मयंक दरवाजा बंद करणार तोच त्याची नजर त्या शेजारच्या बंद अंधाराने आच्छादलेल्या बिल्डिंग वर पडते पण जास्त वेळ तिच्याकडे न बघता तो आतून कडी लावतो आणि हाँलमध्ये जाऊन टिव्ही बघत बसतो.
आता एवढ्या मोठ्या घरात मयंक एकटाच असतो.त्यात वाड्यात पण सन्नाटा.त्यात भर त्या बंद अंधारलेल्या बिल्डिंगची.पुन्हा कुळकर्णी काकांकडचे पण सर्व हाँलवर गेलेलेत.नेहमीप्रमाणे स्ट्रिट लाईट्स बंद.म्हणजे मयंक हा एकटाच होता.
मयंक टिव्ही पाहण्यात इतका गुंग झाला कि त्याला आपण वाड्यात एकटेच आहोत याचाही विसर पडला.
मयंकला भूक लागते म्हणून तो किचनकडे जातो तोच लाईट जाते.
मयंक चाचपडतच किचनमध्ये जातो.थालीपीठ ताटात वाढून घेणार तोच त्याला …शूक..शूक….असा आवाज येतो…दरवाजे खिडक्या बंद असतांना देखील तो आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत असतो.
पण त्याकडे दुर्लक्ष करत तो पाणी घ्यायला फ्रीजजवळ जातो..तोच……पुन्हा शूक…शूक..शूक..शूक………आणि टाळ्या वाजवण्याचा आवाज येतो.दचकून मयंकच्या हातातून पाण्याची बाटली निसटते आणि खाली पडते.मयंक तसाच घाबरून पळत आपल्या खोलीत जातो. खोलीचा दरवाजा बंद करतो.तरीही आवाज येतच असतो.
मयंक बेड वर जाऊन आपल्या दोन्ही कानांवर उशी घट्ट पकडून ठेवतो.जेणे करून तो शूक..शूक….आणि टाळ्यांचा आवाज थांबवू शकवू पण थोड्याच वेळात तोच पुन्हा घूंगरांंचा आवाज येतो .जणू काही कोणीतरी चालत त्याच्या जवळ येत आहे.
आता मात्र मयंक खूप घाबरला. कुणीतरी आहे तिथे
शरीर थरथरायला लागले.काय करावे त्याला काहीच सूचेनासे झाले .मोठी हिमंत करून हळूच मयंकने खिडकी च्या फटितून कोणी दिसतय का ? हा आवाज नेमकं कुठून येतोय…? कोण आहे …? ते बघायचा प्रयत्न करू लागला.पण त्याला काहीच दिसले नाही.
तेवढ्यात सर्व आवाज अचानकच बंद झाले.मयंकला आश्चर्य वाटले.सर्वत्र भयाण शांतता पसरली. रातकिड्यांचा किर्रर्रर्रर्र्रँर्रर्र आवाज स्पष्ट कानात घमू लागला.मयंक भयभीत होऊन बेडवरून एका कोपऱ्यात आपले दोन्ही पाय शरीराजवळ आवळून .डोके खूपसून बसून राहिला.तेवढ्यात दरवाजाची कडी खडखड वाजत आपोआपच उघडली..आणि एकदम थंड वाऱ्याची झुळूक घरात आली.
मयंक तसाच स्तब्ध बसून.मदतीसाठी हाक पण मारायची तर कोणाला ? कारण वाड्यात तर जाऊ द्या शेजारीही कोणीच नव्हते.पुढील घराचा दरवाजा उघडल्याचा सुगावा मयंकला लागला.एकदम थंड वारा घरात शिरला आणि वाऱ्याने मयंकला जसा स्पर्श केला तसा तो दबक्या पावलांनी चालत चालत त्याची खोली सोडून पुढील घरात आला.तेवढ्यात पुन्हा एकदा शूक..शूक..शूक शूक असा आवाज आला.मयंक उघडलेल्या दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागला.तो जसजसा जात होता तसतसा थंडगार वारा त्याच्या शरीराला भिडत होता.मयंक आता पूर्णपणे बाहेर जात होता.कोणती तरी अद्भूत शक्ती त्याला आपोआपच बाहेर ओढत होती.तो फक्त चालत जात होता.बाहेर पडताच त्याला कंपाऊन्डच्या भिंतीवर एक आक्राळविक्राळ आकृती दिसली.ती आ्कृती भिंतीवरून भलीमोठी उडी मारत त्या बंद ब्लिडिंगच्या पाचव्या मजल्यावरील गच्चीवर जाऊन पोहचली..तशी.मयंकची नजर वर गेली.त्या आकृतीने पुन्हा शूक….शूक…असा आवाज करत व टाळ्या वाजवत मयंकला वर तिच्या कडे येण्याचा इशारा केला.
मयंक आता वाडा सोडून त्या बंद बिल्डिंग च्या दिशेने जाऊ लागला .तोच घुंगूरांचा आवाज कानावर पडला.
इतक्या वर्षांपासून कुलूपबंद असलेली ती बिल्डिंग आता पूर्ण उघडलेली होती.मयंकवर त्या वाईट शक्तिचा प्रभाव इतका जबरजस्त होता कि त्या अंधारीत बिल्डिंगच्या सर्व खोल्या पार करत तोही पाचव्या मजल्यावरच्या गच्चीवर जाऊन पोहचला.
गच्चीवर पोहचल्यावर मयंकला चारही बाजूंना फक्त अंधारच अंधार दिसत होता
मयंक -कुणी आहे का इथं?
मी कसा आलो इथं…?
मयंक भीतीने कासावीस होऊ लागला …त्याची नजर सर्वत्र भिरभिरायला लागली.कसलातरी शोध घेऊ लागली.
तेवढ्यात तो उभा असलेल्या मागच्या बाजूने गुरगुरण्याचा आवाज आला.तशी त्याने आपली नजर मागे वळवली.
जे पण त्याच्या दृष्टिस पडले ते बघून त्याची पायाखालची जमीन सरकली.
मागील बाजूस गच्चीच्या अरूंद कठड्यावर साधारण त्याच्याच वयाची एक मुलगी उलटी लटकलेली दिसली.तिचे दोन्ही पाय हवेत जणू कोणी बांधलेले होते.डोके खाली होते.डोक्यावरून लांबचलांब केसांच्या बटा जमिनीवर खाली लोंबत होत्या.चेहरा केसांनी पूर्णपणे झाकलेला होता.उलटी लटकलेली असल्याने पाय दिसत होते.पायात भरगच्च घूंगराच्या लडिंचे अनेक वेढे होते.हवेत उलटे लटकलेले पाय ती अशा पध्दतीने हलवत होती जेणे करून तिने घातलेल्या घूंगरांचा आवाज होई.दोन्ही हात कठड्यावर ऐसपैस ठेवले होते…हातांची बोटे लांबसडक….त्याहून बोटांची नखे लांब,दोन्ही हातांमध्ये रंगबीरंगी काचेच्या बांगड्या भरलेल्या होत्या.त्या बांगड्यांनी भरलेले हात ती कठड्यावर ठेऊन वाजवत होती.तिचा चेहरा तिच्याच केसांनी पूर्णपणे झाकलेला होता..आणि स्वतःहाचे डोके हलवत ती लांबसडक केसांनाही झुलवत होती..हे सर्व करतांना तिचा गुरगुरण्याचा आवाजही खूप बेसूर होता. त्यामुळे तिचे हे रूप खूपच विद्रूप वाटत होते..
सर्वच खूप भयंकर आणि विचित्र दिसत होते.
हे सर्व पाहून मयंकची शुध्द हरपली आणि तो बेशुध्द होऊन खाली कोसळला.
इकडे कार्यक्रम आटोपून सर्व जण घरी परतले.एव्हाना लाईटही आलेली असते.पण सर्वांना एकच आश्चर्य वाटते..कि मयंक इतका बेफिकिर कसा असू शकतो..रात्रीचे साडे अकरा, पावणे बारा होताय आणि ह्याने खुशाल दरवाजा उघडा ठेवावा.
प्रमोद ,विनोद सर्व जण मयंकला शोधतात…
प्रज्ञा किचनमध्ये जाते तर खाली फरशीवर पाणीच पाणी पडलेले .पाण्याची बाटली तशीच रिकामी पडलेली….फ्रिज उघडाच.. ताटासहित थालीपीठही खाली पडलेले…हे सगळे असे पाहून
प्रज्ञाला धक्काच बसतो .इकडे सगळीकडे शोधाशोध केल्यानंतरही मयंक कुठे दिसत नव्हता.
प्रज्ञा रडायला लागते.माझा मयंक एवढ्या रात्रीचा कुठे हो गेला असेल..?
तेवढ्यात विनोद मयंकला बेशुध्द अवस्थेत उचलून घरात आणतो.
प्रमोद -कुठे होता रे मयंक..?
विनोद -मागच्या वाड्यात ओट्यावर हयाच अवस्थेत पडलेला होता.
प्रज्ञा -अहो…आत्ताच्या आत्ता डाँक्टरांना फोन लावून बोलवून घ्या.काय झाल हे असं माझ्या मयंकला ?? पोराचं अंग थंड पडलय.मला खूप भीती वाटतेय.तुम्ही ताबडतोब बोलवा बघू डाँक्टरांना…
विनिता आणि सर्वदा प्रज्ञाजवळच तिला धीर देत बसतात..
प्रमोद डाँक्टरांना बोलावतो..घरात एक क्षणात आता खूप गंभीर वातावरण निर्माण होते.
थोड्याच वेळात डाँक्टर येतात.मयंकला चेक करतात.आणि त्यांच्याकडच्याच काही गोळ्या देतात.
.सकाळपर्यंत मिळेल आराम असं सांगतात..
प्रमोद डाँक्टरांना एका बाजूला नेऊन विचारतो कि नेमंक काय झाले असेल?
डाँक्टर सांगतात त्याला कसला तरी धक्का बसला आहे हो..मानसिक धक्का.
मयंकला प्रज्ञा त्यांच्याच खोलीत झोपवते.रात्र भर प्रज्ञा व प्रमोद ह्याच विचारात जागे राहतात.
सकाळी सर्व जण उठून आपापल्या कामाला लागतात.
इकडे खोलीत मयंकला अचानक पुन्हा तोच शूकशूक टाळ्यांचा, घूंगरांचा आवाज झोपेत ऐकायला येऊ लागल्याने तशी त्याला जाग येते.
मयंक उठूनच बाहेर पळत येतो. आणि जोरजोरात रडत.त्या बंद बिल्डिंग कडे बोट दाखवतो तशी प्रज्ञा मयंकला जवळ कवटाळते आणि विचारते अरे…मयंक काय झाले.? सर्व जण त्याच्या अवती भवती जमतात.पण मयंकचे जोरजोरात हुंदके देऊन रडणे अजूनच वाढते.मयंक खूप जास्त घाबरलेल्या अवस्थेत व कसल्यातरी दबावाखाली असलेला दिसतो
बंद बिल्डिंग कडे बोट दाखवत मयंक जोरजोरात रडत….. कुणी तरी आहे तिथं …. कुणी तरी आहे तिथं
प्रमोद ,विनोद,प्रज्ञा, विनिता,प्रमोद ,विनोद,प्रज्ञा, विनिता, सर्व जण त्याला समजावतात कि अरे गेले कित्येक वर्षे ती बिल्डिंग अशीच बंद आहे.तिथं कशाला कोण असेल बरं.
ती बिल्डिंग बंद आहे मयंक.
मयंक-नाही,ती बिल्डिंग उघडी आहे आणि कुणी तरी आहे तिथं
ते मला खुणावतंय……
ते मला बोलावतंय…..
कुणी तरी आहे तिथं
कुणी तरी आहे तिथं
क्रमशः
पोर्णिमा शिंपी
कुणीतरी आहे तिथं भाग१
https://marathi.shabdaparna.in/कुणी-तरी-आहे-तिथं-१
कुणीतरी आहे तिथं भाग२
https://marathi.shabdaparna.in/भयकथा-कुणीतरी-आहे-तिथं
कुणीतरी आहे तिथं भाग ४
https://marathi.shabdaparna.in/४-कुणीतरी-आहे-ति
कुणीतरी आहे तिथं भाग ५
https://marathi.shabdaparna.in/५-कुणीतरी-आहे-ति
उत्सुकता कायम.
अरे देवा, क्रमशः
थरारक