आता मात्र मयंक …कुणीतरी आहे तिथं…ह्या विचाराने पूर्ण घाबरला होता …
अशा भेदरलेल्या अवस्थेत , त्याला काही सूचेनासे झाले घामाने शरीर पूर्ण ओलेचिंब झाले होते.यापूर्वी मयंक असा इतका कधीच घाबरलेला नव्हता……..
इकडे गच्चीवर सर्वजण मयंकची वाट बघत बसले होते.टाॕयलेट ला जाऊन येतो पाच मि.असे सांगणारा हा मयंक अजून कसा आला नाही ? म्हणून प्रमोद व प्रज्ञा दोघांना जास्त काळजी वाटते.वहिनी प्रमोदला खाली जाऊन मयंकला आणायला सांगते
खाली टाॕयलेट मधे मयंक जवळजवळ भानच हरपला होती.तितक्यात हाक कानावर पडली
मयंक…ऐ मयंक…अरे इतका वेळ का रे ? प्रमोद दादाने बाहेरूनच हाक मारली.
मयंक दचकलाच आणि त्याला क्षणभर समजलेच नाही.तो इतका घाबरला होता कि हा आवाज ..ही हाक आपले बाबा देत आहे यावर देखील त्याला विश्वास बसत नव्हता….आता मात्र प्रमोदने टाॕयलेटचा दरवाजा ठोठावत त्याला पुन्हा जोरात हाक मारली..तसा मयंक भानावर आला आणि त्याला खात्री झाली कि हे बाबाच आहेत..त्याने दरवाजा उघडला..आणि बाबांना समोर बघताच तो त्यांना बिलगला..
प्रमोद – काय रे ….मयंक काय झाले….इतका वेळ कसा रे लागला ??
यावर मयंक काहीच बोलला नाही.तो तसाच स्तब्ध राहिला.दोघेही गच्चीवर जातात.जातांना पुन्हा मयंकची नजर शेजारील अंधारीत बिल्डिंगवर गेली.तशी त्याच्या छातीची धडधड वाढायला लागली……गच्चीवर पोहचताच सर्वांचा एकच प्रश्न ..इतका उशीर का ? इतका वेळ काय करत होतास ? पण मयंक मात्र निरूत्तर व शांतच राहिला.
मयंकला गच्चीवर येण्यास वेळ झाल्याने सर्वांचा मूड तर गेलाच होता.सर्व आवरून सर्व जण खाली आले आणि आपापल्या खोल्यांमध्ये झोपण्यासाठी गेलेत…
मयंक आधीच खूप घाबरलेला होता.त्याला थोडे अस्वस्थही वाटत होते म्हणून त्याने प्रज्ञाला ( त्याची आई ) विचारले…
मयंक-आई मी तूझ्याजवळ झोपू का गं आजच्या दिवस ??
प्रज्ञा -हो रे…. बाळा ..विचारतोस का ? झोप.नं..
मयंक आईच्या कुशीत झोपला.आईच्या प्रेमळ स्पर्शाने त्याची भीती जराशी कमी झाली.त्याला केव्हा झोप लागली हे समजलेच नाही
मयंक झोपल्यानंतर ……
प्रज्ञा व प्रमोद …दोघंही बोलतात.
प्रज्ञा -काय बरं झाले असेल हो आपल्या मयंकला ???
फारच घाबरलेला आहे…..याआधी मी मयंकला असा कधीच इतकं घाबरलेले बघितले नव्हते.
प्रमोद -हो मी हि तोच विचार करतोय कि ह्याला नेमकं झाले तरी काय ???
या विचारात दोघेही झोपी जातात….
दुसऱ्या दिवशी सकाळी हाँल मध्ये सर्व जण चहा नाश्ता साठी एकत्र जमतात..पण त्यात मात्र मयंक नसतो..म्हणून विनिता मानवला मयंकला बोलवण्यास पाठवते…..
मानव पूर्ण घरभर मयंक ला शोधतो..पण त्याला दिसत नाही.शेवटी मागच्या अंगणात मयंक एकटाच ओट्यावर बसलेला आणि शेजारील पडिक बिल्डिंग कडे एकटक बघत असलेला मानवला दिसतो.
मानव -ऐ दादा…इथं रे का बसलास एकटाच? चल हाँलमध्ये सर्व जण वाट बघताय तूझी.
पण मयंक स्तब्धच होता…त्याला जणू मानव काय बोलला हे ऐकायलाच गेले नाही असा.
शेवटी मानव ने मयंकला जोरात हलवले आणि जोरातच बोलला…..
दादा…ऐ दादा अरे कुठे हरवलास? इतका काय आणि कशाचा विचार करतोय ..?
मयंक निरूत्तर…त्याचा चेहरा पडलेला,निराश वाटला.
मानवने मयंकला हलवल्यावर त्याला भान आले.
दोघेही हाँल मध्ये जातात.सर्वांच्या चहा नाश्ता करत गप्पा सुरू असतात…पालवी व श्लोक टिव्ही बघत असतात.
मयंक येऊन बसतो…पण काहीच बोलत नाही.
इतक्यात विनोद मध्येच कशाची तरी आठवण झाल्यासारखे बोलतो.अरे सर्वांनी संध्याकाळी ७ ते ७.३० पर्यंत तयार रहा..आपल्याला एका कार्यक्रमाला जायचे आहे…..
विनिता -अरे हो…विसरलोच की आम्ही.शेजारच्या कुळकर्णी काकांकडे मोठा कार्यक्रम आहे आज सायंकाळी.
प्रमोद -कशाचा गं कार्यंक्रम ??
विनोद-अरे दादा
शेजारच्या कुळकर्णी काकांच्या एकूलत्या एक नातवाचा नामकरणविधी आहे आज…आणि मोठा सोहळा आहे म्हणून त्यांनी हा कार्यक्रम हाँलवर ठेवला आहे….
प्रज्ञा -(आश्चर्याने) अरे हो कि मी विसरलेच हे .कुळकर्णी काकांच्या घरात जवळजवळ वीस वर्षांनी पाळणा हालला आहे.खूप आनंदात आहेत सर्व जण…देवाची कृपा आणि काकांची पुण्याई म्हणून बघा नं…..काका काकूंना ते हयात असतांना नातवचे तोंड तरी पाहायला मिळाले……..
प्रमोद-अरे…वा.. छानच कि.जाऊ कि सर्व जण.तुम्ही सर्वजण आम्ही आँफिसमधून येण्याआधी तयार रहा.
एवढी चर्चा झाल्यावर सर्व जण आपापल्या कामांना निघतात…
मयंक मात्र एकटाच त्याच्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून बसून राहतो.
संध्याकाळी साधारण साडेसहाच्या दरम्यान सर्व जण कुळकर्णी काकांकडे कार्यक्रमाला जायच्या तयारीला लागतात…..
प्रज्ञा मयंकला तयारी करण्यासाठी सांगायला त्याच्या खोलीत जाते तेव्हा तो झोपलेला असतो…
प्रज्ञा -मयंक चल ..उठ बाळा…तयार हो आपल्याला जायचे ना… कार्यक्रमाला.
मयंक -नाही गं आई …तुम्ही जा मी नाही येत.मी थांबतो घरीच…..
प्रज्ञा -अरे..असा काय करतोस.चल ना.थोडा फ्रेश होशील…चल चल उठ लवकर…हो तया.बाबा आणि काका येतीलच इतक्यात….
मयंक -( थोडा चिडूनच) मला नाही ना यायचे…..प्लिज ..जा तुम्ही सर्व…मी थांबतो घरीच……….
प्रज्ञाला मयंकच अस वागणं थोडं विचित्र वाटतं…एरवी सतत बाहेर कुठेतरी घेऊन चला ना असा हट्ट करणारा मुलगा आज चक्क नकारघंटा वाजवतोय।……
प्रज्ञाने विचार केला त्याचे बाबा येतील ते समजावतील त्याला म्हणून ती तयारीसाठी तिच्या खोलीत जाते.तिकडे प्रमोद दादा आलेलाच असतो..।प्रज्ञा प्रमोदला सर्व सांगते .
प्रमोद -ठिक आहे प्रज्ञा .मी जातो आणि बघतो.कसा येत नाही मयंक ते…
प्रज्ञा -अहो. रागावू नका हो त्याच्यावर…थोडा अस्वस्थ वाटतोय…नसतो मूड एखाद्या वेळी…नसेल येत तर नका करू फोर्स….मी पटकन काहीतरी त्याच्यासाठी खायला बनवून ठेवते.
प्रमोद -(गंभीरतेनेच) बरं……
प्रमोद मयंकला खूप समजावतो पण मयंक सोबत येण्यासाठी नाहीच म्हणतो….
प्रमोद -ठिक आहे नको येऊस.पण तू राहशील घरी एकटाच ?…..घाबरणार तर नाहीस ना .? का ..मी थांबू तूझ्या सोबत.??…मी पण नाही जात.
मयंक-नको…नको….बाबा….तुम्ही जा सर्वे जण..मी थांबेल घरातच..आणि मी नाही घाबरणार…..
प्रमोद -नक्की…?
मयंक– हो ..बाबा .. नक्की…
मयंकने इतकी खात्री दिल्यानंतर सर्वे जण कार्यक्रमासाठी संध्या.७.३० ला घराबाहेर पडतात.. कार्यक्रमाचा हाँल १५ मि.च्या अंतरावरच म्हणजे घराजवळच असतो.. म्हणून सर्व जण पायीच निघतात…..
प्रज्ञा -मयंक बाळ मेन गेटला कडी तर आम्ही बाहेरून लावतो आहे..तू मात्र घराला आतून व्यवस्थित कडी बंद करून बस…..आणि हो भूक लागली तर मी करून ठेवले तुझ्या आवडीचे थालीपीठ ते खाऊन घे.ओके.काळजी घे रे.येतोच आम्ही.सगळे निघतात.
क्रमशः
आता घरी मयंक एकटाच असतो.काय होईल त्याच्यासोबत?
वाचा पुढील भागात.
https://marathi.shabdaparna.in/भाग३-कु
पोर्णिमा शिंपी
काय होईल पुढे मयंकसोबत?
उत्सुकता वाढवणारे कथानक
खरंच काय होणार ? भीतीदायक की गंमतीदार काही
उत्सुकता कायम