४-उसवले धागे कसे? marathi katha
वडिलांसाठी राजकारणात प्रवेश करणाऱ्या आनंदीला अडवण्याचा चैतन्य अतोनात प्रयत्न करतो….आता पुढे वाचा
भाग-४
रात्रंदिवस सोबत राहायचे आहे आपल्याला. आनंदी आपण दोघांनी मिळून बघितलेल्या स्वप्नात राजकारण कुठे नव्हतेच.
अरे पण आता परिस्थिती वेगळी आहे.मी बाबांना दुखवू शकणार नाही.आणि तू तर मला हवाच आहेस.
आनंदी मलाही तू हवी आहेस पण राजकारण नको.
मग मी काय करु चैतन्य?
आनंदीने डोळ्यात पाणी आणून केविलवाणेपणे मला विचारले.
मी आनंदीच्या भावना समजून घेऊ शकत होतो.
अशा परिस्थितीत ती वडिलांना दुखवू शकत नव्हती.आनंद गेल्यावर एकाकी झालेत ते.त्यांना आनंदीशिवाय कोणी नव्हते आता.मला समजत होते सगळे.
पण तरीही तिने राजकारणात जाणे मनाला पटत नव्हते.आम्ही बोलत असतांनाच अनंतरावांनी आनंदीला आवाज दिला.आमचे बोलणे अर्धेच राहिले. मी घरी आलो. काय करावे समजत नव्हते.आनंदीला कसे समजवावे ?
आनंदी मुरब्बी राजकारणी घरातील तर माझ्या घरी सगळे राजकारणापासून लांब राहणारे.
त्या रात्री मला झोप आली नाही.मी आणि आनंदीने बघितलेले स्वप्ने आठवत राहलो.
मी आणि आनंदी रोजच भेटत होतो. दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम होतो. दोघेही आपापली बाजू एकमेकांना समजावून सांगत होतो. आम्हाला एकमेकांना सोडायचे नव्हते. आम्ही एकमेकांना सोडून राहू शकत नव्हतो.
शेवटी मीच माघार घेत आनंदीला म्हणालो,
ठीक आहे आनंदी तुझा हट्टच आहे तर यावेळी लढव निवडणूक.पण ही शेवटचीच निवडाणूक असेल.
आनंदी तयार झाली.फक्त वडिलांसाठी ती उभी राहणार एकदाच असे ठारले.
लग्नासाठी आम्ही पाच वर्ष थांबायचे ठरविले.
निवडणुका संपल्या. सहानुभूतीची लाट आणि अनंतरावांनी मतदारसंघात केलेले काम याच्या जोरावर आनंदी निवडून आली.
आनंद गेल्यापासून माझे आनंदीच्या घरी जाणे कमी झाले होते. अनंतरावांना आमच्या दोघांच्या प्रेमाबद्दल माहीत नव्हते. आम्ही रोज पारसपिंपळच्या झाडाजवळ भेटत होतो.
पण आता आनंदीने निवडणूक जिंकल्यापासून तिने मला असे भेटणे तिला योग्य वाटत नव्हते. तिच्या प्रत्येक हालचालीवर लोकांचे लक्ष राहणार होते.शिवाय तिचा कामाचा पसारा वाढला होता.अनंतराव झपाटल्यागत तिच्या कडून कामे करवून घेत होते.तेही तिच्यासोबत तेवढेच काम करत होते.आनंदला विसरण्याचा हा एकमेव मार्ग त्यांनी निवडला होता.
आता रोज भेटणे होत नव्हते.
दिवसातून चारदा मला भेटल्याशिवाय चैन न पडणारी आनंदी आता दिवसभर मला न भेटता राहायची. आमचे जास्त बोलणे फोनवरच व्हायला लागले.आनंदी फोनवर सगळे सांगायची.
पण जे सांगायची त्यात राजकारणाच्याच गोष्टी जास्त राहायच्या.
आम्ही दोघांनी बघितलेली स्वप्ने विरत चालली होती.
मला जाणवायला लागला तिला हळूहळू चढत जाणारा सत्तेचा कैफ.
मी तिला तसे म्हंटलेही पण ती मानायला तयार नसायची.
तुला ना काहीही वाटतं चैतन्य
हे तिचे ठरलेले उत्तर असायचे.
तिचे प्रेम होते माझ्यावर लहानपणापासून.मग हा बदल कसा?
वडिलांच्या महत्वाकांक्षेला बळी पडली आनंदी.
आणि आता तर तिलाही ते सगळे आवडायला लागले होते. मला आनंदी मागे फिरायला हवी होती आणि ती तर अजून पुढे पुढे जात होती. दोघांमधले अंतर वाढत होते. अनंतरावांनी जी स्वप्ने आनंदसाठी बघितली ती आता त्यांना आनंदीकडून पूर्ण करुन घ्यायची होती.
त्यांना आनंदी कायम राजकारणात हवी होती.
आणि त्यासाठी तिची मतदारसंघावर पकड असणे गरजेचे होते. आनंदीने आता स्वतःला कामात झोकून दिले. सतत बिझी असायची ती.
आमच्या भेटीतील अंतर वाढत गेले आणि आमच्यातलेही.आनंदी माघारी फिरण्याची शक्यता धुसर होत होती.आमच्या दोघात निर्माण झालेले अंतर तिला दिसत नव्हते पण मी मात्र अस्वस्थ होत होतो.माझा धीर खचत चालला होता.
बघत बघता तीन वर्ष निघून गेली. फोनवर आम्ही बोलायचो पण आनंदीला वेळ असेल तेव्हा.
एकदा तिला स्पष्ट विचारायचे ठरविले.
आनंदी आता दोनच वर्ष राहिली.मग आपण लग्न करु.
चैतन्य मला नाही वाटत मी आता राजकारण सोडू शकेन.
माझ्यासाठी हे धक्कादायक होते. तिला आपले काय ठरले होते याची आठवण दिली.
पण परत वडिलांच्या स्वप्नांचा आधार घेत तिने तिची बाजू मांडली.
आनंदीचे माझ्यावरील प्रेम कमी झाले होते का? नाही.मला कधीही तसे जाणवले नाही.पण आता ती राजकारणावर,तिला मिळालेल्या सत्तेवरही प्रेम करायला लागली होती. तिला मी आणि राजकारण दोन्ही हवे होते.
राजकारणासाठी मला किंवा माझ्यासाठी राजकारणाला सोडायला ती तयार नव्हती.
पण मला फक्त आनंदी हवी होती.माझी आनंदी,फक्त माझ्यावर प्रेम करणारी अवखळ,अल्लड,खोडकर आनंदी.
क्रमशः
Previous Part Link–https://marathi.shabdaparna.in/३-उसवले-धागे-कसे
चैतन्य एवढेच प्रेम आनंदी राजकारणावरही करते. पण चैतन्य हे स्वीकारतो का? पुढील भाग नक्की वाचा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
खुप छान कथानक
कथा छान वळण घेतेय.
आवडली. 👌👌