कवींचे आश्चर्य वाटते.आपल्या सगळ्या भावनांना शब्दात तोलणे कसे बरे जमत असेल त्यांना?
सर्वसामान्यांच्या मनातील एकेक भावना चिमटीत अलगद पकडायची आणि शब्दांच्या माळेत गुंफत जायची.गुंफण पण अशी करायची कि वेगवेगळ्या जीवांना
” हे तर माझ्याच मनातले”
असे वाटत रहावे.
प्रेमावर प्रेम करणारे कवी मंगेश पाडगावकरांनी लिहिलेले
लाख चुका असतील केल्या ….हे गीत अरुण दातेंच्या हळूवार सुरात ऐकतो तेव्हा कित्येकांच्या काळजात कळ उठल्याशिवाय राहत नाही,
मंगेश पाडगावकरांच्या एकेक शब्दातील करुण भाव संगीतकार यशवंत देव यांनी अरुण दातेंच्या सुरांमधून रसिकांपुढे आणला आहे.गीतातील शब्द आणि संगीताने जणू सुरांनाही भिजवले.
गीताची सुरुवातच अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी…या ओळीने होते.
त्याची तिच्यावर असलेली प्रीत दाखवायला ही ओळच किती सक्षम आहे.
प्रेम करतांना काही चुका होतात त्याची शिक्षा आजन्म भोगणारा प्रेमी तिला सांगत आहे,कबुली देत आहे,आर्जव करीत आहे.
मी चुका केल्या पण तेवढेच प्रेमही केले ना. त्या प्रेमाचे मोल काहीच नाही का?
प्रियकर प्रियेची क्षमा मागतो आहे.
मी तुझे असंख्य अपराध केले असतील पण तुझ्या वर प्रीतीही तेवढीच केली. प्रिये मी अखेरपर्यंत तुला हेच सांगत राहणार.
ह्या निर्दयी जगात माझ्या भावना कोण समजून घेणार? माझे तुझ्या वरील प्रेम व्यक्त होण्याआधी,फुलण्याआधीच ते कोमेजले.
सुखासुखी कुणाला गाणे सुचत नाही.त्यासाठी तुम्हाला दुःखाच्या डोहात जावे लागते,विरहाची व्याकुळता, दुराव्यातील दुःख अनुभवावे लागते.
सगळे रितीरिवाज,बंधने तोडून बेभानपणे नदी सागराशी एकरुप होण्यासाठी धाव घेते तेव्हा तिला पुढे काय होणार माहित नसते.ती सागरापर्यत पोहचणार कि मिलनाच्या अधीरतेने निघालेली ती अर्ध्यावाटेवर संपणार याचा जराही विचार न करता ती केवळ सागरावरील प्रेमापोटी त्याच्याकडे धाव घेते.
वाऱ्याचा वेग वाढला कि माती सगळी ताकद एकवटून आभाळाला भेटण्याचा प्रयत्न करते.
नदी सागराकडे आणि माती आभाळाकडे मिलनाची आस मनी बाळगून धावतात.
मिलन न होण्याची शक्यता त्यांना घाबरवत नसणार का?
नक्कीच.पण प्रेमाला पूर्णत्व मिळण्यासाठीचा हा हट्ट असतो.
प्रेम हे काटेरी फुल आहे ज्याचा गंध दूरवर पसरतो पण त्या प्रीतफुलाजवळ मात्र फक्त काटे असतात.
पण तरीही हे फुल सोडवत नाही. तुझ्या पर्यंत पोहचण्यासाठी मृगजळासारखा ह्या गंधाचा मी पाठलाग करत राहतो.
माझे व्याकुळ सुरांनी भरलेले हे गीत माझ्या मनातील तुझ्या बद्दल असलेली भावआवर्तने आहेत.माझी तुझ्यावर असलेली प्रीत आहे.कधी तुझ्या कानी माझे हे गाणे पडले तर फक्त एकच कर.माझ्यासाठी दोन तरी आसवे गाळ.
माझ्या मनाचे गुज तुझ्या पर्यत पोहचवण्यासाठीच हे गीत,हे शब्द आहेत.
अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी !
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती !
इथे सुरु होण्याआधी संपते कहाणी !
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतील पाणी !!
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती !!!
सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे !
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे !!
एकदाच आभाळाला अशी भिडे माती !!!
गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे !
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे !!
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी !!!
आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी !
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी !!
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती !!
प्रिती











Wah khup chan
खूप छान
मस्त
अप्रतिम.
अप्रतिम गीत आणि समीक्षण सुद्धा
अप्रतिम ताई 👌