१९ गुंता स्त्री मनाचा
सुमीचा मित्र -दिपक
दरम्यान कार्यालयातील एक सहकारी दिपक एकदा जवळ येऊन म्हणाला,” मॅडम तुम्हाला काही मदत लागली, काही अडचण असेल तर मला निसंकोच सांगा. मला तुमच्या परिस्थितीची जाणीव आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका. मला पण बायको मुले आहेत.”
मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तोच पुढे म्हणाला, तुमच्याबद्दल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सहानुभूती आहे .आम्ही तुम्हाला गेल्या तीन वर्षापासून पाहतोय. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे .माझ्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका प्लीज . मी त्याला माझ्या बद्दल सहानुभूती दाखवल्याबद्दल धन्यवाद दिले.
एकदा माझा लहान मुलगा कॉलेजमधून आजारी पडल्याने घरी आला आणि त्याला दवाखान्यात नेले तिथे डॉक्टरांनी त्याला अपेंडिक्स शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले मी गोंधळून गेले काय करावे ते सुचत नव्हते मला त्या सहकारी मित्राची आठवण आली मी त्याला फोन करून सर्व सांगितले तो लगेच दवाखान्यात आला व डॉक्टरांशी बोलून सर्व बाबी नीट समजून घेतल्या मग आत्ताच शस्त्रक्रियेची गरज नाही असे सांगितल्याने माझा जीव भांड्यात पडला औषध पाणी घेऊन आम्ही घरी आलो मुलगा होईपर्यंत रोज तो घरी येऊन चौकशी करत असेल त्यावेळी त्याचा मला फार आधार वाटला.
त्यानंतर आमची छान मैत्री झाली छोट्या-मोठ्या अडचणी मी त्याच्याशी शेअर करायला लागले.घरी मी एकटी असल्याने त्याच्याशी बोलताना कोणी काही वेगळा अर्थ काढेल अशी भीती वाटे. म्हणून मी एकदा त्याला त्याच्या पत्नीला माझ्या घरी येऊन घेऊन येण्यास सांगितले होते. तसा तो घेऊन आला. माझ्या मुलांशी ओळख झाली. त्याची पत्नी शरीरयष्टीने किरकोळ पण दिसायला सुंदर होती. स्वभावाने पण मनमिळाऊ होती. आमच्या दोघींचे लवकरच परिचयाचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यांना एकच मुलगी होती. माझ्याच मुलांच्या बरोबरीची. आम्ही एकमेकांच्या घरी सणासुदीला जाऊ लागलो. मुले पण छान एकमेकांत मिसळली होती . मला वाटायचे आनंद म्हणतात तो असाच कुठून तरी क्षणाक्षणाला मिळवता आला पाहिजे.
त्यानंतर माझी परत बदली झाली.दिपक ची पण दुसरीकडे बदली झाली.तरी आमच्या संबंधांमध्ये, भेटीमध्ये खंड पडला नाही. एवढेच की आधी सारख्या वारंवार भेटी होत नसत. पण दोन तीन महिन्यातून एकदा मुद्दाम होऊन काही कार्यक्रम ठरवून आम्ही कौटुंबिक भेटी घडवून आणायचो. पण अडचण आली की केव्हाही तो रजा टाकून मला मदत करीत असे.
त्याची मुलगी पण एमबीबीएस ला बाहेरगावी शिक्षणासाठी गेली होती. आताशा तर त्याच्या बायकोची प्रकृती ठीक राहत नव्हती. म्हणून मी पण तिच्या भेटीसाठी जमेल तशी वेळ काढून जात असे. काय आजार होता याचे निदान होत नव्हते. पण तब्येत बरी वाटत नव्हती. डॉक्टरांचा इलाज चालू होता. तो काळजीत पाहून मी दोघांनाही धीर देण्याचे काम करायची. तिच्या साठी कधी घरून खाण्याचे पदार्थ बनवून नेत असे तर कधी त्यांच्या घरी काही बनवून द्यायची. चांगले हसते खेळते घर दुःखात बुडून गेल्या सारखे भासत होते. एकदा त्याची पत्नी सावी म्हणाली माझं काही बरं वाईट झालं तर कसं होईल या घराचं, यांचे.. माझ्या मुलीचे.. मी तिला गप्प करत म्हणाले काही होणार नाही तुला, अगदी ठणठणीत बरी होणार आहेस. धूमधडाक्यात मुलीचं लग्न लावशील. अजिबात काळजी करू नकोस. ती कसनुसं हसली .दिपक तीला म्हणाला काहीही बोलू नकोस. मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो सावि. तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. आणि मी हे का बोलतोय. तू लवकरच ठणठणीत बरी होणार आहेस. हे फ्रुट्स खा बरं आधी.म्हणून त्याने तिला आधार देऊन पलंगावरून उठून बसविले व चिरलेले फ्रुट्स तिला स्वतःच्या हाताने भरवू लागला. त्या दोघांचे प्रेम पाहून माझे मन भरून आले. मी लगेच रुमच्या बाहेर आले व अश्रू पुसले.
क्रमशः
गुंता…पुढील भाग खालील लिंकवर वाचा.
आधीच्या भागाची लिंक
https://marathi.shabdaparna.in/१८-गुंता-स्त्री-मना
कशी वाटत आहे कथामालिका…अवश्य कळवा.
प्रिय वाचक,तुम्हीही लघूकथा,कथामालिका,लेख,रसग्रहण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.