१२..हरवून गेल्या जाणिवा..
साखरपुडा
पहाटेच्या पहिल्या प्रहाराला नेहमीप्रमाणे विमल जागी झाली.. कालच्या अपुऱ्या झोपेमुळे तिचे डोके ठणठणात होते.. थोडे सुस्तावल्यासारखेही वाटत होते..
त्यामुळे ती थोडावेळ अंथरुणावर डोळे मिटून पडून राहिली..
आज मधुकरराव वैकुंठाच्या लग्नाची बोलणी करणार होते.
वैकुंठाच्या लग्नाची आपण घाई तर करत नाही ना..
वैकु च्या विचाराने तिचे डोळे भरून आले..
खरेच वैकुच्या बाबतीत आपण किती हळवे होत आहोत..
पोरीची जात ती कितीही जीव लावला तरी..आज ना उद्या लग्न होऊन सासरी जाणारच…
मनाची समजूत घालत उठली …
विमलला अजूनही खोलीतच पाहून
देवळातून परतलेल्या मधुकररावने डोक्यावरील टोपी काढीत खुंटीला लटकवत विचारले
हे काय अजून तू इथेच आटोपलं नाही अजून…
आटोपलेच आहे..
झाली का बोलणी विनायकच्या बाबांसोबत.
हो..बोलणीही झाली आणि कुंकु लावण्याचेही ठरवले.
तिला कुंकू लावून आज पाहुणे गावाकडे जाणार
अग भटजीने दुपारचा साडेतीन वाजताचा शुभमुहूर्त सांगितला आहे.. अजून आपल्याला बरीच कामेही उरकायची आहेत .. वैकु उठली असेल.. तिला तयार करून घे.. आणि तिला दुपारी घालण्यासाठी नवीन कापड आताच काढून ठेव.. दुपारचा शुभ मुहूर्तावर कुंकू लागले पाहिजे..
मथुरा वहिनीच्या सांगण्यावरूनच हा मुहूर्त काढण्यात आला.
वहिनींचा शकुन अपशकुन या सर्व गोष्टींवर खूप विश्वास आहे..
असे पाहूणे म्हणत होते.
तुम्ही तेवढे स्वयंपाकाचे बघून घ्या.. बाकी घरातील इतर कामे आम्ही बघून घेतो..
तिने खोलीतील केर लोटला.. गादी गुंडाळून ठेवली..पांघरूणाची घडी घातली.. आणि आंघोळ, वेणी वगैरे आटोपून स्वयंपाक घरात आली.
तिच्या लहान जावेने कमलने उप्पीट ची तयारी आधीच करून ठेवली होती.. चुलीवर चहापण उकळत होता..
आजचा स्वयंपाक कमल आणि विमल या दोन्ही जावांकडे होता..
त्यामुळे विमलने चपाती साठी परातीत पिठ चाळून..भाजी निवडायला घेतली आणि कमलला म्हणाली,
कमल आज वैकूची सोयरीक आहे तेव्हा गोडाधोडाचे काही बनवू आणि वैकुच्या आवडीच्या करंज्या सुध्दा..
हो…ताई नर्मदा वन्सने मला आधीच कल्पना दिली.. वैकु-विनायकचा जोडा खरचं किती शोभून दिसतो.. नशीबच काढले पोरीने.. माणसेही सोन्यासारखी आहेत..
हो…ग पण हे सर्व एवढे अचानक घडून आले.. आता वैकु ने काही गोंधळ घालू नये म्हणजे झाले.. किती अल्लड आहे ती..
काही काळजी करू नका होईल सर्व नीट.. कमल मोठ्या जावेला समजावत म्हणाली,
वैकु तर आज सकाळपासून खूप खुश होती .. तिच्या आवडीच्या करंज्या, नवेनवे कपडे आज तिचे खुप लाड होत होते.. विनायक ही नवीन कपडे घालून तयार होता.. त्याचा थाट पाहून ती म्हणाली,
आई हा विन्या गावाला जात असे वाटते..नवे कपडे घालून बसला.
वैकु आजपासून त्याला विन्या नाही विनायकराव म्हणायचे कळले का?
पण का?
जेवढे सांगितले तेवढे ऐक..
ठीक आहे..असे म्हणून वैकुने हातात करंजी घेऊन तिथून पळ काढला..
दुपारी मुहर्ताच्या वेळी पाहुण्यांसमोर प्रथम विनायकला अक्षद करून नवीन कपडे आहेरात दिले..
वैकुंठा हे सर्व दूर बसून पाहत होती.. विनायकनंतर तिलाही पाटावर बसवले.. हे सर्व काय होत आहे हे तिला कळत नव्हते.. पण तिला खूप मजा येत होती..मोठे माणसे सांगतील तसे ती शहाण्यासारखे ऐकत होती..
विनायकच्या आईने तिला कुंकू लावून नवीन पातळ नेसावयास दिले.. तेही तिने आईला चुपचाप नेसवू दिले.. आणि परत पाटावर येवून चुपचाप बसली..
वैकुंठाला असे शांतपणे वागताना पाहून आई तर आश्चर्यचकीत झाली होती..
नवीन पातळात वैकुंठाला खुलून दिसत होते..त्यात ती अगदी दृष्ट लागण्यासारखी दिसत होती..
पण एवढे मोठे पातळ पहिल्यांदाच नेसलेल्या वैकुंठाची मात्र पातळ सांभाळता सांभाळता पुरेवाट झाली. तिला नीट चालताही येत नव्हते..त्यातून आई सारखा तिच्या डोक्यावर पदर ठेवत होती त्यामुळे आता ती वैतागून पाटावरून उठून जाण्यासाठी हट्ट करू लागली..
पण हे पाहून आई तिला समजावत म्हणाली,
आता ओटी भरली की झाल वैकु.. थोडा धीर धर..
आईने समजावलं तरीही तिची सारखी चुळबुळ चालूच होती..
मथुरा काकी वैकुंठाला कुंकू लावून ओटी भरण्यासाठी समोर वाकली…
तोच अचानक आलेल्या हवेच्या झोताने वैकुच्या डोक्यावरील पदर
निसटून ताटातील दिव्याने पेट घेतला..
काही कळायच्या आत
घाबरून वैकु पेटत्या पातळासह जागेवरून उठून आईला येवून बिलगून रडू लागली..
क्रमशः
Previous Link
https://marathi.shabdaparna.in/११-हरवून
-
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.Emailwhatsapp no,9867408400शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा






छान लिहिले
अरे बापरे! भयानक प्रसंग ओढवला.
वाचता वाचता क्षणभर काळजाचा ठोका चुकला.
लक्षातच नाही कथा आहे ते . लेखिकेच्या लेखणीचा प्रभाव.
Wah