश्वासही आहे.
चहूबाजीने अंधार दाटला.प्रकाशवाट हरवली.सूर्य किरणे नशीबी नसलेले,नैराश्यामध्ये आशेची किरणे शोधणारे गरीब पण एकमेकांवर प्रेम करणारे,एकमेकांचा आधार बनलेले  जोडपे.
दोघांच्या आयुष्यात त्यांचे बीज जन्म घेणार असते,
दोघांच्या सूकत जाणाऱ्या आयुष्याला उमेदीची,स्वप्नांची पालवी फुटणे सुरु होते.
सुख आणि  समाधान नक्की  कशात आहे  याच्या शोधात मनुष्याची उभी हयात जाते.पण ही दोघे गळक्या झोपडीतही सुखाचे पांघरुण ओढून उद्या नवीन पहाट उगवणारच, उदरी जन्माला येणारे बाळ सुखाचे माप घेऊनच येणार या विश्वासात आहेत.
एकमेकांवर जीवापाड प्रेम असले तर पती-पत्नीचे नाते किती सुंदर असू शकते हे गाणे ऐकतांना जाणवत राहते.
नायकापेक्षा नायिका जास्त आशावादी आहे.नायकाच्या मनी निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे देतांना तिचा आशावाद,तिला असलेली प्रकाशाची आस,आणि  आयुष्यात असलेला अंधार  दूर होणार हा तिचा ध्यास गाण्याच्या प्रत्येक शब्दात जाणवतो.
वेदना आणि आशा पेरीत जाणारे,कधी मनाला अस्वस्थ करणारे तर कधी स्वप्न दाखवणारे सुधीर मोघे यांचे  शब्द,सुधीर फडके यांचे अतिशय सुरेल संगीत,आणि गाण्यातील आशावाद वाढविणारे आशा भोसले आणि सुरेश वाडकरांचा स्वरसाज. या सगळ्या घटकांनी हे गाणे  अविस्मरणीय केले आहे.
सोबतीला कुलदीप पवार आणि  मधु कांबीकरांचा वास्तव वाटणारा अभिनय आहे.
तो(नायक)तिला सांगतोय, आपण एकमेकांच्यासोबत आहोत,आता तर घरात नवा जीवही येणार.आपल्या संसाराला अजून काय हवे?
तिचे(नायिकेचे) उत्तर-आपल्या दोघांच्या लेकराला एक नवं घरकुल मिळावं
नव्या घरामध्ये सगळे नवीन राहील
हे वाईट दिस सरतील.नवे उगवतीचे दिवस येतील.सुखा आपल्या दाराशी येईलच.
आता असलेली अवकळा,दारिद्रय  सगळे निघून जाईल.

 

तुझे बीज माझ्या कुशीतून जन्म घेईल.
पण त्याला सगळे मिळेल का कि तोही  आपल्यासारखाच सुखापासून….त्याचा प्रश्न.
तिचे आशावादी उत्तर-
नाही नाही त्याला सगळं मिळेल
नाही मिळाले तर ते मिळवायचे बळ त्याच्यात निर्माण करु.
ढगातुन मेघ बरसतात तसा आनंदाने बरसेल, वाऱ्यासारखा खळखळून हसेल, त्याच्या वाटेवर येणाऱ्या काट्यालाही तो घाबरणार नाही.त्याला ओलांडून सहजतेने पुढे जाण्याचे सामर्थ्य त्याच्यात असेल.
आपले बाळ सगळ्यांना आनंद देईल. तो कुणा सारखा दिसेल ,कुणासारखा असेल सांगू नाही शकणार पण आपल्या जीवाचा तो आरसा असणार हे नक्की.
ही आसवांची रात संपून उद्या आपल्या साठी पहाट उगवेल.
तो विचारतो,
पहाटे दिसणाऱ्या दवासारखे आपले बाळ नाजूक असेल.तो इथल्या निर्दयी गोष्टींंशी कसा लढा देईल?
तिच्यातील उमेद ती हरवू देत नाही.त्याला ती समजवते
मिणमिणता छोटासा दिवाही अंधार नाहिसा करतो.आपले बाळही तसेच असणार. अंधाराला त्याच्या आयुष्यात जागाच मिळणार नाही.
तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं
तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नविन घडंल
घरकुलासंग समदं येगळं होईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
अवकळा समदी जाईल निघूनी
तरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी
मिळंल का त्याला, उन वारा पानी
राहिल का सुकंल ते तुझ्या माझ्या वानी
रोप आपुलच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं
ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखविल, काट्यालाबी खेळविल
समद्या दुनियेचं मन रिझविल त्यो
आसंल त्यो कुनावानी, कसा गं दिसंल
तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल
उडूनिया जाईल ही आसवांची रात
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहांटच्या दंवावानी तान्हं तुजं-माजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव
प्रिती

प्रिय वाचक,तुम्हीही तुम्हाला आवडणाऱ्या गीताचे रसग्रहण शब्दपर्णवर पाठवू शकता.

Email-shabdaparnamarathi@gmail.com

शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहिते रहा…..

 

8 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!