स्वयंसिद्धा भाग १२
स्वयंसिद्धा भाग १२

स्वयंसिद्धा भाग १२

माधवला औरंगाबादला काम मिळणे अशक्य आणि अशक्यच होतं. सुप्रियानी साडीचा घरगुती व्यवसाय सुरू केला. आई बाबा, सासु सासरे अधुन मधुन येऊन जात. 

स्वयंसिद्धा भाग १२

 

अस्तित्वाचा लढा
माधव जमिनीवर धाडदिशी कोसळला होता.  कुठलीही हालचाल नाही. कोणताही प्रतिसाद नाही,  तिच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. 
अचानक अशी संकट का उभी राहतात? 
नशिबाला तरी किती म्हणून दोष द्यायचा?  रोज एक परीक्षा… 
धावपळ तीच पहिले सारखी फरक फक्त एवढा होता की त्यावेळेस सुप्रिया माधव सोबत नव्हती.  आणि पहिल्या अटॅक नंतर सगळ्यांच्या लक्षात येऊन उपचार मिळेपर्यंत बराच कालावधी गेला होता.  
क्षणाचाही विलंब न करता आता मात्र लगेच औरंगाबादच्या माणिक हॉस्पिटलमध्ये माधवला दाखल केलं .  
 तो पहिले सारखाच पण मायनर अटॅक होता.
 औरंगाबाद मध्ये येऊन जेमतेम एक वर्ष झालं होतं.  वर्षात माधवला आलेला हा दुसरा अटॅक,  पण तात्काळ उपचारामुळे लवकर सावरला. चार दिवस हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये होता. पुन्हा तीच पळापळ. तीच मानसिक अवस्था. सावरतोय म्हणताच कधी पडतोय तेच कळत नव्हतं.
 डॉक्टरांनी सुप्रियाला माधवची विशेष काळजी घ्यायला सांगितली.  त्याला असे झटके आता अधून मधून येत राहणार असं सांगितलं , तशी तिनं तिची मानसिक तयारी करवून घेतली, आता इथून पुढचा प्रवास खडतर आहे याची सूचना होती ती असाच काहीसं…
असं काय लिहिले सटवाईनी सुप्रियाच नशीब. सर्वस्वी दत्तात्रेयाच्या मर्जीवर होईल असं म्हणत  थोडी सावरली . नशिबाची परीक्षा की थट्टा ? नशिबात लिहिलेले  कधी बदलत नाहीत पण आपण जर निर्णय घेतले तर कदाचित नशीब बदलू शकतो.  
झालं …तेव्हापासून सुप्रिया आणि माधवच्या आई-वडिलांनी नांदेडला स्थायिक होण्यासाठी तगादा लावला.  एवढा तरुण मुलगा ,त्याची ही अवस्था बघवत नव्हती त्यांना..आणि त्याला या परिस्थितीत सोडून जाणं हे ही योग्य नव्हतं. त्यांचही योग्यच होतं,  सगळ्यांचा जीव टांगणीला लागतो अशा वेळेस . 
म्हातार वय ,  त्यांची अजून काही पचवायची ताकद उरली नव्हती . एवढा तरुण मुलगा आपल्या नजरेसमोर अधू व्हावा, हे दुःख त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. आता काहीतरी निर्णय घेणे आवश्यक होते.
निर्णयाची सुई सुप्रियाच्या डोक्यावर येऊन थांबली होती.
‘ भाग्य माझ्या हातात नाही पण निर्णय तर आहेत ना ! मी ही परिस्थिती बदलून दाखवीन ‘. सुप्रियानी स्वतःलाच वचन दिलं.  नांदेडला स्थायिक होण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालाच अखेर .  आणि एखाद्या महिन्यातच ते नांदेड ला राहायला आले. औरंगाबाद मध्ये माधव सुप्रिया जितक्या लवकर रुळले तितकेच नांदेडला नव्याने रुळायला त्यांना वेळ लागला. मुलींच्या शाळा नवीन म्हणून त्यांनाही तिथे रुळयला वेळ  लागला. मुली नांदेडच्या शाळेत जायलाच तयार होईना.  त्यांची कशी समजुत काढावी ? हाही एक प्रश्न होताच तिचा . 
 मधल्या काळात सुप्रियाच्या दिर जावेनी निराळं बिऱ्हाड थाटलं होतं . सध्याच्या घरात सासू-सासरे दोघेच सहाजिकच माधवचा परिवारही तिथेच राहणार. नांदेडच्या घराचे बांधकाम जुने होते तिथे आल्यावर आधी  घराची डागडुजी  करून घ्यावी लागली.
माधवला सध्याच नोकरी लागणे किंवा दुसरीकडे काम करणं अशक्य होतं.  म्हणून घराच्या समोरच्या रिकाम्या जागेत छोटसं दुकान काढून देण्याचा सासऱ्यांनी ठरवलं . सुप्रिया होतीस त्याच्या सोबतीला . सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत मग ते वृक्ष असो की मायबाप.
सासऱ्याचं पेन्शन,  थोडीफार शेतीची मिळकत यात घर खर्च निघत होता.  सासरे पाठीशी होते तोपर्यंत काही काळजी नव्हती. पण आपण रिकामेच बसतो हा विचार सुप्रियाला स्वस्थ बसू देत नव्हता. आपल्याही शिक्षणाचा आता तरी फायदा व्हावा, असं तिला आता वाटू लागलं होतं.  मुली मोठ्या होत होत्या तसा खर्च वाढत होता. त्यामानाने मिळकत तेवढीच राहत होती. असे चार वर्ष निघून गेले. 
 माधवची प्रकृती शरीराने ठणठणीत झाली पण वाचा आणि थोडीफार स्मृती मात्र अजूनही नव्हती. प्रत्येक गोष्ट आठवणे खूप त्रासदायक होते. 
 सई म्हणते , ” मी तर बाबांचा आवाजही कधी ऐकला नाही”.बाबाची हाक ऐकण्यास मुली आतुर होत्या . पण…. 
माधव आजारी पडला त्यावेळेस सई खूप लहान होती. सगळ्यांसाठीच माधवचा आवाज कानावर पडायला खूप काळ गेला होता.  बाकीच्यांची ही अवस्था तर खुद्द माधवची कशी असेल  ? त्याच्या यातना भावना त्याला कुणाला बोलूनही दाखवता येत नव्हत्या .  वेदनांना फक्त साथीदार असतात भागीदार नाही.
प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती.
क्रमशः
गाव बदलुन नांदेड या मुळ गावी सुप्रिया माधव परतले. 
काय असेल पुढचं आयुष्य त्यांचं. 
वाचा पुढील भागात.
                          …….. मोहिनी पाटनुरकर राजे
क्रमशः 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!