Hasya-marathi article
हास्य म्हणजे काय ? शरीर शास्त्रज्ञ हास्याची व्याख्या करतात “ गालाचे स्नायू प्रसरण पावल्यामुळे ओठांची विशिष्ठ प्रकारे घडणारी हालचाल आणि चेहऱ्यावरची प्रसन्नतादर्शक स्थिती म्हणजे ”हास्य” कुठे तरी हे वाचले आणि एक मजेशीर विचार मनात आला, बाप रे एवढे जड जड शब्द वाचूनच माणूस हसणे विसरून जाईल.
असो, पूर्वीच्या काळी म्हणायचे हसा आणि लठ्ठ व्हा, पण आता मात्र ते बदलून “हसा आणि निरोगी राहा ” असे म्हणायची वेळ आली आहे. सध्या दैनंदिन जीवन जगताना अनेक प्रकारच्या चिंता, विचार, ताणतणाव याना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आनंदी, समृद्ध व समाधानी जीवन जगणं कठीण झालंय. निर्मळ हास्य हे ताणतणाव कमी करण्याचे उत्कृष्ठ साधन आहे. यामुळे चिंता, निराशा यासारख्या आयुष्य पोखरणाऱ्या गोष्टी कमी होतात.
शरीर निरोगी राहण्यासाठी मन आनंदी हवे, मन आनंदी राहण्यासाठी शरीर सुदृढ हवे,निरोगी हवे.शरीर सुदृढ असावं, मस्त राहावं,आपण जगण्याचा आनंद घ्यावा, दुसर्यालाही तो द्यावा असं सगळ्यांना वाटतं. यासाठी मन शांत व समाधानी हवं. शरीर आणि मन याची प्रसन्नता राखण्यासाठी हास्यासारखा दुसरा उपाय नाही ,सोपा आणि पैसा खर्च करायला न लागणारा. माणूस हा मनापासून हसू शकतो. त्याला पोटभर हसावेसे वाटते पण प्रत्यक्षात त्याला तेवढे हसत येत नाही. हसण्या बद्दलची प्रत्येकाची मते पहिली तरी हसू येते. लहानपणी खळखळून हसणाऱ्या मुलाला पालक म्हणतात,
अरे, असे वेड्यासारखे हसतोस काय? कधी म्हणतात,
उगाच कुणाला हसू नये,तर कुणी गंभीर दिसला कि म्हणतात
,काय रे, हसायला काय पैसे पडतात का? हसण्याविषयीचे हे विचार ऐकले कि कळेनासे होते,हसावे कि हसू नये आणि याचा विचार केला कि आपले आपल्यालाच हसू येते. ते काहीही असो माणसाने नेहमी हसतमुख असावे शांतरसात न्हाल्याप्रमाणे .
लहान मुलाला गुदगुल्या केल्या,नकला केल्या,एखादी आवडणारी गोष्ट मिळाली की ते हसते – समोर आई दिसली तरी ते हसते. मोठी माणसे मोठ्यांदा हसतात वाचताना ,नाटक बघताना ,विनोदी चित्रपट पाहताना. या त्यांच्या हसण्यामागे समज असते , हसण्यामुळे जीवन सुसह्य होते ,मन उल्हासित होते हे मात्र अगदी खरे ! हसणं असं असावं त्यात जीवनाच्या आनंदाचं प्रतिबिंब दिसावं .
थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल हसण्याचेही खूप प्रकार आहेत. सात मजली हसणं ,गालातल्या गालात हसणं ,औपचारिक हसणं ,टवाळी हेतूने हसणं , लाचार होऊन हसणं वगैरे वगैरे …
हास्य हे तसे संसर्गजन्य आणि प्रसरणशील पण आहे बरं का !
एक हसला म्हणून दुसरा हसतो ,हे पाहून तिसरा हसतो आणि शेवटी अनावर होऊन सर्वजण हसतात हा प्रकार शाळेमध्ये पाहायला मिळतो. इतरांकडे पाहून हसणे आणि इतरांसह हसणे हे हि दोन प्रकार आहेत हसण्याचे. पण याचा परिणाम म्हणजे काही वेळा वक्रता येते तर काही वेळा दोष दूर होतात.
अगदी एकांतात आपल्या मनाशी जेव्हा आपण हसतो तेव्हा आपल्या मनात कोणाची तरी , आवडणाऱ्या व्यक्तीची आठवण असते किंवा प्रतिमा असते. हसण्याचे प्रमाण कमी झाले तर माणसाचे आयुर्मान कमी होईल ,आत्महत्येचे प्रमाण वाढेल, ऐन तारुण्यात वार्धक्य येईल.
एकूण काय ,आपले हसणे निर्मळ असावे, त्यात तिरस्कार नसावा ,उथळपणा किंवा अवखळपणा नसावा – दिवसाची सुरुवात जर खळाळत्या हास्याने झाली तर दिवस आनंदात जाईल.
दिलखुलास आणि मनमोकळ्या हास्यामुळे दिवसेंदिवस तरुण होत चालल्याचा प्रत्यय येईल आणि आयुष्याची संध्याकाळ पहाटेसारखी प्रसन्न वाटायला लागेल आणि म्हणूनच हसा आणि निरोगी रहा ,आनंदी रहा.
कवीश्रेष्ठ मंगेश पाडगांवकरांच्या दोन ओळी खूप समर्पक आहेत
आत आपुल्या झरा वाहे निळा निळा स्वच्छंद
जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद
माधुरी जोशी.











सुरेख
खूप मस्त
खूप मस्त