मृगांक शिक्षणासाठी होस्टेलवर राहत होता.परीक्षा संपली होती.घरी आई वाट बघत होती.पण काल त्याचा फोन आला.तो चारेक दिवसांसाठी राजस्थानला ट्रिपसाठी जाणार होता.भटकंतीची आवड होतीच त्याला.
राजस्थानला मृगांक प्रथमच आला. राजस्थानचे वैभव बघून अचंबित झाला तो. तिथल्या अजूनही शाबूत असणाऱ्या मोठमोठया हवेल्या बघून त्याला आश्चर्य वाटले. दुसरीकडली दुरावस्था झालेली स्थळे त्याला आठवली. राजस्थान बघत बघत सगळे जयपूरला पोहचले.
मृगांकला चित्रकला , निसर्ग आणि पक्ष्यांची लहानपणापासून आवड होती. टूर संपायला आली होती.राजस्थानमध्ये अजून बघण्यासारखे काय आहे याची चौकशी करतांना कुणीतरी त्याला भरतपूरबद्दल सांगितले .स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या भरतपूरला एका दिवसासाठी जावे असे त्याने ठरवले. सोबत एका मित्राला घेऊन निघाला. बाकीचे मित्र जयपूरलाच थांबले.
का कुणास ठाऊक भरतपूरमध्ये पाऊल टाकल्यापासून ते गाव त्याला ओळखीचे वाटायला लागले. आपले काहीतरी बंध इथे जुळलेले आहेत याची जणू त्याला खात्री झाली.
पण कसे शक्य आहे? मी पहिल्यांदाच आलो इथे.आईबाबांच्या तोंडून पण कधी काही ऐकले नाही.आईबाबा तर दोघेही मुंबईचे.
मग मला का असे वाटत आहे?
शिल्पकारांचे गाव म्हणून ओळखले जाणारे भरतपूर.
दगडातून हूबेहूब जिवंत मुर्ती साकारणाऱ्यांचे गाव होते ते.पण आता तिथल्या शिल्पकारीला ओहोटी लागली होती.
मृगांकने तिथले काही शिल्प बघितले. मंत्रमुग्धता काय असते हे प्रथमच अनुभवले त्याने. कलाकार तोही होता पण ही कलाकारी निव्वळ अप्रतिम वाटली त्याला,दगडात कोरलेली.
रंग कुंचल्याविना साकार झालेली,
भरतपूर छोटेसे गाव.तिथले एक साधेसे हाॕटेल निवडून दोन्ही मित्र तिथे थांबले.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भरतपूरला फेरफटका मारायचा आणि वापस निघायचे असे ठरविले.
ठरल्याप्रमाणे सकाळी उठून दोघे निघाले.
केवलादेव राष्ट्रीय उद्यानात ते पोहचले.
बापरे !पक्ष्यांचे थवेच थवे. नानारंगाचे,नाना रुपाचे निरनिराळे पक्षी. हे बघावे कि ते बघावे असा प्रश्न पडण्याइतपत विविधता होती त्यांच्यात.
सगळीकडे मुक्तपणे विहार करीत होती.
दूरदेशातून रस्ता न विसरता काहीकाळासाठी येणारी आणि थोडा विसावा घेतला कि परतणारे हे पक्षी.खरेच त्यांचा स्वैर संचार बघून आश्चर्य वाटते.
बिना नकाशाचा कसा रस्ता शोधत असतील?
मृगांकच्या मनात त्यांना बघून विचार येत होते.
कितीही वेळ पक्ष्यांकडे बघितले तरी मन भरत नव्हते.शेवटी अनिच्छेनेच दोघेही तिथून निघाले.
हाॕटेलकडे परतीच्या वाटेवर मृगांकला एक मुख्य रस्त्यापासून एक अरुंद वाट जंगलाकडे जातांना दिसली.
मित्र नाही नाही म्हणत असतांनाही मृगांक त्याला अरुंद वाटेकडे घेऊन गेला. थोडे पुढे गेल्यावर त्याला त्या वाटेच्या दोन्ही बाजूंनी कोरीव शिल्पे दिसायला लागली.
अहाहा!
मृगांकला जादूनगरीत असल्याचा भास झाला. त्याच्यातली कलाकाराची नजर खिळून राहत होती एकेका शिल्पावर.
किती अद्भूत आहे सगळे!
एका साध्या दगडातून नाक,डोळे,बांधा सगळे कसे अचूक बनले होते.
संध्याकाळ होत होती.जंगलाचा भाग असल्याने गर्द झाडी होती.तिथे अंधार लवकर पसरला.
मृगांकचा मित्र निघू म्हणत होता.
मृगांकला तिथेच थांबावेसे वाटत होते.
काही शिल्पे काळोख जास्त दाटल्यामूळे बघायची राहिली. दोघे हाॕटेलकडे परतले.
येता येता रात्र झाली होती.रस्त्याने एका खानावळीत जेवले आणि वापस आले. दिवसभराच्या थकव्यामुळे मित्र लवकरच झोपला.
मृगांक मात्र त्याची झोप त्या जंगलातील शिल्पांकडे हरवून आला होता.
त्याच्या नजरेसमोरुन शिल्प हटायला तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी पहाटेच वापस निघायचे होते.जयपूरवरुन रेल्वे सुटायच्या आत पोहचणे गरजेचे होते.
सकाळी दोघेही तयार झाले. आणि बसस्टॕण्ड वर आले.जयपूरला जाणारी बस होतीच.दोघेही बसमध्ये चढले. बस सुटणार तेवढ्यात मृगांक मित्राला म्हणाला,
‘तू जा यार.मी येतो एक दोन दिवसात.’
मित्र अवाक् होऊन मृगांक कडे बघत राहिला.
ह्या अनोळखी गावात अनोळखी लोकात राहायला मृगांक कसा काय तयार आहे हे त्याच्यासाठी आश्चर्यकारकच होते.
त्याने सोबत चल म्हणून आग्रह केला पण मृगांकचा पाय त्या गावातून निघत नव्हता.
मित्र निघून गेला. मृगांक परत त्या हाॕटेलच्या दिशेने निघाला.
अजून जास्त उजाडले नव्हते. अंधारलेलेच होते बाहेर.
हाॕटेलमध्ये येऊन उजाडेपर्यंत थांबला आणि परत शिल्पे बघायला निघाला. शिल्पाकडे जाण्याची वाट त्याला माहित होतीच.पुन्हा कालचीच शिल्पे आज नव्याने बघत होता. काल लांबून बघितलेली शिल्पे आज स्पर्शून बघत होता.
शिल्पांचा स्पर्श ओळखीचा,जवळचा वाटत होता. आपल्या कोणीतरी खूप जवळच्या व्यक्तीचा स्पर्श शिल्पाला झाल्याचे त्याला जाणवत होते.
कालची शिल्पे बघत बघत मृगांक पुढे सरकत होता. आता काल न बघितलेल्या शिल्पापर्यंत तो पोहचला. एकेक शिल्प हळूवारपणे बघत होता.
त्यांना स्पर्श करत होता. इथे काहीतरी अद्भूत आहे असे त्याला वाटत होते. आता शेवटचेच शिल्प बघायचे बाकी होते.त्याने तिकडे नजर वळवली. एका स्त्रीचे अर्धवट शिल्प होते.मानेखालचा भाग पूर्ण होता पण चेहरा मात्र अर्धा.पण तो अर्धा चेहरा ओळखीचा वाटला. तो आश्चर्याने उद्गारला,
अरे, हा तर माझ्या आईचा चेहरा.
पण इथे? कसे काय? आई इथे कशाला येईल? जंगलात?
पण चेहरा तर आईचाच आहे.
असीम आश्चर्य वाटत होते त्याला. चेहरा आईचा आणि शिल्पस्पर्श ओळखीचे.मृगांक गोंधळला होता.शिल्पात गुंतत चालला होता. त्या शिल्पाच्या बाजूलाच त्याला एक झोपडीवजा घर दिसले. ते घर नक्कीच शिल्पांच्या देखरेखीसाठी असणार हे त्याने हेरले.
तो त्या घराकडे निघाला तेवढ्यात त्याला एक पन्नाशीचे गृहस्थ घरातून बाहेर येतांना दिसले.
‘काका’.
मृगांकने साद घातली. त्या गृहस्थाने मृगांककडे बघितले आणि स्तंभित झाले.जागच्याजागी खिळले. मृगांक त्यांच्याजवळ गेला.
अभीर, तू?
ते किंचाळले.मृगांकला कळेना.
अहो काका माझे नाव मृगांक आहे.
गृहस्थ जरा भानावर आले. पण ते एकटक मृगांककडे बघत होते.
विशीतला तरुण अभीर कसा असणार? पण एवढे साम्य?अभीर असाच तर दिसायचा.फक्त केसांचा रंग थोडा वेगळा दिसतो.
मनात पुटपुटत होते.
काका मला ह्या शिल्पांची जरा माहित द्या ना.
काय नाव बेटा तुझे?
मृगांक
मृगांक आता मी जरा घाईत आहे.तुला वेळ असला तर उद्या ये. मी सांगेन शिल्पांची माहिती.
असे बोलून ते गृहस्थ निघून गेले.पण मृगांकचे हुबेहूब अभीरसारखे दिसणे त्यांना विस्मयकारक वाटत होते.
मृगांक हाॕटेलमध्ये परत आला.पण नजरेसमोरुन आईचे अर्धवट शिल्प हलत नव्हते.
दुसऱ्या दिवशी मृगांक पहाटेच उठून तयार झाला.
त्याला त्या शिल्पाबद्ल संपूर्ण माहित मिळाल्याशिवाय त्याचे कुतूहल शमणार नव्हते.
मृगांक त्या शिल्पनगरीत पोहचला.
ते गृहस्थही त्याची वाट बघत होते.
मृगांकचे अभीरशी असलेले साम्य बघून त्यांना मृगांकबद्दल सहानुभूती वाटायला लागली……
क्रमशः
भाग दोन ची Link