खेळ दैवाचा-भूत कथा
खेळ दैवाचा-भूत कथा

खेळ दैवाचा-भूत कथा

खेळ दैवाचा-भूत कथा
फोन मालती राणे, तुम्हीच का ? मकरंद राणे कोण तुमचे ?
 
 मालती :  हो,  मुलगा,  का?  काय झालं ? 
 
 फोन :  लास्ट डायल तुमचा होता म्हणून फोन केला. त्यांना सिवियर हार्ट अटॅक आलाय. आम्ही ऑफिसमधून तडक हॉस्पिटलमध्ये नेतोय.  पण……. बहुतेक
 
फोन कट झाला.
मालती : हॅलो …..हॅलो…… बहुतेक कायssss ?
मालती ताडकन झोपेतून उठून बसली.
‘बापरे!  किती भयंकर स्वप्न’. 
तिला झोपेत सुद्धा दरदरून घाम आला होता. आठ दिवसात हेच स्वप्न तिला दोनदा पडले होते.  पहिल्या वेळेस तिने इतका विचार केला नव्हता.  पण आता तिने लगेच नवऱ्याला, मधुकरला सांगितले आणि लगोलग मकरंदची खुशाली  फोनवर  विचारली.  सगळं ठीक होतं.  तब्येत चांगली होती. कसलाही त्रास नव्हता.
 मालतीला जरा हायसं वाटलं.
मधुकर : मालती,  ज्याच्यावर आपलं जास्त प्रेम असते,  काळजी असते , त्यांच्याचबद्दल आपल्या डोक्यात असे विचार येतात . काळजी नको करू त्याची. 
उद्या शनिवार आहे वाटल्यास जाऊन भेटून ये.
तुझी नात पण आठवण काढते तिकडे.  तुलाही बरे वाटेल. मला मात्र यायचा आग्रह करू नको. 
तिकडे करमत नाही ग मला.
 
मधुकर मालती राहतात कल्याणला आणि मकरंदने फ्लॅट घेतला होता मीरा रोडला.  त्या दोघांनाही तिकडून ऑफिस जवळ आहे.
 तसे मुंबईत आई वडील मुलगा वेगवेगळे राहणे म्हणजे काही विशेष नाही.
 शुक्रवारी मालतीने घरातलं सगळं आवरलं. मधुकरचा दोन्ही वेळचा स्वयंपाक करून ठेवला.
 मधुकरचा निरोप घेतला.
 संध्याकाळच्या लोकलनी ती मकरंद कडे निघाली. डोक्यात मकरंदचाच विचार.
मकरंद दिसायला हुबेहूब  मधुकरसारखा. उंची, रंग, बांधा. दोघांचा आवाज आणि बोलण्याची पद्धतही सारखीच. आवाज तर इतका सारखा की, फोनवर बरेचदा चक्रावेल कोणी. शिवाय आवडी-निवडी पण सारख्या .
नोकरीमुळे मालतीने दुसऱ्या अपत्याचा विचार केला नव्हता.
 तिला गाडीचा वेग आज  जरा कमी वाटत होता.
 एकदा मकरंदला बघितल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती.
पोचल्याबरोबर तिने मधुकरला फोनवर तसं कळवलं. शनिवार-रविवार दोघांनाही सुट्टी. दोन दिवस मजेत गेले सगळ्यांचे.
 रविवारी संध्याकाळी तिला वापस निघायचं होतं. लोकलमध्ये बसल्यावर मालतीने पुन्हा एकदा नवऱ्याला निघाल्याचे कळवले.
“काहीही पार्सल आणून ठेवू नका,  मी दोघांचा डबा घेऊन येतेय. तुमच्या सुनेने करून दिले तुमच्या आवडीचं”. 
मालती आठच्या दरम्यान कल्याणला घरी पोहोचली. दाराला कुलूप.
“पाय मोकळे करायला गेले असतील”
 तिने latch key ने दार उघडले.
मधुकर आराम खुर्चीत मागे मान टेकून….. झोपलेले?? उजवा हात छातीवर, चष्मा डोळ्यांवर तसाच.
 वर्तमान पेपर खाली पडलेला.  मालतीने मधुकरला हलवून उठवले, तसा त्यांचा उजवा हात निसटून खाली लोंबकळला.  तिला हाताचा थंडगार स्पर्श जाणवला.
 
फोन : मकरंद  राणे तुम्हीच का ? 
मधुकर राणे कोण तुमचे ?  
मकरंद : हो, वडील,  का ? काय झालं ? 
फोन :  त्यांना सिवियर हार्ट अटॅक आलाय.  मी हॉस्पिटल मधून बोलतोय. पण बहुतेक……
 
फोन कट झाला.
 मकरंद : हॅलो…. हॅलो ..बहुतेक काय sssss ? 
मालतीला शुद्ध नव्हती कसलीच. सुन्न बसुन राहीली.
आत्ता तिला स्वप्नातला उलगडा झाला होता.  स्वप्नात झालेला भास हा मधुकरसाठी होता.  संकट मधुकर वर येणार होतं. स्वप्नात दिसलेला मकरंद नाहीतर मधुकर होता.
जाताना मधुकरचा निरोप घेऊन निघालेली मालती, वापस आली तेव्हा मधुकरनेचं तिचा
 ‘अखेरचा निरोप’
घेतला होता .

मोहिनी राजे पाटनुरकर

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!