संवाद-विसंवाद-marathi lekh
वेगवेगळी घरे,वेगवेगळी माणसे,वेगवेगळे संवाद ,पण परिस्थिती समान (situation )
घर पहिले
काय करणार तू आता पुढे ? पंचाहत्तर टक्क्यांवर कुठे admission मिळेल तुला? काय काय स्वप्ने बघितली होती तुझ्यासाठी. सर्व स्वप्नांवर पाणी फिरवलेस रे. लहानपणापासून तुझ्यावर घेतलेली मेहनत,तुझ्यावर घालवलेला पैसा सगळे सगळे फुकट गेले बघ.
घर दुसरे
अरे नाराज कशाला होतो? ही शेवटची परीक्षा नाही आहे.अशा तर किती परीक्षा येतील नी जातील.
अजून थोडी मेहनत केली तर पुढल्या परीक्षेत एकदम चांगले मार्कस् आणशील तू.माझा विश्वास आहे तुझ्यावर.
घर पहिले
काय ग किती हा पसारा आज.जंगलात आल्यासारखे वाटत आहे,नेहमीचेच आहे हे तुझे.एकही वस्तु जागेवर असेल तर शपथ, दिवसभर काय करतेस माहित नाही. जा उभी काय आहेस अशी?पाणी घेऊन ये प्यायला.
घर दुसरे
अग असू दे.काही नाही होत कधी तरी घरभर पसारा असला तर. उलट घरासारखे वाटते. तू पण दिवसभर किती कामे करशील.आज बैस तू जरावेळ मी चहा करतो मस्तपैकी आलं टाकून तुझ्या आवडीचा.
घर पहिले
आज माझी ती मैत्रीण आहे ना.तीच होअर्पिता. तिच्या घरी गेले होते . किती सुंदर मोठा फ्लॕट म्हणू सांगू आणि घराची सजावट तर नजर लागण्यासारखी केली नवऱ्याने.खूप पैसा कमावतो तो,
नाही तर तुम्ही प्रामाणिकपणाचा अतिरेक. एक पैसा जास्तीचा काढता येत नाही तुम्हाला. तुमच्या प्रामाणिकपणाची शिक्षा आम्ही भोगतोय.
घर दुसरे
अहो आज मी एका मैत्रिणीच्या घरी जाऊन आले.काय थाट आहे तिचा,एकदम मजेत वाटली. नवरा वरकमाई खूप करतो असे सांगत होती. ऐकून कसेसेच वाटले. आपणच सुखी वाटलो तिच्यापेक्षा. कमी पैसा आहे पण तुमच्या प्रामाणिकपणाचा अभिमान आहे मला.
घर पहिले
आईबाबा तुमचे जन्मभर मीच करायचे का? माझाही संसार आहे आता यापुढे दरमहा पैसे पाठवणे नाही जमणार मला. कबूल तुम्ही माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या.पण त्यात विशेष काय? सगळेच आईवडील आपल्या मुलांसाठी करतातच ह्या गोष्टी.तुम्ही जगावेगळे काय केले?
घर दुसरे
आईबाबा,आता तुम्ही माझ्याजवळच राहायचे. तुम्ही आम्हा भावंडांना वाढवतांना खूप मेहनत घेतली .आता तुमचे आराम करायचे दिवस आहेत.इथे राहिले तर मुलांनाही आजी आजोबाचे प्रेम मिळेल.
मी आता तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही.
घर पहिले
बेटा तू का ऐकून घेतेस एवढे? तू अशीच सहन करत राहिली तर जास्तच त्रास देतील तुला.आतापासूनच तू तुझ्या मनासारखी वाग म्हणजे त्यांनाही सवय होईल.
घर दुसरे
अग,नवीन नवीन लग्न झाले कि थोड्याफार गोष्टी सहन कराव्याच लागतात. थोडे तू समजून घे थोडे ते समजून घेतील.
घर पहिले
ताई, किती बदलली ग तू..मला आईसारखे सांभाळणारी मोठी बहीण तूच का हीच शंका यायला लागली मला. तू बाबांच्या संपत्तीचा हिस्सा मागशील असे वाटले नव्हते कधी.बाबा असतांनाच मी सगळे माझ्या नावावर करायला हवे होते. तुझ्यावर विश्वास ठेवला हीच चूक झाली माझी.
घर दुसरे
ताई माझ्याएवढाच तुझाही वाटा आहे आईबाबांच्या संपत्तीत. माझ्याएवढेच तूही केले आईबाबांचे. आपल्या दोघांचाही आईबाबांवर सारखाच हक्क. मग मीच एकट्याने सगळे का घ्यायचे?
घराघरात असे वेगवेगळे संवाद/विसंवाद सुरु असतात.
किती भिन्न माणसे,त्यांचे स्वभाव,प्रवृत्ती,विचार करण्याची पद्धत,
काही माणसे स्वार्थी, काही निस्वार्थी.
काही दुसऱ्यांना समजून घेणारी तर काही हेकेखोर वृत्तीची.
काही जबाबदार,कर्तव्यबुद्धीने वागणारी तर काही बेजबाबदार कर्तव्य टाळणारी.
काही दुसऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी तर काही आपल्याच माणसांचा आत्मविश्वास कमी करणारी.
माणसे कशीही असली तरी त्यांच्या संवादाचे,विसंवादाचे पडसाद त्यांच्यासोबत राहणाऱ्यांच्या आयुष्यावर पडत राहतात.कधी चांगले कधी वाईट…..
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा











Wahhh 🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान