हाफ टिकिट-व-हाडी कथा
ज्योती रामटेके
संध्याकाय झाली. गावातल्या पारावर गावातले म्हातारे गप्पा गोष्टीत गुंग हायेत. सदा धावत आला.. आबाजी मले पैसे पाहिजे पिझ्झा आणाले. गण्याची गाडी हाये बात येतो.
आता हे कोणत धतींग व्हय.?पिझ्झा कायच नाव हाये बापा म्या त आयकल नाही अजुन माया जिंदगानीत.अभ्यासाच हाये का काई.
आबाजी..जरा आमास शहरातुन फिरुन या. खामगावले जात जा.नीरा दिवसभर पारावर बसुन रायता. तुमच्यापरिस आजी बरी हाये. सबन माहीत हाये तिले.खामगावाले बचत गटाच्या कामाले गेली की बम पिझ्झा काय ..पाणीपुरी काय खावुन येते . तुमाले साधा पिझ्झा माहित नाई. तुमाले ते मोमोज माईत हाये काय.. आजी ते बी खाते मस्त.
बाबु.. तुया आजीच मले नको सांगु. लग्नापासुन माया डोक्यावर त बसली आहेच ते. अन सरकार बी त्यायच्या बाजुन हाये. काय..काय स्किमा काढल्या बायासाठी. अरे तुया आजीजवळ माया पेक्षा जास्त पैसे रायतात. बचत गटान त कहरच केला. अन आता काय त एसटीची बी मजा. तुले माईत नाही बाबु. तुई आजी किती खतरनाक आहे त.तिच्या कावान दिवसभर या पारावर रहा लागते.बर तुयी आजी आली का गावावरुन. तिचा एक पाय घरात अन एक पाय एसटीत असते आता. तुई आई आली काय बोरीवरुन . आजकाल कोनाले काई मनता येत नाई बापा.सदा ,आता जेवाच काय करायचं रे बाबा. महिन्यातून पंधरा..वीस दिवस दोघी गावाले फिरत रायतात
सरकारनं अर्धी तिकीट करुन मानसायचा कोणत्या जन्माचा बदला घेतला काय माईत.
काय झाल गा..सखाराम..गंगारामन आवाज दिला. ये बस..
काय सांगु तुले तुया वैनीच. अरे सरकारन त्यायला अर्धी तिकीट केली अन् घराच पांदान वाजल मायावाल्या.
एक कार्यक्रम नाही सोडत ते. नीरा जायची करते गावाले. तिले कुठ चालली म्हणून बी इचारता येत नाई.आंगावर धावते. आपल्या गावात ते रातची हल्टींग एसटी असते त्याचा कंडक्टर मी दिसलो का हासते. कालच मले म्हने कस..काय आबाजी.. तुमी बी फिरत जा आजीसोबत.काय करता घरात. मले त असा राग आला.आता तु मले सांग एवढा उनाया तपुन रायला अन जवळ तुया वैनीसारखा वीस्तव घेउन कुठं जाऊ मी. त्या एसटीत बी भांडन करते राज्या जागेसाठी. म्या काई म्हटल का आंगावर धावते. मागच्या खेपिले तिच्यासाठी गेलो होतो मी.
लय गर्दी होती एसटीत.एका बाईले मी बसा म्हटल अन हिले सरक म्हनल जरासी त बापा हिन जे भांडन चालु केल विचारु नको.ते बाई माया ओळखीची ना पाळखिची. मले म्हने कसी कुठे भेटली हे अवदसा.. बाजारात भेटली वाटते. लय घरोबा दिसुन रायला. सांग आता काय म्हनु बुढिले.. असी लाज वाटे मले पन काय करत मुकाट्यान पहा लागते. गावाले गेली की करमत नाही आणि घरी असली का जमत नाई असी गत हाये आमची. पन काई बी असो ते असली का भाकरतुकडा भेटते. घोटभर च्या भेटते.
आतालोक बर चालु होतं .तिकिटा वाढल्या म्हणून कुठं जा साठी मागपुढ करे. आता तर नीरा पत्रिकेची वाट पाहत रायते. नाई आली पत्रिका त तो मुबाईला हाये आग लावाले. मले काई पैसे मांगत नाई .वावरात जाते.तिचा पैसा राखुन ठेवते. तिच पावून सुन बी गावाले जाते. तिच माहेर बी जवळच हाये.वाढदिवस,मरन, तेरवी काहीबाही चालुच रायते.माय पोरग बबन बेज्या कावल. दोघीही जरास आयकत नाई.. हे पोरग सदा अस आचरट..बाचरट खाते. मले त जेवण पाहिजे.. मी भाजी करतो आणि बबन पोया करते. बबन्याची बायको त अजीबात आयकत नाई त्याच.
अरे पन सखाराम त्या दोघीच तर जरास पटत नाई मग सोबत कशा जातात त्या.
अरे.. गंगाराम तुय खरं हाये.. दोघी एकमेकींले पाण्यात पायतात. जरास पटत नाई दोघीच. नीरा कचाकचा भांडत रायतात दोघी. दोघीच्या गनगोताचे गाव जवळ जवळ हायेत.बुडीले लिहता वाचता येत नाई. मागल्या वर्षी बायान बचत गट चालू केला. माई सुन अध्यक्ष हाये त्याची. बुढिले काम पडलं की कर्ज काढुन देते. त्यातले काई पैसे सुन ठेवते आपल्याजवळ. तवापासुन दोघी चांगल्या रायतात.
बुढीले ते चक्करची बिमारी लागली तवापासुन सुनेला सोबत नेते.सुन तिच्या माहेरचे कार्यक्रम करते आणि तुई वैनी तिच्या नातेवाईकाचे.अन आमी तिघ घरी रायतो.
अरे सखाराम आपल्या सबन गावात असच चालु हाये. गावातले मानस घरी अन बाया बाहेरगावाले.माया घरी बी असच सुरू हाये.मी घरी रायतो अन तुयी वैनी सबन लग्न येव पार पाडते. थैली भरुन ठेवते.पत्रीका.. फोन आला की निघाली.तस बी या वयात मले कटाया येते कुठ जाचा
देवान त्यायला लय शक्ती दिली हाये. घर लेकर नाते गोते सबन त्यायला सांभाळता येते.कोनत्या गावावरुन आल्यावर आपल्याले हाती पाणी पाहिजे. त्या पदर खोचून कामाले लागत्यात. त्यायची बरोबरी आपन नाई करु शकत बापा. आतापर्यंत आपण नीरा त्यायच्याकडुन कामाची आशा केली. लय केलं रे त्यायन संसारासाठी. कुठं जान नाई येन नाई शेतातले काम घर सांभाळून घेन तोंडाचा खेळ नाही. जाऊ दे.. फिरु दे वैनीले मनाजोग..
जग लय समोर गेल राज्या आपन अजुन बी त्याच डबक्यात हावो. बाईचा जन्म नीरा सैपाकासाठीच हाये असी धारना आपन करुन घेतली…
क्रमशः
पुढील भाग वाचा खालील लिंकवर
सखारामची बुढी घरी आल्यावर काय होईल…वाचा पुढील भागात.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/
,मस्तच jamli
सुंदर हास्य कथा, वर्हाडी कथा
मस्त वर्हाडी कथा मालिका
छान लिहिली
अप्रतिम