मराठी भयकथा अधूरी माया
मराठी भयकथा अधूरी माया

मराठी भयकथा अधूरी माया

मराठी भयकथा अधूरी माया
नीरव आईवडील आणि  बहीण चैतालीसोबत राहत होता. त्याचे ग्रॕज्युएशन झाले होते.सध्या तो नौकरीच्या शोधात होता.
शेजारी एक नवीनच गृहस्थ भाड्याने राहायला आले.गोविंद त्यांचे नाव.
 नीरव आणि  त्यांच्या वयात  बरेच अंतर असूनही नीरवची त्यांच्यासोबत मैत्री झाली. नीरव रोज गोविंदकाकांकडे जायला लागला.काका एकटेच राहायचे. कुणाशीही जास्त बोलायचे नाही.नीरवशी जमायचे त्यांचे.
कुणाशी बोलणे नाही,स्वतःमध्येच गुंग असायचे. सतत काहीतरी मंत्र पुटपुटत राहायचे नीरवला कधी कधी गुढ वाटायचे हे. राहवून विचारलेच त्याने एकदा,
काका,तुम्ही काय पुटपुटत असता नेहमी?
अरे मी गेलेल्या लोकांशी बोलत असतो.
अनपेक्षित उत्तर ऐकून नीरवचा थरकाप उडाला क्षणभर.
पण भूत,आत्मा या गोष्टींवर विश्वास न ठेवणारा नीरव हसायला लागाला
काका,काहीही सांगता?
असे काही नसते.
कुठल्या दुनियेत राहता तुम्ही?
अरे ती दुनियाच वेगळी आहे.
बघायची का तुला?
नीरव पट्कन हो बोलून गेला.
पण आता काकांबद्दलची त्याला वाटणारी गुढता वाढली.
चल तर मग आता येणाऱ्या पोर्णिमेला.
 
काका आता येणाऱ्या पोर्णिमेला?
 
नीरवने चाचरत विचारले.
का रे? घाबरलास ?
 
अरे घाबरु नको.
त्या जगातही भावभावना आहेत.
फक्त  शरीर नाही. पण अतृप्त इच्छा आणि  ज्यांना  सोडून गेले त्यांची काळजी,काळजीतून येणाऱ्या यातना आणि  यातनेतून निर्माण होणारे दुःख .
दुसऱ्या जगात गेल्यावरही काहींची या चक्रव्युहातून सुटका नाहीच.
 काकांवरचा विश्वास आणि  दुसरे जग बघण्याच्या उत्सुकतेने नीरव जायला तयार झाला.
 पोर्णिमेला आठवडाभर अवकाश होता.
 काका पोर्णिमेची तयारी करत होते.
 बाजारातून त्यांनी छोटे झबले,टोपरे,एक छोटीशी बाहूली आणली.
नीरवला उत्सुकता वाटत होती पण सोबत भीतीही वाढत होती.
कुठे नेणार काका आपल्याला?
 
त्याची अस्वस्थता बघून आईने विचारलेही,
नीरव काय झाले रे? अस्वस्थ वाटतोस.
काकांनी कुणालाही काही सांगायचे नाही अशी तंबी दिली होती.म्हणून नीरव बोलला,
काही नाही ग आई
पोर्णिमेचा दिवस उजाडला.काकांनी नीरवला चांगले कपडे घालायला सांगितले आणि स्वतःही ठेवणीतले कपडे घातले.
संध्याकाळ झाली. काका नीरवला निघण्याची घाई करु लागले तसतसे नीरवचे मन दोलायमान होऊ लागले.
जाऊ कि नको?
पण उत्सुकतेने भीतीवर मात केली.
दोघेही निघाले.
थोडे पुढे आले आणि  जंगलाच्या दिशेने पायवाट  होती तिथून काका चालायला लागले. नीरव काकांच्या पाठोपाठ होताच. पुढे पुढे  चालत राहिले.
पायवाट जंगलाची होती तरी वातावरण भारुन टाकणारे होते.
पोर्णिमेचा चंद्र आणि त्याला साथ देणाऱ्या अगणित चांदण्या.
आभाळ चंद्र आणि  चांदण्यांनी भरुन गेले होते.
ओंजळभर चांदण्या खाली पडतात कि काय असे वाटण्याइतपत आभाळ चांदण्यांनी लकाकत होते.
जंगलात भीती वाटण्याऐवजी जादू असल्याचा आभास होत होता.
नीरवला खरेच दुसऱ्या जगात आल्यासारखे वाटत होते.
काका,किती मनोहर दृश्य….
शुsssss
काकांनी तोंडावर बोट ठेऊन नीरवला थांबवले.
काहीही बोलायचे नाही असा इशारा केला.
नीरव शांत झाला.फक्त तिथल्या वातावरणाची अनुभूती घेत काकांच्या मागोमाग चालत राहिला. मध्येच एखादी भीतीची लहर यायची. भीती वाटली कि तो काकांचा हात घट्ट पकडत होता.
एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली काका थांबले.त्यांचे बघून नीरवही थांबला.चंद्रकिरणांनी झाडांची पाने चमकत होती.
रात्र आहे कि पहाट असा संभ्रम निर्माण व्हावा इतका उजेड आजच्या पोर्णिमेच्या रात्रीत होता.
काकांनी बसण्यासाठी आणलेले कापड खाली टाकले आणि  त्यावर बसले.
त्यांच्या क्रियेतील सराईतपणा बघून ते इथे नेहमीच येतात हे लक्षात येत होते.
त्यांनी पिशवीतून बाहूली बाहेर काढली.तिच्या अंगावर त्यांनी आणलेले छोटे कपडे घातले.आणि तिला प्रेमाने हातात पकडून मंत्र पुटपुटायला लागले. बराच वेळ ते मंत्र पुटपुटत होते.नीरवला आता वातावरण अधिकच भीतीदायक वाटायला लागले.घाबरून तिथून पळून जाण्याचाही विचार त्याच्या मनात आला.पण ती मघाची पायवाट विसरला होता तो.
काकांचे मंत्रपठण सुरुच होते.
चंद्र त्याच्या चांदण्यांसोबत अजूनच चमकत होता. वाऱ्यानेही त्याची गती वाढवली होती.पिंपळाची पाने सळसळ आवाज करीत होती. नीरवचे लक्ष कधी काकांच्या हातात असलेल्या बाहूलीकडे तर कधी जंगलात असणाऱ्या दाट झाडीकडे वळत होते. काका पूर्ण  एकाग्र होऊन मंत्र  पुटपुटत होते.त्यांचे डोळे बंद होते.
एवढ्यात  समोर लख्खन प्रकाश पडला.नीरवचे डोळे दिपले त्या प्रखर उजेडाने. उजेडात एक बाविशीतली तरुणी उभी होती. पांढरे वस्त्रे अगभर लपेटली होती.
ही कोण? अचानक इथे कशी?
 
नीरवला प्रश्न पडला.
भूत? 
थंड हवेतही नीरव घामाने डबडाबला.
त्याचा आवाज गळ्यातच अडकला.काकांनाही आवाज देवू शकत नव्हता.
काकांनी बाहूली त्या स्त्रीच्या हाती दिली.
कौमुदी,बघ तुझी मुलगी आनंदात आहे.सगळे तिची खूप  काळजी घेतात,लाड करतात.
तिने बाहूलीला क्षणभर हातात पकडले.डोळाभरुन तिच्याकडे बघितले. डोळ्यातील आसवे खाली पडली आणि  जशी आली तशीच निघून गेली.
नीरव बघतच राहला.थोड्या वेळाने तो जरा भानावर आला.
काका हे सगळे काय होते?
 
नीरव हेच आहे दुसरे जग.
नीरव काही अर्थबोध होत नव्हता.
फक्त काहीतरी विलक्षण,अद्भुत बघितले हेच जाणवत होते.
नीरव
काकांनी आवाज दिला.
बेटा हेच आहे दुसरे जग.
ती कौमुदी होती. बाळंतपणात गेली.पण बाळ वाचले.
माझ्यामागे बाळाचे काय होत असेल या विचाराने अस्वस्थ होऊन भटकत राहते.
आई शरीराने गेली तरी तिचे मन,आत्मा बाळाभोवतीच घुटमळत राहतो.
एवढे बोलून काका उठले.बाहूली त्यांनी तिथेच ठेवली.
काकांच्या पाठोपाठ नीरवही निघाला.
जातांना पहाटेची चाहूल लागली होती.
एका अद्भुत  जगात नीरव जाऊन आला होता…
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!