हा एकांत आणि माझा भूतकाळ यांचे काय मैत्र आहे कोणास ठाऊक. एकांत मिळाला की माझा भूतकाळ एखाद्या सर्पा सारखा सर्रकन येऊन फणा काढून माझ्या पुढ्यात उभा राहतो. हा भूतकाळ जेवढा म्हणून विसरण्याचा प्रयत्न करते तेवढा तो भुतासारखा मानगुटीवर पकड घट्ट करतो. असे वाटते की तो मला मातीत जाईपर्यंत सोडणार नाही. नको नकोसा हा भूतकाळ मला नीट जगू देत नाही .खूपदा वाटते की भूतकाळातील त्या कटू आठवणी एका सीलबंद पेटीत बंद करून खोल खोल समुद्रात फेकून द्याव्यात. त्या पुन्हा कधीच परत येऊ नये आणि मी माझे जीवन आनंदाने जगावे. मनाच्या पाटीवर जे खोल खोल भूतकाळाचे ओरखडे पडले आहेत ते सर्व मिटवून मनाची पाटी कोरी करावी .त्यावर जीवनाचे नव्याने अक्षरं गिरवायला मिळावीत .
खरंच असं होईल का कधी?
सुमी तिच्या भूतकाळात गढून गेली होती .कितीतरी वेळ ती एकटक शून्यात पहात पलंगावर पहूडली होती .मनात सारखी विचारांची कालवाकालव होत होती. रात्रीचे १२ केव्हाच वाजून गेले होते. मुले झोपली होती. तिला मात्र प्रयत्न करूनही झोप येत नव्हती.
का छळतो मला माझा भूतकाळ?
का विसरल्या जात नाही त्या आठवणी ?
किती वाईट आहे हे सर्व .मी जे भोग भोगले ते आता मला विसरायचे आहे .मला इतरांसारखे हसत हसत जगायचे आहे .हे माझे मन ओरडून ओरडून सांगते पण मनातील कटू आठवणी वारंवार डोकं वर काढतातच.
काय करावे म्हणजे यापासून माझी सुटका होईल?
मी इतकी संवेदनशील का आहे?
का सहन केले मी इतके?
सुमीला स्वतःच्या स्वभावाचा राग आला. माझ्या सहनशील, सोशीक स्वभावाचा हा परिणाम आहे. या सर्व गोष्टीला मी जबाबदार आहे .
स्वतःच्या परवानगीशिवाय का कोणी कोणाचा अन्याय सहन करतो?
मीच भित्री ,घाबरट ,व्यावहारिक जगापासून दूर असणारी. प्रेमाच्या नावाखाली त्याला परवानगी दिली अन्याय अत्याचार करण्याची. आणि सुमीला स्वतःबद्दल अपराधी वाटू लागले.
भूतकाळाचा तो सर्प तिच्या भोवती विळखा घट्ट करताना तिला आठवतो तिच्या लग्नाचा दहावा दिवस .
आज सकाळी स्वयंपाकाची तयारी करीत होती. भाजी धूत असताना थोडीशी भाजी चुकून खाली सांडली. त्यावरून
नवऱ्याने तुझ्या बापाच्या घरची आहे का भाजी? नीट काम कर नाहीतर शेकीन .
मी घाबरली.
यापुढे नाही होणार असं .
मी पुटपुटली. तरी दिवसभर अधून मधून त्याची रागीट नजर माझा वेध घेत होती. याची मला जाणीव झाली .सायंकाळी मी स्वयंपाक केला. जेवणाची वेळ झाली .चला जेवून घ्या. मी अदबीने बोलली .तो माझ्याकडे रागाने बघत म्हणाला, तुझ्या बापाचे अर्धे घर तुझ्या वाट्याचे मागून घे.उद्या चल तुझ्या बापाकडे. त्याची ही मागणी मला अजिबात मान्य नव्हती. मी ठाम पणे म्हटले, मी नाही मागणार. झालं ..नवऱ्याचा पारा चढला .त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली मी मानायला तयार नाही हे बघून त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे सुरू केले. तो थके पर्यंत मारहाण करीत राहिला. आता मध्य रात्र उलटून गेली .तेव्हा तो म्हणाला चल जेवायला आण.आणि त्याही परिस्थितीत डबडबलेल्या डोळ्यांना पुसत मी उठले व त्याला जेवण वाढले .
हा क्रम आता रोजचाच झाला .दिवसा लहान-लहान गोष्टीवरून अपमान, शिवीगाळ, भांडण व रात्री मारहाण .फरक एवढाच झाला की पहिल्या दिवशी त्याने हाताने मारले .दुसऱ्या दिवशीपासून इलेक्ट्रिक च्या बारीक वायर चा चाबुक त्याने खास मला मारण्यासाठी तयार केला होता . त्या चाबकाने मला रात्री कपडे काढायला लावून उघड्या चामडीवर सपासप मारायचा. त्या वेदना असह्य होत्या .त्याचे वळ कित्येक दिवस जात नव्हते .जनावरा पेक्षाही हीन वागणूक मला दिली त्याने. कोण नवरा आपल्या नववधू सोबत इतक्या क्रूरपणे वागत असेल. त्या आठवणीनेच वेदना झाल्या .एक लहर उमटली. नको त्या आठवणी आता अजिबात नको . आठवणींच्या घराचा दरवाजा तिने घट्ट बंद करण्याचा प्रयत्न केला. आणि डोळे घट्ट मिटून घेतले. मला झोप हवी .हे निद्र देवता माझ्यावर कृपा कर ,आणि मला झोप येऊ दे…
प्रिय वाचक, कथा आवडल्यास नक्की Like,Share करा
Nice
इतका कसा, निष्ठूर,निर्दयी, क्रूर, सुमीचा नवरा.
का सहन करतेय ती ?
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद