मेरे वतन के लोगो देशभक्तीगीत  रसग्रहण
मेरे वतन के लोगो देशभक्तीगीत रसग्रहण

मेरे वतन के लोगो देशभक्तीगीत रसग्रहण

15ऑगस्ट असो किंवा 26जानेवारी हे दोन्ही दिवस एका गीताने पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही.या दोन्ही दिवशी हे गीत ऐकले नाही असं होतच नाही.लता मंगेशकर यांचा आवाज लाभलेले आणि कवी प्रदीपजी यांनी लिहिलेले ते गीत म्हणजे “ए मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पाणी,जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी ” भारतीय सैनिकांबद्दल असणारी आठवण,अभिमान, जिव्हाळा,आदर आणि भारतीय सैनिकांनी दिलेले बलिदान हे भारतीयांच्या मनात सतत रहावे,यासाठी कवी प्रदीपजी यांनी लिहिलेले सुंदर असे हे गीत आहे.सैनिकांना युद्धभूमीवर कर्तव्य बजावत असताना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते,याचे वर्णनही या गीतामधून दर्शविले आहे. डोळ्यांपुढे युद्धभूमी,युद्ध आणि आपले भारतीय सैनिक असे प्रसंग उभे करण्याचे सामर्थ्य या गीतामधून दिसून येते.
भारत स्वतंत्र झाल्याचा भारतवासीयांना सार्थ अभिमान आहे,पण तो आनंद साजरा करताना,भारतीय सैनिकांनी दिलेले बलिदान विसरून चालणार नाही.भारत देशावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा जीवाची पर्वा न करता भारतीय सैनिक लढले आणि अखेरच्या श्वासापर्यंत पर्यंत लढून या भारत देशासाठी आपले बलिदान दिले. कवी प्रदीपजी हे सांगताना लिहितात “संगीन पे धरकर माथा,सो गये अमर बलिदानी”.पुढे प्रदीपजी म्हणतात ज्यावेळेस आपण सर्वजण सण साजरे करत असतो,त्यावेळेस भारतीय सैनिक आपल्या डोळ्यात तेल घालून देशाच्या रक्षणासाठी सज्ज असतात,आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित असतो कारण त्यावेळेस हेच सैनिक आपल्या शत्रूशी चारहात करत असतात.हेच सांगताना कवी प्रदीपजी या गाण्यात लिहितात, “जब देश मे थी दिवाली,वो खेल रहे थे होली,जब हम बैठे थे घरों मे,वो झेल रहे थे गोली”अशा आपल्या भारतीय सैनिकांचे वर्णन करताना कवी प्रदीपजी सैनिकांना म्हणतात, “थे धन्य जवान वो अपने,थी धन्य वो उनकी जवानी”
कवी प्रदीपजी यांनी इथे सांगितले आहे की, जेव्हा जेव्हा भारत देशावर आक्रमण होते तेव्हा सर्व भारतीय जसे एक होऊन लढतो त्याचप्रमाणे सीमेवर लढताना प्रत्येक सैनिक हा कोणत्याही जाती धर्माचा नाही तर फक्त एक भारतीय सैनिक म्हणून शत्रू बरोबर लढला.याचे वर्णन करताना सुंदर ओळ लिहिली आहे.”कोई सिख कोई जाट मराठा,कोई गुरखा कोई मद्रासी सरहद पे मरनेवाला हर वीर था भारतवासी” जे रक्त भारताच्या रक्षणासाठी सांडलं ते कोणत्याही जाती धर्माचे नाही,तर ते फक्त हिंदुस्थानी होते.रक्ताच्या थारोराळ्यात असून देखील एक एक सैनिक दहा दहा शत्रू सैनिकांच्या बरोबरीने लढले.
आणि शेवटच्या श्वासापर्यंत ज्या भारतीयांसाठी लढतात त्यांचा निरोप घ्यायला ते विसरत नाही.हे सांगताना प्रदीपजी म्हणतात “खूश रहेना देश के प्यारो, अब हम तो सफर करते है”आणि नकळत डोळ्याच्या कडा ओल्या होतात.इतका भारताबद्दल असणारा जिव्हाळा,प्रेम असे हे भारतीय सैनिक होते आणि आहेत.भारतीय सैनिकांच्या बलिदानाला लक्षात घेऊन कवी प्रदीपजी यांनी खूप उत्कृष्ट असे गीत लिहिले आहे.लता मंगेशकर यांनी इतक्या सुंदर पद्धतीने गायले आहे.लता मंगेशकरजी या गीताबद्दल एक आठवणं सांगतात,जेव्हा जेव्हा लतादीदी गाण्याच्या कार्यक्रमासाठी गाणी गायला उभ्या राहतात तेव्हा तेव्हा या गाण्याची फर्मायीश आवर्जून केली जातेच असे हे अजरामर गीत आहे.भारतीय सैनिकांचे योगदान आणि भारतवासीयांच्या मनात सतत भारतीय सैनिकांबद्दल कृतज्ञता रहावी यासाठी योग्य पद्धतीने कवी प्रदीपजी यांनी केलेली उत्कृष्ट रचना आहे.

 

चैत्राली भिलारे

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!