Marathi-उत्सव कविता
गुढीपाडवा
आला आला चैत्र
चैतन्या संगती
गोड ऐकू कानी
कुहू कुहू येति ।।1।।
आंब्याच्या डहाळी
जणू खुनावती,
कडुनिंबा संगे
एकरूप होती।।2।।
करुनि स्वागत
गुढीपाडव्याचे
होई आगमन
हो नववर्षाचे।।3।।
गुढी उभारली
नव चैतन्याची
गोडी अविट ही
साखर गाठीची।।4।।
कडुनिंब असे
आज महाराजा
चिंच गुळासवे
चाटण्याची सजा।।5।।
जणू संदेशच
देई हा पाडवा
चाखा कडुनिंब
आरोग्य वाढवा।।6।।
नव विचाराना
भरुनीया मनी
जतन करू या
वृक्षांना अंगणी।।7।।
करूनि संकल्प
वृक्षारोपनाचा
करू या सोहळा
गुढी पाडव्याचा।।8।।
हिंदू नववर्ष
साजिरे करूया
नवीन विचार
मनी रुजवूया।।9।।
✍️सौ. पद्मजा जोशी
पुसद
आला आला ग सरावण
सुरू लगबग बैनाईची
सणवारं आले माह्या दारी
करू तयारी समद्या पूजेची ।।1।।
बगा आली आली पंचमी
पुंजू चला नागोबाला
चाल ग सखे पटापटा
दूध लाह्या घिऊन वारुळाला।।2।।
मग आली नारळी पूणव
आला भाऊ न्याया माहेरा
माहेरा गोडधोड खाऊन
राखी बांधून आले सासरा।।3।।
मंग झोके झाडाले बांधून
मैतरणीसंग दिसभर झुला
समद्या खेळामधी आनंदानं
मनीचं दुःख भुला।।4।।
आता वाट पाहे टिपऱ्याची
आली अष्टमी गोपाल किसनाची
दह्या दुध लाह्याची टांगून मटकी
फोडून लुटू मज्जा गोपाल काल्याची।।5।।
सरावणात उपास तापास
सोमवार माह्या म्हादेवाचा
बेलफुल वाहून त्याच्यावर
करू सारे जाप शंकराचा।।6।।
बरसती पावसाच्या सरी
सरावणात रिमझिम
रेलचेल गोडाधोडाची
येई समद्या आनंदा उधाण।।7।।
आला सरावण सरावण
गाऊ आनंदाच गाणं
*सौ.पद्मजा जोशी
स्वागत नववर्षाचे
2021 ची 365 मण्यांची माळ
हळूहळू गळत गेली
राहणार फक्त मेरुमणी
नवी माळ ओवण्या साठी
जुन्या मण्यांमध्ये दिसतात
आठवणींचे कवडसे
वयाच्या पायऱ्यांवरून निसटतात
आपले परके सोबती
दर दिवसाला येतात उचंबळून
अपेक्षा रुपी पक्षांचे थवे
उडवतात यशाचे कारंजे
मनभावन तुषार आनंदाने
दिवस महिने वर्षातले
बघता बघता सरले
आयुष्याच्या रांगोळीत
आपण नित्य नवे रंग भरले
दिवस उगवतो पुन्हा मावळतो
आयुष्य पुढे पुढे सरत पळतं
रात्री नंतर प्रकाश येतो
माणसास प्रेमाने जोडत जातो
नव्या वर्षाची नवी सकाळ
घेऊन येईल उमेदीचा काळ
आणि क्षितिजाकडे झेप घेईल
2022 ची घेऊन नवी माळ
2021 च्या कडू गोड आठवणी
मनाला पुन्हा साद घालतील
स्वागत करूया नववर्षाचे
उत्साहाने सगळे मिळून येतील
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
विविध सणांवर आधारीत कविता









