अवचिता परिमळू-अभंग
अवचिता परिमळू-अभंग

अवचिता परिमळू-अभंग

आपण कालच्या ‘घनु वाजे घुणघुणा’ अभंगात राधेची कृष्णाला भेटण्याची अधीरता, व्याकुळता अनुभवली. तिचे निष्पाप आवेग अनुभवले. तिच्या भक्तीची पराकाष्ठा पाहिली आणि तिच्या त्या संवेदनशील मनातून निघालेले भक्तीचे स्वर, आराधनेची सूर देखील ऐकले. ईश्वराच्या कृपेचा काय महिमा वर्णावा! खरोखरच कृष्णाकडे, भगवंताकडे जेव्हा ती आळवणी पोहोचते तेव्हा त्याला देखील भेटण्याची अनिवार ओढ लागते आणि तो साक्षात राधेला भेटायला गोकुळात येतो.

पण त्याचे येणे कसे असते? तो मूर्तिमंत असतो? की आभासी असतो? हे पाहणे खरोखरच रंजक होईल म्हणून आजचा हा अभंग निवडला आहे. राधेच्याच मनाचे विश्लेषण करण्यासाठी घेतलेला आजचा अभंग आहे अवचिता परिमळू

ईश्वर हा अनुभूतीजन्य आहे. त्याची आपण केवळ प्रचिती अनुभवू शकतो. त्याचे रूप कसे असेल? तो कसा दिसेल? कोणत्या मार्गाने येईल? ते आपण सांगू शकत नाही. परंतु एवढे मात्र खरे की मनातील भाव सच्चा असेल, ती उत्कटता सर्वोच्च असेल, तेव्हा तोही अगदी अवचितपणे तुमच्या भेटीला येईलच. आणि हेच प्रत्यंतर राधेला देखील येते जेव्हा कृष्ण अवचितपणे तिला भेटायला येतो. आणि तोच प्रसंग सदर अभंगात ललिताच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ती अनुभूती राधेच्याच मनोगतात, भावनेत व्यक्त करत आहे.)

अवचिता परिमळू
कालिंदीचा डोह शांत होता. पाखरांचा किलबिलाट थांबला होता. झाडांच्या पानांची सळसळ मंदावली होती. चिटपाखरू देखील बोलत नव्हते. बोटे फिरवताच बोलायला लागणारी माझी घागर उगीमुगी होऊन बाजूला पडली होती. मीदेखील कदंबाच्या झाडाला टेकून निश्चल बसली होती. काहीच सुचेना. अजिबात करमेना.

ज्याच्या करिता मन झुरते त्याला अजिबात आपली पर्वा नाही. तो तिकडे अगदी निश्चिंत आहे. सुखासीन आहे. सगळी भौतिक सुखे उपभोगतो आहे. त्याला काय असणार इकडची आठवण.. कोण कुठली एक वेडी गवळण! काय तिचा त्याला पाड! कुठेतरी कधीतरी सहज भेटी झाल्या असतील, ओळख झाली असेल, काही प्रेमाचे चार शब्द बोललो असू एवढीच काय ती त्याच्या लेखी असेल ही राधा. आणि मी मात्र वेडी अखंडपणे त्याचा ध्यास घेऊन बसली आहे.

मनाचेही असेच असते एकदा कुठे गुंतले की मग तो गुंता सोडवता सुटत नाही. हे मनाचे बंध कित्ती कित्ती नाजूक पण सोडवल्या जात नाहीत, सोडवता सुटत नाहीत. मला देखील ऐहिक जीवन आहे, संसार आहे, व्याप आहे परंतु तरीदेखील हा लळा सुटत नाही. हे झुरणे तसूभरही कमी होत नाही की त्याच्याप्रतीची निष्ठा ही ढळत नाही. हा विश्वास कुठून येत असावा कदाचित तोच पाठवत असावा. तसे असेल किंवा नसेल हे काय सांगावे.. असा विचार मनात तरळत होता आणि तितक्यात…

अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू
मी म्हणे गोपाळू, आला गे माये

मी बसून असलेल्या गवतात अचानक ऊब जाणवायला लागली. रानफुले बोलायला लागली. पाखरे बोलती झाली. तो वैजंतीमालेचा चिरपरिचित परिमळ अवचितपणे श्वासात भरायला लागला. कुठून आला असेल तो परिमळ? की कृष्ण आला असेल? प्रत्यक्ष काय झाले परंतु त्याच्या पावलांची अनुभूती यायला लागली. त्याचे झुळझुळणे असेच असते. त्याच्या अधरांचा स्पर्श असाच असतो. त्याच्या खांद्यावरील शेला असाच लहरत येतो. त्याची भेट ही अशीच अगदी सहज आलेली असते आणि आता देखील तीच रम्य अनुभूती! आला आहे, तोच आला आहे!!

चांचरती चांचरती बाहेरी निघाले
ठकचि मी ठेलें काय करु

पटकन उठून उभी राहिले. घागर लवंडल्या गेली. मन आतुर होत मधुबनात इकडे तिकडे धावायला लागले. माझे ते बावरलेले रूप बघून पाखरे चोचीतल्या चोचीत हसायला लागली. फुलपाखरांचे स्मित देखील लपले नाही आणि रानफुले तर नेहमीसारखी खिदळत माझ्याकडे पाहायला लागली. काय सांगावे खूप खूप संकोच वाटला. पाहू जाता तिथे कोणीच नव्हते परंतु त्या परिमळाला हाक द्यावी तर कोणत्या नावाने?

द्यावी तर त्या परिमळाचे नावच कृष्ण असेल का? थोडासा अदमास घेतला. इकडेतिकडे पाहायला लागले. चाचरत चाचरत झाडावेलींमागे पाहायला लागले. तो दिसेना. तो ठगांचा महाठग आहे. त्याने या वेळेस देखील भुलवले आहे, गंडवले आहे असे वाटताच परत परत तो परिमळ श्वासात यायला लागला.

तो सावळा सुंदरु कासे पितांबरु
लावण्य मनोहरु देखियेला

आणि ज्याच्यासाठी मनाने अट्टाहास केला होता तो सरतेशेवटी अवचितपणे सन्मुख उभा ठाकला. तेच त्याचे मनोहारी रूप. तो सगुण सावळा कटेवर हात ठेवून स्मित करत उभा होता. मी जागच्या जागीच स्तब्ध उभी राहिले. तो आणि इथे साक्षात! कुठे द्वारका आणि कुठे गोकुळ!! तो इथे कसा अवतरू शकतो? हा आभास आहे की प्रत्यक्ष तेच कळेना.

परंतु तो आला हे निश्चित. त्याच्या अंगावर द्वारकेची राजवस्त्रे नव्हती तर तो अगदी कान्हा स्वरूपात उभा होता गळ्यात वैजयंतीमाळा, डोक्यावर खोवलेले मोरपीस, मानेवर रुळणारे कुरळे केस, तोच निळासावळा बांधा, तेच त्याचे आवडते पिवळे पितांबर, तेच हरणाच्या मुखासमान नितळ, कोवळे तळपाय! आणि मुख्य म्हणजे तीच त्याची भावपूर्ण आणि वेधून घेणारी नजर!! आता देखील सहजतेने आकर्षित करून घेत आहे तो आकर्षित करणारा- कर्षक म्हणजेच कृष्ण.

बोधुनी ठेलें मन तव जालें आन
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये

 

त्याला पाहताच माझी झालेली स्तब्ध अवस्था त्याच्यापासून लपून राहिली नाही. ते त्याने देखील ओळखले असेल. त्याने लागलीच त्याचे दोन्ही बाहू फैलावले. मीपण क्षणात मी भानावर आले आणि धावतच प्राणसख्यास भेटले. ती काही वर्षांची प्रतीक्षा परंतु कित्येक युगे लोटली असे वाटत होते. आज ती प्रतीक्षा सफल झाली होती. त्याला कित्ती काय काय बोलायचे होते, खूप काही टोमणे मारायचे होते, रागवायचे होते, त्याच्यापुढे गाल फुगवून बसायचे होते, त्याला लटक्या रागारागाने खूप गुद्दे मारायचे होते परंतु त्याच्या मिठीत सामावताच सारे काही मनात ठरवलेले विरघळून गेले. केवळ एक तृप्त लय शरीरातून वाहायला लागली. अवघा जीवनरस रंध्रारंध्रातून कृष्णमय व्हायला लागला. त्याच्या अस्तित्वाविषयीचे मनातील नकारार्थी विचार जळमटासारखे सहजतेने दूर झाले. भ्रांती मिटली. मनात प्रसन्न पहाट उगवली.
बाप रखुमादेवी वरु विठ्ठल सुखाचा
तेणें काया मने वाचा वेधियेलें
त्याच्या त्या अवचित भेटीला काय नाव द्यावे? साक्षात्कार हा शब्द खूप मोठा होईल. ती प्रचिती ज्ञानसाधना करणाऱ्या योगी महापुरुषांची. परंतु माझ्यासारख्या गवळणीला तो केवळ सुगंधात जाणवला हे अनुभवणे कोणत्या शब्दात सांगावे? असे म्हणेन की, कडेवरचे लेकरू खुदकन हसले की होणारा आनंद म्हणजे ‘तो’ आहे. जात्यावर दळताना, रांधताना कंठातून येणारे सहज स्वर म्हणजे ‘तो’ आहे. गाई वासरांचा हंबर ‘तो’ आहे. निळेसावळे अंबर ‘तो’ आहे. घुसळून वर आलेले नवनीत ‘तो’ आहे. लुसलुशीत हिरवा चारा ‘तो’ आहे. मधुरम वाहणारा वारा ‘तो’ आहे. रिकाम्या घागरीतील आकाश ‘तो’ आहे तर तिच्यात भरलेले जल देखील तोच आहे. कित्ती कित्ती त्याची रूपे वर्णावी? पण आज मला अवचितपणे आलेल्या परिमळातून त्याची झालेली भेट ही सदैव आजन्म स्मरणात राहील. त्याची मनापासून केलेली आळवणी ही कधीच वाया जात नसते; हे प्रत्यंतर मनावर कोरत, घागर भरून घेतली. आणि संतृप्त मनाने गोकुळाकडे जाणाऱ्या वाटेवर पाऊल ठेवले.
संतोष जगताप.

रसग्रहण/निरुपण वाचण्यासाठी खालील लिंक जरुर बघा.

https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!