आज त्याला बाहेर गावी जाऊन आठवडा झाला होता.तीने दोन तीन वेळा फोन लावला पण त्याने फोन उचलला नाही.आज त्याचा फोन आला तेव्हा तीने कुठं आहे, काय करत आहे , कधी येणार हे नेहमीचेच प्रश्न विचारले आणि तो नेहमी प्रमाणे भडकला.तुला काय करायचे आहे.फालतू चौकशी करू नकोस.तुला सांगायची गरज नाही.अन सुमीच्या भावनांचा बांध फुटला. आठवडाभरापासून बाहेरगावी असणाऱ्या नवऱ्याला फोनवरूनच ते ते बोलली जे बोलायला नको होते ,
तू भर तारुण्यात मला एकटीला मुलांसोबत माझ्या नोकरीच्या ठिकाणी सोडून बाहेर गावी राहायचा. मौज मजा करायला. मी एका विधवे सारखे आयुष्य घालवले……
त्याने मध्येच फोन कट केला.हे नेहमीचेच तो बाहेर गावी जाणे ,रहाणे ,आणि तिची तगमग होणे हे नेहमीचेच…
आणि ते खरेही होते तिचे .त्याला सतत बाहेरगावी जायला काही कारणही नव्हते .सर्व खर्च तिच्याच पगारावर चालायचे .त्याचा कोणताच व्यवसाय ,नोकरी, नव्हती .केवळ खाणे-पिणे आणि मौजमजा करणे मित्र व बाहेरच्या लोकांमध्ये टाइमपास करणे असे स्वच्छंदी जीवन जगणे हे त्याच्या जीवनाचे एकमेव साध्य बनले होते .त्याला बायको, मुले यात अजिबात रस नव्हता .
त्यामुळे घरातील जबाबदाऱ्या सुमीवर येऊन पडल्या.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुमीचा नवरा म्हणून हवे असलेले भावविश्व पूर्ण नाहीसे झाले होते .नाते फक्त व्यवहारापुरतेच शिल्लक होते. तिला खूप वाटायचे इतर बायकां प्रमाणे माझा संसार असायला हवा होता. शेजारीपाजारी कोणीही पुरुष आपल्या बायकोला सोडून असे बाहेर राहत नाहीत. मग आपणच असे का ?
मी बहुतेक दिसायला सुंदर नाही म्हणून नवऱ्याला आवडत नसावे .म्हणून तो बाहेर राहतो असे सुमीला नेहमी वाटायचे आणि तिचे मन खट्टू व्हायचे कारण तसा तो नेहमी तिला टोचून बोलत असे की मला तुझ्याकडे बघण्याचीही इच्छा नाही .मला बाहेर सुंदर स्त्रिया भेटतात ज्या माझ्यावर जीव ओवाळून टाकतात. तू फक्त मला पैसे देत जा. बाकी तू मला तुझ्या सोबत राहण्यासाठी बोलू नकोस. नाहीतर मी घटस्फोट देईन .वयाच्या 29 व्या वर्षी सुमीने नवऱ्याचे हे वाक्य ऐकले .ती गर्भगळीत झाली.हातपाय थरथरू लागले. काय करावे आणि काय नको असे तिला झाले.
पदरात लहान लहान दोन मुले. नोकरी असली म्हणून काय झाले. समाजात एकटी स्त्री राहणे किती असुरक्षित आहे .हे तिच्या विधवा बहिणीच्या जीवनातील घडामोडी वरून तिला माहीत होते. नवरा अधेमध्ये केव्हातरी येत असतो ना. लोकांना तर माहित आहे ना की माझा नवरा आहे म्हणून कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही माझ्याकडे .असा विचार करून तीने आहे त्या परिस्थितीत विषाचा घोट घेऊन जगणे स्वीकारले. दुसरा काही उपाय नव्हता तेव्हा तिच्याकडे .माहेरी पुरुष म्हणून कोणी नाही ज्याचा आधार वाटावा .वडिलांना धक्का बसेल, त्यांना दुःख होईल म्हणून त्यांना काही सांगणे योग्य होणार नाही .असा विचार करून सुमीने मुलांना सांभाळून नोकरीमध्ये स्वतः ला गुंतवून घेतले
.नवरा पैसे संपले की मागायला अधेमधे येत असे. धाकदपटशा ,मारहाण करून पैसे घेऊन परत जात असे. कुठे जातो ,काय करतो ही विचारायची सोय नव्हती .ना तिची हिंमत होती ना त्याला सांगायची गरज होती .मनामध्ये चरफडत, जळफळत, चिडचिडत ती दिवस कंठीत होती .तो तिकडे काय करीत असेल कोण्या स्त्रीजवळ असेल. असा विचार आला की तिच्या अंगावर शहारे यायचे .रात्र-रात्र झोप लागायची नाही. सर्व कळत होते तिला .पण त्याच्या आक्रमक स्वभावामुळे भीत होती .हिंमत दाखवायला, तिचे दुःख समजायला जवळचे कोणी नातेवाईक नव्हते. तिने विरोध केला नाही असे नाही पण जेव्हा जेव्हा तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला त्याने तिला जबर शारीरिक दुखापत होईपर्यंत अत्यंत क्रूरपणे तिचा विरोध मोडून काढला आणि जेव्हा वेदना असह्य झाल्या आणि जीविताला धोका निर्माण झाला तेव्हा हळूहळू तिने विरोध करणे सोडून दिले.जे त्याला अपेक्षित होते. ती मुकी बनली. कधीही येवो कधीही जावो तिने त्याला कधीच विरोध केला नाही. पण मनात तिरस्कार वाढत राहिला.
क्रमशः
सुमीने घाईत घेतलेला एक निर्णय तिच्या संपूर्ण आयुष्याची वाताहत करण्यास कारणीभूत होतो….वाचत रहा पुढील भाग..,
भाग2- https://marathi.shabdaparna.in/२-गुंता
छान
धन्यवाद मॅडम
कथेची छान सुरुवात
धन्यवाद मॅडम
धन्यवाद मॅडम