प्रेरणादायी कथा-सापडलेले कौशल्य
 प्रेरणादायी कथा-सापडलेले कौशल्य

 प्रेरणादायी कथा-सापडलेले कौशल्य

प्रेरणादायी कथा-सापडलेले कौशल्य

…….आपले सादरीकरण संपवून नचिकेत ने जमिनीवर उडी टाकली आणि दोन्ही हात वर करून कमरेत थोडे वाकून त्याने प्रेक्षक व परीक्षकांना अभिवादन केले… पसंतीच्या टाळ्या प्रेक्षकांमधून ऐकू येत होत्या…

……..5.30 च्या गजराने नचिकेत
खडबडून जागा झाला ..

ती स्पर्धा त्याला स्वप्नात दिसत होती तर …..तो थोडा सुखावला, त्याने स्वतःकडे पाहीले, पण क्षणभरच…लगेच त्याला स्वतःचे आवरून कंपनीत पळायचे होते.

दोन मिटिंग, एक ऑडीट,त्याच्या डोक्यात विचारक्र वेगाने फिरू लागली.
आजचे रूटिन काम,ऑडीट त्याने संपवले, आणि नेहमी प्रमाणे घरी येऊन,थकून बेडवर पडला.

आज मिटिंग मधे सँडविच वगैरे खाल्यामुळे भूक तशी नव्हतीच, तसाच झोपी गेला.
सकाळी जरा उशीराच जाग आली, रविवार होता,त्यामुळे तो जरा जास्तच वेळ लोळत पडला होता.
स्वारी आज जरा खुषीत होती, आज जरा योगासने करावी असे त्याला वाटले.
नाही तरी आताशा त्याला वेळ मिळत नव्हता, आज जरा सगळे जुळून आले होते.

तो पटकन उठून तयार झाला…हाॅल मधेच सतरंजी टाकली, मोबाईलवर गुलामअली ची गझल लावली, आणि वाॅर्मअप सुरू करणार होता, तेवढ्यात त्याची काॅलेजवयीन मुलगी जवळ आली

बाबा आज मला गाडी शिकवा…खुप दिवसांत नाही गेली प्रॅक्टीसला….

असा गोड हट्ट करू लागली, तिच्या हट्टापूढे कोण काय करणार!!!
योगासनाचा बेत रद्द करून तो तिला घेऊन गाडी शिकवायला निघाला.
पूढचे 2 तास मग गाडी शिकवणे चालवणे यात गेले. मुलगी नेहाचा आनंद, ऊत्साह पाहून तो मनोमन सुखावला होता ,घरी आल्यावर सौ. म्हणाल्या

आज संध्याकाळी आपण काही किरकोळ खरेदीसाठी बाहेर जाऊ.
तो येण्यास तसा तयार नव्हता, कारण आज 5 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते, त्या मिरवणूकांमूळे रस्त्यावर खुप गर्दी असणार होती.
पण सौ. म्हणाल्या.

“काही होत नाही, अॕक्टिव्हावर जाऊ, ”

दुपारी झोप झाल्यानंतर ते बाहेर पडले, यथावकाश त्यांची खरेदी झाली….सौं ची स्वारी खूषीत होती, कारण किरकोळ खरेदी च्या नावा खाली त्यांना एक ड्रेस मिळाला होता. नचिकेतला ही घे म्हणाल्या पण त्याचे आज कशातच मन लागत नव्हते. त्याला हातातून काहीतरी निसटून गेल्यासारखे वाटत होते. येताना त्याने स्कूटर तिच्याकडे दिली. तो मागे बसला.
येताना व्हायचे तेच झाले, मिरवणूकांमुळे ते गर्दीत अडकले, अतिशय हळूहळू ते पूढे सरकत होते.
शेजारून एका मिरवणूकीची पथके पुढे जात होती.इतक्यात त्याला ते पथक दिसले……त्याला भानच राहीले नाही….तो कधी स्कूटरवरून खाली उतरला, त्या पथकात गेला….त्याने त्यांच्या वस्तादांची परवानगी मागितली नजरेच्या खुणेनेच…..

वस्ताद अर्थातच वस्ताद होते…

त्यांनी क्षणार्धात ह्याची अवस्था ओळखली….आणि हात वर करून परवानगी दिली.
मग काय!!!अतिशय सराईतपणे त्याने त्या मल्लखांबावर आपले कौशल्य दाखवण्यास सूरूवात केली. कोणाला काही दाखवायचे, सिद्ध कराचे असे काहीही त्याच्या मनात नव्हते.

त्याच्या हातातून जे निसटत चालले होते…ते हेच होते….

बेभानपणे तो मल्लखांबावर कसरती करत होता….अनेक आसने / पकडी…त्याने सादर केल्या…..त्यातील काही तर अशा अवघड होत्या की वस्तादांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या.

…….सादरीकरण संपवून त्याने खाली उडी टाकली….हात वर करून सगळ्यांना अभिवादन केले……..खूप टाळ्या वाजत होत्या……..पण ह्यावेळी ते स्वप्न नव्हते…..प्रत्यक्षात होते…..

खूप मेहनतीने मिळवलेले कौशल्य अजूनही आपल्यात आहे……ह्यची जाणीव होऊन त्याला खूप हुरूप आला.

एक मोरपिस जे आयुष्य नावाच्या पुस्तकात कोठेतरी लपले होते….ते असे अचानकपणे त्याच्या हातात आले……ते ऊराशी कवटाळुनच तो तिच्यापाशी आला…..हे मोरपिस परत हरवू द्यायचे नाही, हे पक्के करून…………………………..

आता मी नौकरी सोडून पूर्णवेळ मल्लखांब प्रशिक्षक होणार असे त्याने जाहीर केले…….
मनातले मोरपीस …..पुर्ण होण्यास …कुठेतरी ..गणपती बाप्पांचा आशिर्वाद लाभला होता तर

वैशाली जोशी खोडवे

https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील कविता

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!