सुमीच्या आयुष्याच्या चलपटातील एक पट झळकला.आणि सुमीला आठवले
माझ्या वडिलांच्या चेहर्यावरील सहर्ष समाधान आणि माझ्याबद्दल चा सार्थ अभिमान. कारणही तसेच होते. आज माझा दहावीचा बोर्डाचा निकाल लागला होता. त्यात मी फर्स्ट क्लास ने पास झाले होते. शेजारी ज्यांना कळत होते ते येऊन कौतुक करत होते . माझा चुलत भाऊ पण आला त्याला त्याने आम्हा दोघी बहिणींना हिंदी चित्रपट पाहण्यासाठी घेऊन गेला. मी प्रथमच सिनेमागृहात गेले होते.त्यामुळे मला खूप आनंद झाला. तत्पूर्वी त्याने आम्हाला मीना बाजारात नेऊन फिरविले .आम्ही मोठ्या झुल्यावर बसलो .जेव्हा झुल्यावरून खाली उतरत होता तेव्हा पोटात हवा भरल्या सारखे वाटत होते .मला खूपच मजा येत होती. घरी आल्यावर माझ्या बहिणीने छान स्वयंपाक केला. आम्ही सर्वांनी गप्पा करत जेवण केले. माझ्या वडिलांना खूप आनंद झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते.
मला आठवते, वर्षभर कसा अभ्यास केला.
मी सकाळी लवकर उठून आईसोबत तिच्या कामावर जात असे .कामावरून दहा वाजता घरी येऊन शाळेची तयारी करीत असे. बहिणीने केलेला स्वयंपाक जेवण करून अकरा वाजता शाळेत जात असे. सायंकाळी शाळेतून आल्यानंतर घरातील कामे करून अभ्यास करणे असा दिनक्रम असे. पण एवढा अभ्यासाला वेळ पुरेसा नव्हता . म्हणून मी स्वतःच अभ्यासाची पद्धत तयार केली. रात्री जो पाठ वाचला तो सकाळी कामावर जाताना आठवत राही. प्रश्न क्रमांक व उत्तर असे क्रमाने आठवतच कामे पूर्ण करून येताना पण तीच उजळणी करीत घरी पोहोचे. अशाप्रकारे माझे पाठ्यपुस्तकातील प्रकरणे पाठ झालेली असे. बोर्डाचा पेपर कसा असेल याविषयी मनात कुतूहल मिश्रित भीती असे .म्हणून संपुर्ण पाठ्यपुस्तकातील प्रकरणे पाठ करून ठेवली. म्हणजे कोणताही प्रश्न कसाही विचारला तर उत्तर लिहिता यावे. गणित या विषयासाठी पाटी व लेखणी ची साथ कधी सोडली नाही. आता ते सर्व आठवले आणि मला सुटका झाल्यासारखे वाटले.
रात्रीचा माझा अभ्यास म्हणजे माझे खूप आवडते काम होते .माझ्या घरचे वातावरण किती सुंदर होते .आमचे घर म्हणजे दोन खोल्या. आतली स्वयंपाक खोली व बाहेरची ओसरी. टणटण्याच्या काटेरी वाळलेल्या झाडाचे व्यवस्थित कुंपण केलेले अंगण . त्या अंगणामध्ये मी लावलेली विविध फुलझाडे, फळझाडे, वेली, भाजीपाला इत्यादी पद्धतशीर ओळीने शिस्तीत उभे होते. झाडांव्यतिरिक्त जागेत मी रोज सडा घालून अंगण स्वच्छ व नीटनेटके ठेवी .सणावाराला त्यावर सुबक रांगोळी काढे.
सायंकाळच्या वेळी तर माझे घर सुगंधाने दरवळले असे. पारिजातकाची शेंदरी पांढरी फुले, शेवंतीची पांढरी, जांभळी, पिवळी फुले ,गुलाबाची चटक लाल, पांढरी फुले, शुभ्र मोगरा आणि फाटकाच्या कमानीवरील जाई जुई ची तर बातच न्यारी. रोज तिची परडीभर फुले निघायची .सर्वांचा सुगंध माझ्या घरापासून चार घरापर्यंत डावी कडे व उजवीकडे पसरलेला असे. एवढी फुले असताना मी कधी त्यांना तोडत नसे. दोन-तीन दिवसांनी ती आपोआप गळून जात. मला ते झाडांवरच बघायला आवडे. एका बाजूला आंब्याचे डौलदार झाड, लिंबू ,डाळिंब, पेरू इत्यादी झाडे पण आपापल्या मोसमात भरपूर फळे देत.
अशा सुगंधाने भारलेल्या वातावरणात मी अंगणात काही अंथरूण माझ्या जिवलग कंदीलासह अभ्यासाला बसे. त्यातही पौर्णिमेची रात्र मला खूप आवडायची. त्याचे टपोर चांदणं या सुगंधी वातावरणात मोहून टाकायचे. रात्रीचे बारा वाजले तरी त्या शुभ्र पूर्णचंद्राचा मोह सुटायचा नाही.
माझ्या शेजाऱ्यांनी मला माझ्या परिस्थितीनुसार दहावीनंतर डी. एड करण्याचा सल्ला दिला .पण मला पुढे शिकण्याची जिज्ञासा होती .त्यामुळे मी इयत्ता अकरावी मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला .महत्त्वाचे म्हणजे मी आता मोठी झाल्याने माझ्या बहिणीने माझे कामावर जाणे बंद केले. आणि माझ्या अभ्यासाचा आधी जो विरोध करायची ते पण बंद केले .प्रोत्साहन दिले नाही पण मी अभ्यास करताना दिसली तरी ती रागावत नसे. ती फक्त म्हणायची की कामाच्या वेळी काम कर व त्यानंतर अभ्यास कर .मी हा नियम नेहमीसाठी पाळला .आता घरची सर्व कामे मीच करायची कारण बहिण बाहेर कामाला जायची .याच कामावर माझ्या नवऱ्याशी तिची ओळख झाली आणि पुढे घराची आणि घरातल्या माणसांची वाताहत झाली.
क्रमशः
गुंता भाग-१४ची लिंक
https://marathi.shabdaparna.
प्रिय वाचक,लेखक तुम्हीही तुमचे लिखाणा शब्दपर्णवर पाठवू शकता.
सुंदर
उत्तम