स्वप्न तहानलेले-जिथे जिथे जावे तिथे तुझी आठवण
मुलांना घेऊन आनंदी माहेरी निघाली. कनकच्या आठवणी नकोत म्हणून माहेर टाळणाऱ्या आनंदीला यावेळी मात्र टाळता आले नाही.ती माहेरी पोहचल्यावर काय होते….अजून कोणत्या आठवणी तिच्या मनात पिंगा घालणार आहेत….वाचा खालील भागात….
भाग-४
स्वप्न तहानलेले-जिथे जिथे जावे तिथे तुझी आठवण
ज्योती रामटेके
पहाटे पहाटे आंनदीचा डोळा लागला.
आई,आई पुर्वीने आवाज दिला.
आनंदी खडबडून जागी झाली.
काय ग पुर्वी?
आले का ग मामाचे गाव?
हो, बाळा ते बघ मामाचे गाव. तो वाडा दिसत आहे नं.तेच आहे मामाचे गाव आणि माझे माहेर.
अरे आले पण.म्हणजे आता आपल्याला उतरावे लागेल.मला तर अजून खूप लांब जावेसे वाटत आहे ग आई.
पुर्वी असे नाही होत बेटा. आपले गाव आले कि उतरावेच लागते.बघ किती पटापट उतरत आहेत सर्व. आपल्याला समोर रेल्वे स्टेशनवर उतरायचे आहे. मामा आला असेल.
वाट बघत असेल आपली. आधी बाबाला फोन करते. रात्रभर जागा होता तो. आपण पोहचल्याचे सांगते.
तो बघ मामा, चला उतरा लवकर.
अमेयने गाडीतील सामान उतरवले.भाच्यांना उचलून घेतले.
आनंदीचा हात पकडून उतरवले.
किती मोठे झाली ग दोघेही.
पुर्वी,रुद्र मला ओळखाता नं.
हो मामा.आई फोटो दाखावते नेहमी.
गाडीला खूप वेळ लागला आंनदी.
हो रे दादा.
आमच्यामुळे तुझीही झोपमोड झाली.
झोपेचे काही नाही ग.
बहीण खूप वर्षांनी माहेरी आली त्यातच आनंद आहे.आनंदीला भरुन आले.
बरं धवलला फोन कर. सारखे फोन सुरू होते. तुमची काळजी करत होता.
केला दादा फोन.
चला, घरी बोलू निवांत.
किती तरी वर्षांनी आंनदी माहेरी आली होती. जुन्या आठवणींना उजाळा नको म्हणून ती येणेच टाळायची.कणकचा उल्लेखही नको म्हणून फोनवरही कुणाशी बोलायची नाही.
किती बदल दिसतो रे गावात. हे काय, फ्लॅट पण दिसत आहेत.हा चौक नवीन दिसत आहे. जुनी दुकाने तर दिसतच नाही आहेत.
आंनदी तू किती वर्षांनी आली. काळानुरूप हा बदल होणार.तू जरा लवकर.. लवकर येत जा बरे. मग हा बदल तुला जाणवणार नाही.
आता हेच बघ नं पुर्वी, रुद्र किती मोठी झालीत. काळ भराभर संपतो.कळत नाही.
आता दरवर्षी येत जा माहेरी.आई, बाबा गेले म्हणून माहेर सोडायचे का? तुझ्या मैत्रिणी नेहमी येतात.
अग आपल्या संसारात इतके पण नाही गुरफटायचे कि जुनी माणसे आयुष्यातून बादच करायची.
धवलच्या प्रेमात मग्न झाली आहेस तू. साधा फोन करत नाही मला. मी कधी केला तर नंतर करते म्हणून टाळते.काय झाले तुला?
खरे आहे दादाचे.फोन केला कि आपसूकच कनकचा विषय निघतो.मग पुन्हा, पुन्हा त्याच आठवणी. म्हणून मी फोनवर बोलणे टाळते.
काही नाही रे, वेळच कमी मिळतो. मुलांची शाळा,अभ्यास वेळ कसा निघून जातो कळत नाही. गाडीचा वेग कमी ठेव जरा. इतक्या दिवसांनी आपले गाव कसे दिसते ते बघायचे आहे. मातीच्या पाऊलवाटा आता काॕक्रेटच्या दिसत होत्या.शाळेचा रस्ता दुरुनच दिसू लागला.
अरे, माझी शाळा आली. शाळेच्या बाजूला भले मोठे चिंचेचे झाड होते. मधल्या सुट्टीत दगड घेऊन चिंचा पाडण्याचे काम जोरात चालायचे.
दादा गाडी थांबव थोडा वेळ. शाळेला रंगरंगोटी दिसत होती. दूरवर घरे दिसत आहेत. आधी संपूर्ण जंगलाचे साम्राज्य होते. गेटवर सुंदर चाफ्याचे झाड होते. काय फुलायचे ते. दुपारच्या सुट्टीत वेड्यासारखी फुले वेचायची मी.
झाडाखाली सतत मंद सुवास दरवळत राहायचा. कधी कनक फुले वेचायला मदत करायचा.त्याचे मित्र हसायचे त्याला.
अरे कनक फुले वेचायला तू मुलगी आहे का म्हणून चिडवायचे.घरी येतांना केसात चाफ्याचे फुल माळलेले असायच. बाबा दारातच म्हणायचे.. आपले चाफ़याचे फुल शाळेतून आले वाटते. आंनदी शाळेजवळ पोहचली.ते झाड होते तसेच. त्याचा सुगंधी स्पर्श किती तरी आठवणी ताज्या करुन गेल्या. झाडाखाली फुले पडलेली होती. तिने ते ओंजळीत पकडली. अलगदपणे केसात माळली. मुले हसायला लागली. काय आई.. तुझी वेणी थोडीच आहे फुले माळायला.
आंनदी हसली, अरे हो मी तर विसरलेच. पण माहिती आहे का माझे केस किती लांबसडक होते लहानपणी.घट्ट दोन वेण्या घालायची मी.वाड्यात गेली कि कनक वेणी पकडून लपून जायचा.
मामा हा कनक कोण आहे रे..मुले विचारत होती.आणि हो, बाबा येतांना म्हणत होते, मामाच्या गावाला सुंदर वाडा आहे म्हणून.वाडा म्हणजे काय असते मामा.
दादा हसला.वाडा म्हणजे भले मोठे घर.त्या घराला मागे, पुढे मोठी अंगण असायचे. आता हे अंगण म्हणजे काय रुद्र विचारत होता.
आंनदी मुलांना घेऊन येत जा म्हणजे ते असे प्रश्न विचारणार नाहीत.मामा कनक कोण आहे हे तर मला कळलेच नाही.तो वाड्यात राहतो का? रुद्रचे प्रश्न सुरु होते.
अरे तुझ्या आईचा,माझा बालमित्र. वाड्यात आम्ही सोबत खेळायचो. तुझ्या आईचे लग्न झाले आणि वाडा सुटला. आंनदी, कनकने बरेच दिवसापासुन वाडा सोडला. अवकळा आली ग वाड्याला.
मालती मावशी आणि तिची मुलगी करतात देखरेख वाड्याची. आक्काची मुलगी राहते वाड्यात.जवळच तुझी खास मैत्रीण राहायची, काय नाव होते तिचे आठवत नाही आता.
अरे दादा दिपा नाव होते तिचे. अरे हो आंनदी आता आठवले.भेटते बरेचदा. इथेच असते ती.बहुधा घरी जमत नाही तिचे.एका शाळेत नोकरी करते.भेटली कि तुझी आठवण करते.
दिपा आंनदीची खास मैत्रीण.लग्न झाल्यावर कनकला तिने खूप सांभाळले. लहानपणापासून तिघांची मैत्री. आंनदी पासून काही लपून नव्हते.वाडयात रोज येणे.. जाणे होते तिचे. मालतीमावशी आंनदीच्या आईची मैत्रीण. आई थकल्यावर स्वयंपाक करायला वाड्यात मालती मावशीला ठेवण्यात आले.स्वभावाने शांत,प्रेमळ मायाळू.कनकला स्वतः च्या मुलासारखे सांभाळून घेत होती.कनकच्या आवडी जपायची. वाड्यात भरपूर नौकर..चाकर होते.पण कनकला मालतीमावशीचा विशेष लळा होता.
लहानपणी कनकची आई गेली आणि आक्कावर लहानग्या कनकची जबाबदारी आली.आत्या असली तरी तिला आता आई बनून कनकला सांभाळायचे होते…..
आक्काने कनकला सांभाळले का,आक्का आणि कनकचे नाते कसे होते…..वाचत रहा स्वप्न तहानलेले.
क्रमशः
Previous Part






Wah sundr
Khup chhan katha
छान कथा रंगतेय.
ज्योती ताई ची कथा आणि फुलांचा समावेश नाही असे होणारच नाही.