आठवणीतला गोपाळकाला
आठवणीतला गोपाळकाला

आठवणीतला गोपाळकाला

आठवणीतला गोपाळकाला

गोपाळकाल्याच्या निमित्ताने काही गोड आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आणि त्यानंतर बरीच वर्षे पुढेही गोपाळकाला म्हणजे घरी मोठा उत्सव असायचा. आदल्या दिवशी कृष्णजन्माष्टमीचा वेगळा थाट. दोन दिवस आधी आई चौरंगावर मातीचे गोकुळ उभं करायची.त्यातकृष्ण,यशोदा, देवकी, वासुदेव, कृष्णाचे सवंगडी सगळं असायचं. त्यातली ती पुतना मावशी आठवली की अजूनही भ्यायला होतं. आईच्या मध्ये मध्ये करून आपणही आपली कलाकृती सादर करण्याचा तो उत्तम मार्ग असायचा.खूप मजा वाटायची.रात्री 12वाजता कृष्णजन्म, पोथीवाचन,आरती, प्रसाद… सगळं सांग्रसंगीत. खरं तर एकाच वेळी श्रीखंड आणि बासुंदी असायची पण डोळा असायचा तो डिंकाच्या प्रसादावर सुंठवडा पटकन संपवला की बाकी प्रसादावर ताव मारायला मोकळे.”आरती करू संध्याकाळी.. ओवाळीते वनमाली” या आरतीतली “पोळी केली सायीची” ऐकलं की बालमनाला कृष्णाचा हेवा वाटायचा. पण नंतर त्या काळच्या समृद्धीची जाणीव व्हायची. आईचा गोड आवाज, सुरेल चाल.. अहाहा… अजूनही आठवतं.
दुसऱ्या दिवशी लगबग असायची ती गोपाळकाल्याची.खरं तर महिन्याच्या सुरवातीला वाणसामानामध्ये साळीच्या आणि ज्वारीच्या लाह्या असं जिन्नस बघताच मन आनंदाने नाचू लागायचं. प्रत्यक्ष तो दिवस उजाडला की वेगळीच घाई.अंगणात, उन्हात स्वच्छ घासून ठेवलेली स्टीलची कोठी (त्यातच काला कालवायचा ),
लख्ख केलेली उपकरणे, समई मन वेधून घ्यायची. घरात धुवून जुन्या कपड्यावर पसरवलेल्या लाह्या,धुवून, उपसून ठेवलेली चणा डाळ,भरपूर दही, हिरव्या मिरच्या, तर्हेतर्हेची लोणची, पेरू, काकडी, केळी, भरपूर कोथिंबीर…. घरभर सुगंध दरवळायचा. हे सगळं असलं तरी खरी चव यायची ती प्रत्येकीने आणलेल्या थोड्या थोड्या जिन्नस मुळे. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा काला तो… त्याची चव आणि गोडीच निराळी.
भजनाची तयारी म्हणून घराच्या पडवीत या टोकापासून त्या टोकापर्यंत टाकलेली सतरंजी. (सगळ्या घरगुती कार्यक्रमाची साक्षीदारच ती )त्या दिवसाला साजेशी सजावट असायची. श्रीकृष्णाचा मोहक पाळणा, छानशी आरास, तेलवात, तुपवात, तुळस, हार, फुले, गुलाल, बुक्का, समई, निरंजन… सोबतीला टाळ, टिपऱ्या.
त्या दिवशीचं भजन विशेष रंगायचं.निरनिराळे आवाज,विविध चाली पण भजनातली तल्लीनता मात्र एकसारखी.त्यात दुप्पट उत्साहाने टिपऱ्यांच्या नादावर घेतलेला फेर. सगळंच उत्साहात.शेवटी आरती आणि भरपूर प्रसाद. घर भक्तीरसात न्हाऊन निघायचं.
घरी जाताना येणाऱ्या प्रत्येकीच्या स्टीलच्या कडीच्या डब्यात पुन्हा घसघशीत हाताने दिला जाणारा काला.देताना कुठेतरी बालमन विचार करायचं, “मिळेल का आपल्याला पोटभर “पण “दे गं भरपूर “असा आईचा आवाज आला की मन आपोआप उदार व्हायचं. तिचा आवाज आपल्यालाही पोटभर मिळणार याची शाश्वती देऊन जायचा.त्याशिवाय घरकाम करणाऱ्या लोकांचा वाटा आई काढून ठेवणार. मग आम्ही ताव मारायला मोकळे. मनसोक्त. खाताना प्रत्येक प्रकारचं लोणचं आलंय की नाही याची खात्री बाळगूनच खायला सुरवात करायची. एकूण काय कोठीच्या शिघोषिघ असलेला काला तळाशी गेला की आईचं समाधान व्हायचं.
सरते शेवटी सतरंजीवर काला झाल्याच्या खुणा बघून मन तृप्त व्हायचं.सगळं आवरून निजतांना,”हाच समृद्धीचा वारसा असाच पुढे सुरु राहू देत “अशी मनोमन प्रार्थना करून दिवसाची सांगता व्हायची.
रम्य ते दिवस, रम्य ते बालपण.

मंजूल देव.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

 
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
shabdaparnamarathi@gmail.com

 

शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

3 Comments

  1. Mohini1408

    खुप चविष्ट झाला गोपाळकाला.
    आयुष्य हे असेच आहे, वेगवेगळे अनुभव.
    अनुभवांचा गोपाळकाला
    अप्रतिम लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!