मोकळा श्वास- स्त्री कथा
मोकळा श्वास- स्त्री कथा

मोकळा श्वास- स्त्री कथा

मोकळा श्वास- स्त्री कथा

 

 

चिन्मय चा वाढदिवस उद्यावरआल्यामुळे विद्या खरेदीसाठी घरा बाहेर पडली . शेजारीच राहणारी शिल्पा सोबत होती. बऱ्याच दिवसानंतर एकत्र आल्यामुळे दोघींनी अगदी मनसोक्त खरेदी केली .

“चला आटोपली खरेदी.. कित्येक दिवसानंतर आपण एवढे मनसोक्त फिरतोय ग .. किती प्रसन्न वाटतंय न? .. खरेदी पण अगदी छान मनासारखी झाली.. “

शिल्पा बोलत होती. पण विद्याचे सर्व लक्ष आता घराकडे लागले असल्याने तिला शशांक घरी येण्याच्या आधी घरी जाण्याची घाई झाली . त्याला न सांगताच आज ती घराबाहेर पडली होती. .

“काय ग कुठे आहे लक्ष तुझे ? मी एकटीच केव्हापासून बडबड करत आहे.एवढा कसला विचार करतेस ?”

“अग…ऐक न आपण खूप वेळेपासून घराबाहेर आहोत. सर्व खरेदीपण आटोपली. “

विद्या ला मध्येच थांबवत शिल्पा म्हणाली,

“हो ..ग बघ…समोरच..पाणीपुरी वाला आहे. मस्त एक..एक प्लेट पाणीपुरी खाऊन घरी जाऊ ..”

पाणीपुरी च नाव कानावर पडताच सोबत ची बच्चा पार्टी आनंदाने एक सुरात ओरडली..

“हो,. खाऊ या ..पाणी पुरी…ये.. “

मुलांचा आवेश बघून विद्या त्यांना थांबवत म्हणाली.

“शिल्पा ऐक ना घरी जायला खरच खूप उशीर होतोय ग …”

“काय? ग आई चल ना..ग..तू कधीही नाहीच म्हणतेस “

आस्था आणि चिन्मय हट्टालाच पेटली.

“बर.. बर चला जाऊयात पण पटापट आटपायचं हं चालेल ना तुम्हाला.. “

मुले खुश झाली.

“अग ..हो..ग ..चल आता..बघ मुले किती खुश आहेत. आणि तू का असा चेहरा पाडून ? काय झाले? शशांक काही बोलले का? अग चालायचचं एवढे मनाला लावून घेवू नको बिनधास्त रहा .. “

किती सहज बोलत होती शिल्पा.. पण विद्याच्या कानावर तिचे शब्दच पडत नव्हते. आजच्या काळातील मुलगी असूनही विद्याला नवऱ्याची अपेक्षा सहन करावी लागत होती. संसार म्हटले की थोडेफार चालणारच म्हणून ती या कडे सुरुवातीपासून कानाडोळा करीत आली होती. पण शशांकचा दिवसेंदिवस वाढता लहरी स्वभाव, छोट्या..छोट्या गोष्टींवरुन सतत वाद घालण्याची सवय या सर्वांमुळे तिची नुसती घुसमट होवू लागली होती. पण ती मुलांकडे बघून सर्व निमूटपणे सहन करीत होती. विद्या ने मुलांवरून एक नजर फिरवली किती मजेत पाणीपुरीचा आस्वाद घेत होती. अगदी खुशीत होती आज ती… खरे च किती निष्पाप असते ना बालपण,

शिल्पाच्या म्हणण्यानुसार अगदी बिनधास्त..

“हं ..चला आटोपल का?”

शिल्पा मुलांना विचारत होती. शिल्पा चे शब्द कानावर पडताच ती बिलाचे पैसे देण्यासाठी पर्स उघडू लागली.

“अगं दिले मी काळजी करू नको..चला आता निघूया..आपण..”

असे म्हणून दोघींनी एकमेकीं ना निरोप दिला. विद्या मुलांना घेऊन झपाझप पावले टाकीत घराकडे निघाली. आपल्या आनंदावर आज तरी विरजण नको पडायला. देवा …शशांकला सुबुद्धी येऊ दे…अशा मनोमन देवाच्या धावा करीत होती.

घराजवळ पाऊल ठेवताच तिला शशांक दारातच उभा दिसला. त्यांचीच वाट पाहत असावा. मुले त्याला पाहताच आनंदाने बिलगली.

विद्या ने विचारले..

“आज लवकरच सुट्टी..

पण शशांक ने काहीच उत्तर दिले नाही.

घरात जावून विद्याने मुलांचे हात-पाय धुऊन कपडे बदलले. स्वतः ही फ्रेश झाली. तिन्हीसांजेला देवाजवळ दिवा लावू लागली . का ?कुणास ठाऊक शशांकचा अबोलपणा म्हणजे तिला वादळापूर्वीची शांतता वाटत होती .तिने वाद टाळण्यासाठी त्याला चहा आणून दिला.

“कुठे गेल्या होत्या बाईसाहेब ”

असे म्हणत शशांक ने एकदमच तिच्या हातचा चहाचा कप रागाने भिरकावून दिला. .

“मी शिल्पासोबत आपल्या चिन्मय चा उद्या वाढदिवस ना म्हणून खरेदीसाठी गेले होते जरा…”

“कोणाला विचारून.. “

“मी तुम्हाला सांगण्यासाठी फोन लावला होता. पण तुम्ही उचलला नाही. “

“मग एवढी काय जायची घाई होती. “

“अहो ..पण शिल्पा ला पण थोडे काम होते म्हणून आज आम्ही.. “

“शिल्पा शिल्पा कोण ग ?ही शिल्पा नवऱ्यापुढे तुला हिचंच जास्त महत्त्व … “

“पण तुम्हाला सांगण्यासाठी मी फोन लावला..”

तिचं काहीही न ऐकून घेता शशांक ने हाताला धरून तिला घराच्या बाहेर काढले.. मुलेही कावरी-बावरी होऊन आईला जाऊन चिटकली.

पण शशांकने दुर्लक्ष करीत धाडकन घराचे दार बंद करून घेतले. ती कितीतरी वेळ मुलांना घेऊन दाराबाहेर शशांक ने घरात परत घेण्याची वाट बघत तशीच उभी होती .तिन्हीसांजेची वेळ टळून गेल्यामुळे बाहेर अंधार पडला ..थंडीचे दिवस असल्यामुळे हवेतील गारठा जाणवू लागला होता.

“आई चल ..ना ..गं ..घरात आपण बाबांना सांगून दार उघडायला लावू ..”

मुले रडत होती. तिला काही च सुचत नव्हते.. डोळ्यासमोर अंधार पसरला होता. बंद दाराकडे एक नजर टाकीत गालावर ओघळणारे अश्रू पुसत तिने मनाशी पक्के ठरविले ..

 बस ..यापुढे सहन करायची नाही ही सततची घुसमट यातून कायमचे बाहेर पडायचे . फक्त मुलांसाठी जगायचे ..त्यांना मोकळ्या वातावरणात मोकळा श्वास घेऊ द्यायचा ..मुलांचे भवितव्य उज्ज्वल करण्याच्या हेतूने तिने खंबीरपणे पुढील पाऊल उचलले ते या घरापासून शशांकपासून    लांब  ..कधीही न परतण्यासाठी मोकळ्या आकाशाखाली मोकळा श्वास घेण्यासाठी… आपले अस्तित्व जपण्यासाठी…

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

 

 

8 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!