तुटले चिमणे घरटे -marathi sad story
तुटले चिमणे घरटे -marathi sad story

तुटले चिमणे घरटे -marathi sad story

तुटले चिमणे घरटे -marathi sad story

पहाटेच अंजलीला श्वेताचा फोन आला
रमा गेली आज.
जेमतेम चाळीशी उलटलेली रमा आज सर्व अतृप्त इच्छा सोबत घेऊन गेली. बातमी तशी अपेक्षितच होती पण इतक्या लवकर हे अनपेक्षित होते.
परवाच तर तिचा Good morning चा मैसेज आला होता.
अंजली निघाली लगेच.
अंजली आणि रमा दोघी एकाच काॕलेजमध्ये होत्या.
दिवसभर सोबत राहून जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या.
रमा अंजलीजवळ रोज तिचे मारले जाणारे मन मोकळे करायची.
अंजलीला वाईट वाटायचे ऐकून.
ती समजवायची तिला,रमा तू कमावती आहे.नवऱ्याएवढेच पैसे तू कमावतेस. करत जा ना तुझ्या मनाप्रमाणे खर्च.
कधी कधी रमालाही वाटायचे
माझेच तर पैसे आहेत.माझ्या इच्छेनुसार मी खर्च करावेत.
पण संदीपला राग येईल म्हणून ती आवर घालायची इच्छेला. संदीपचा राग अनुभवला होता तिने.
सगळे घर डोक्यावर घ्यायचा तो राग आला तर.
संदीपमध्ये बदल होईल ही आशाही होती तिला.
अंजलीला एकेक गोष्ट आठवू लागली.

एका सरकारी काॕलेजमध्ये रमा प्राध्यापिका होती.
तिचा नवरा संदीप ही एका काॕलेजमध्ये प्राध्यापक.
सर्व असूनही काहीच नसणे
जगणे किती विचित्र असू शकते याचे उदाहरण म्हणजे रमा आणि तिचे आयुष्य.
काॕलेजमध्ये असतांना सर्वसामान्य मुलींप्रमाणेच स्वप्ने बघणारी रमा.आईवडिलांनी तिला साजेसा जोडीदार शोधला.दोघांचे लग्न झाले.संदीप मुंबईच्या काॕलेजमध्ये प्राध्यापक होता.छोट्या शहरातील रमा मुंबईसारख्या महानगरात आली.मोठ्या बंगल्यातून वन रुम किचनमध्ये आली.संसार सुरु झाला. मुंबईत एकाच्या पगारात भागणार नाही म्हणून रमानेही नौकरी शोधली.सरकारी नौकरीसोबत सरकारी क्वार्टरही तिला मिळाले. संदीप रमा तिथे राहायला गेले.दिवस जात होते.संसार बहरत होता असे म्हणण्यापेक्षा वाढत होता.

पहिले बाळ जन्मले.दोन वर्षांनी दुसरे.
रमा आणि संदिप दोघांचेही स्वभाव भिन्न.
रमा अतिशय हौशी.घर सजविणे,फिरणे,नाटक बघणे यात तिला आनंद मिळायचा तर संदीप तेवढाच अरसिक. आणि पै पै चा हिशोब ठेवणारा होता.
प्रयत्न करुनही स्वभावामुळे ताळमेळ बसवणे कठीण होत होते.
मुले मोठी होत होती. रमाला मोठे घर हवे होते.मुलांना अभ्यासासाठी वेगळ्या खोल्या असाव्या. तिची आणि संदीपची वेगळी खोली असावी.  असे खूप  वाटायचे तिला. पण संदीप मनावर घेत नव्हता.
आता त्याने पी.एच.डी करायचे  ठरवले होते.तो त्यात बिझी झाला. रमा एकटी पडली घरात. आधीच अबोल,निरस असणारा संदीप आता जास्तच  एकटा राहायला लागला.
तो घरी असणे,नसणे सारखेच वाटत होते.
रमाला संदीपबरोबर वेळ घालवावा,त्याचा हात हातात घेऊन गप्पा कराव्या,त्याच्या  खांद्यावर डोके ठेवावे.त्याने  आधार द्यावा. असे खूप वाटायचे मनातून पण नाही झाले असे कधी.
ना कधी हातात हात घेता आला
ना कधी त्याच्या खांद्यावर डोके टेकवता आले.
त्याला बसवून समजवावे असेही यायचे मनात.पण तो काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत राहायचा नाही.
मुळात तो चुकतो हेच त्याला कळायचे नाही.

शरीराचा स्पर्श,मनाचा स्पर्श दोन्हीत रमा अतृप्त होती.
मनाविरुद्ध जगणे सुरु होते पण दिवस पुढे जात राहिले.आता मुलेही मोठी होत होती.दोन बेडरुमचे घर घेऊ म्हणून हट्ट  करायला लागले.

रमाला प्रत्येक गोष्टीत तडजोड करण्याची सवय झाली.  इच्छाही मरतात याचा अनुभव  रमा घेत होती. तिच्या सगळ्या इच्छा आतल्या आत गोठल्या.
मध्ये मध्ये तिचे  बीपी वाढायला लागले.
संदीपचे पी.एच.डी. संपले होते.आतातरी तो घरात लक्ष देईल असे रमाला वाटायला लागले.
रमाची तब्येत वारंवार बिघडायला लागली.आधी तिला  खूप तणावात राहत असल्यामुळे असे होत असेल असे वाटले.पण जास्त त्रास झाला म्हणून डाॕक्टरकडे गेली.काही टेस्ट केल्या.रमाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या.
रिपोर्ट बघून रमा,संदीप दोघेही हादरले.
रमाने एकदोन दिवस काळजीत घालवल्यानंतर  हिमतीने दुखण्याचा सामना करायचे ठरवले.
संदीप दोन दिवसातच खचला होता.
रमाशिवाय घर? शक्य नव्हते.
रमाला काॕलेज सांभाळून दवाखान्यात test करायला जावे लागायचे. जेवढी जमेल तेवढी संदीप मदत करायचा आता. पण सगळे अधांतरी वाटत होते.
जगण्याच्या दुर्दम्य इच्छेमुळे रमा हळूहळू बरी होत होती. मुले अजून लहान होती. त्यांच्यासाठी तिला ठीक व्हायचे होते.
हळूहळू रमा ठिक होत होती .नेहमी डायलिसीस करावे लागत होते.संदीपची मदत होत होती.
रमा काॕलेज,घर,मुले  रुटीन सांभाळत होती.
संदीप झेपेल तेवढे करायचा प्रयत्न करायचा पण त्यात कर्तव्याचीच भावना जास्त असायची.प्रेमाचा ओलावा फार कमी असायचा त्यात. जसजसे दिवस जात होते रमाचा आत्मविश्वास वाढत होता.
मी जगणार. अगदी म्हातारी होईपर्यंत जगणार…
असेच तिला वाटत होते.
कोणी मैत्रिणी,शेजारी पाजारी कुठे कुठे फिरायला गेले कि तिलाही संदीपसोबत, मुलांसोबत फिरायला जावे असे वाटत होते. पण आधी संदीपच्या रूक्ष स्वभावामुळे आणि आता तब्येतीमुळे शक्य व्हायचे नाही. जवळपास कुठे  जावे तर तिथेही संदीप यायला तयार नसायचा. रमाचे झुरणे सुरुच होते.
त्याच्या एका स्पर्शासाठी तळमळायची ती.त्याने  एकदा डोक्यावर तरी हात ठेवावा पण संदीपला नाही जमले कधी.
संदीपच्या लक्षातही यायचे कि नाही कोण जाणे.
रमाला मनासारखे काही मिळाले नव्हते तरीही तिला जगायचे होते. पण मनाची उभारी आणि  थकलेले शरीर यांची सांगड लागत नव्हती.
एवढ्यात जास्तच आजारी राहायची रमा.
तरीही मरणाचे विचार कधीही तिच्या मनात यायचे नाही. कायम आनंदी दिसण्याचा प्रयत्न करायची.
मुलांसोबत हसतखेळत राहायची.

सध्या काॕलेज बंद होते महिनाभर. परवा फोनवर बोललो बराच वेळ.आणि  आज रमा गेली हृदयविकाराने.
अंजली पोहचली रमाच्या घरी. घरात गर्दी होती.समोरच रमा होती. तिच्या बाजूला बसून संदीप आणि मुलांचा आक्रोश चालला होता. 

रमा एकदा तरी ऊठ,जागी हो. मुलांचा विचार कर
 
संदीप हतबलतेने,अगतिकतेने रडत रडत बोलत होता.अंजली संदीपला सांत्वना द्यायला त्याच्याजवळ बसली. संदीपने तिला बघून टाहो फोडला.

‘अंजली बघ  तुझी मैत्रीण. ती अशी मला एकट्याला टाकून नाही जाऊ शकत.मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय.’

जीव नसलेल्या रमाचा हात घट्ट पकडला होता संदीपने. जो हात संदीपने पकडावा म्हणून  रमा आयुष्यभर तळमळत होती तो संदीपने आता ती गेल्यावर पकडला होता.

ती सगळे सोडून गेली अंजली. नवीन,मोठ्या घरात तिला राहायला जायचे होते. मुलांना सेटल झालेले बघायचे होते.  तिच्याशिवाय आम्ही….नाही राहू शकणार.
मी मोठे घर बुक केले तिच्यासाठी.  घर पूर्ण तयार झाल्यावरच सांगायचे ठरविले होते.
आमचे घरटे तुटले अंजली’.

अंजली संदीपचे शब्द ऐकून सुन्न झाली.हे नवीनच रुप होते संदीपचे.
रमाचे अंतिम विधी सुरु झाले. संदीपची अवस्था फार केविलवाणी झाली होती. तिला घरातून बाहेर नेऊ नका म्हणून आक्रंदत होता.मुले आईविना केविलवाणी झाली होती. मुलांसाठी जगलेली रमा मुलांना अनाथ करुन गेली होती.
सर्व विधी संपले होते.रमा घरातून कायमची बाहेर पडली.
अंजलीही थोडावेळ थांबून निघाली. घरी वापस येतांना ती संदीपचा विचार करत होती. 

अंजलीला त्याचे हे रुप नवीन होते.
किती उशीर केला होता संदीपने .
रमा सगळे समज,गैरसमज सोबत घेऊन गेली होती.
संदीप माझ्याशिवाय राहू शकत नाही हे  तिला ती असतांना कळले असते तर आनंदात न्हाऊन गेली असती रमा.पण…चिमणे घरटे तुटले होते…….
 
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
 
Email
whatsapp no,
9867408400
 
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
 
 

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

 
 
 
 
 
error: Content is protected !!