भाग-३
तिची आजी-कथा
रामने दया,प्रभाकर आणि मनोहरचे नाव बाजूला असलेल्या गावातील शाळेत टाकले. रामला शिक्षण फार महत्वाचे वाटत होते. तिन्ही बहीणभाऊ दहा वाजता शाळेत जायची ती संध्याकाळीच परतायची.अभ्यासात तिघेही हुशार होती.वर्गात पहिला,दुसरा नंबर पटकवायची.
३-तिची आजी
राम सीताईला म्हणायचा,
सीता आपली पोरं हुशार आहेत.मोठी झाली कि त्यांना शहरात पाठवू शिकायला. सीताई शिकली नव्हती पण रामची तळमळ जाणवायची तिला.
रामला अभिमान वाटायचा मुलांचा.
दया आता वयात आली होती.लिहिण्यावाचण्यापुरते तिचे शिक्षण झाले होते.रामने एकदिवस सिताईजवळ विषय काढला,
सीता दयाचे लगीन उरकून टाकू या.
सिताई राम जसे म्हणेल तसेच करत आली होती लग्नापासून. तिच्याही मनात होतेच दयाच्या लग्नाचे.
बाजूच्या गावात रामचा मित्र राहत होता. त्याचा मुलगा होता लग्नाचा.पण तो लांब एका शहरात नौकरी करायचा.
दया घरात मोठी मुलगी आणि शांत स्वभावाची त्यामुळे सगळ्यांची लाडकी होती.एवढ्या लांब तिला द्यायची कि नाही हा विचार दोघांच्याही मनात आला.पण मुलगा शिकलेला होता. शिवाय त्याच्या घरच्यांना राम ओळखायचा.
त्याकाळी शिक्षणाचे वारे खूप पसरले नव्हते.खेड्यात शिकलेला मुलगा म्हणजे एक नवलच होते. मुलाला सरकारी नौकरी होती.असा मुलगा मिळणे कठीण होते.
म्हणून दोघेही तयार झाले.
दयाच्या लग्नाची बोलणी सुरु असतांनाच छोट्या आजाराचे निमित्त होऊन रामचे काका,काकु दोघेही गेले.
रामच्या जीवनात काकाकाकुंना खूप मोठे स्थान होते.
त्याच्यासाठी हे दुःख सहन करणे खूप कठीण होते.सीताईवरही काकाकाकुंनी खूप माया केली होती. सीताईने हिमतीने त्याला या दुःखातुन बाहेर काढले.
दयाच्या लग्नाचा दिवस उजाडला. दया पहिल्यांदाच गावाच्या बाहेर पाऊल टाकत होती.तेही खूप लांब.
राम, सीताईला तिची पाठवणी करतांना काळजावर दगड ठेवावा लागला. दयाच्या लग्नात रामने गावजेवण दिले.
दया माहेर सोडून गेली. कुटुंब एवढे मोठे पण एकट्या दयाच्या जाण्याने घर रिकामे झाले. दयाचे अधूनमधून पत्र यायचे.तिचे एकंदरीत सुरळीत सुरु होते. जावयाचा स्वभाव कडक होता पण दयाला जीव लावायचे.
दिवस जात होते.
सीताईचे सगळ्या नातेवाईकांशी जमायचे.मोठी सून असल्या कारणाने खेड्यात तिला मान होता. जीव लावणाऱ्या नणदाही गावातच होत्या.
रामला एकदिवस शेतातून घरी आल्यावर ताप आला.
साधाच ताप असेल म्हणून दुर्लक्ष झाले.
गावात दवाखाना नव्हताच. सुरुवातीला काही गावठी औषधेच घेण्यात यायची.
दवाखान्यात जायचे म्हणजे बैलगाडी जुंपूनच जावे लागायचे.
शेतात कामे पडून होती. म्हणून रामने दवाखान्यात जाण्याची टाळाटाळ केली.ताप मेंदूपर्यंत गेला.
सीताईने चुलत दिर विठ्ठल आणि गडी हरीदास यांना सांगून रामला जवळच्या गावी न्यायला लावले.ताप जास्त होता.डाॕक्टरने यवतमाळला न्यायला सांगितले.विठ्ठल आणि हरिदासने वेळ न दवडता रामला यवतमाळला नेले.
सीताई मुलांना घेऊन घरीच थांबली.
देवासमोर बसून देवाचा धावा करत राहिली.
माझं कुंकू वाचव म्हणून देवाला विनवत राहली.
सीताई पहाटेची कामे करत होती.पहाटे बैलगाडी दिसली लांबूनच येतांना.
देवाने ऐकले माझे. आले वाटते ठीक होऊन. बरे झाले काल दवाखान्यात पाठवले.
असा विचार करत ती आतल्या खोलीत गेली.देवाजवळ दिवा लावला आणि नमस्कारासाठी हात जोडले तेवढ्यात प्रभाकर आणि मनोहरचा हंबरडा ऐकू आला.
बाssss
सीताई तशीच बाहेर धावत आली.
बैलगाडीतून रामचा निष्प्राण देह घरात आणत होते.
सीताई वेड्यासारखी बघत राहली. काय झाले समजल्यावर सीताईने टाहो फोडला.कुणाच्या ध्यानीमनी नसतांना राम मुले,सीताई,सगळ्यांना सोडून निघून गेला.
दया वडिलांच्या अंत्यविधीला येऊ शकली नाही.
प्रभाकर आणि मनोहर सीताईला आधार देत होते.छोटा श्रीधर आणि गीता काय झाले हे समजण्याच्या वयात नव्हते. दोघे आई का रडते म्हणून तिच्याकडे बघत होते.
रामचा अंत्यविधी आटोपला.
रामशिवाय सीताईला या घरात राहायची सवय नव्हती.
पुढचे आयुष्य रामशिवाय कसे घालवायचे या विचाराने ती आतून हलून जायची.
पण आता एकटे तर राहायचे होतेच शिवाय सगळी जबाबदारीही पेलायची होती.मुले लहान होती.त्यांना शिकवून मोठे करायचे होते.
प्रभाकर सहावीत आणि मनोहर तिसरीत होता.
क्रमशः
रामचा हात पकडून आलेल्या सीताईच्या हातून रामचा हात सुटला.पुढे येणाऱ्या संघर्षावर तिला आता एकटीनेच मात करायची होती…..
Next Part Link
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
सुंदर हळुवार शब्द रचना 👌👌
खुप छान कथा
मनभावन कथानक!
पुढील भाग वाचायला खूप उत्सुक…