९-उलटे पडले फासे-मराठी कथा-कादंबरी
९-उलटे पडले फासे-मराठी कथा-कादंबरी

९-उलटे पडले फासे-मराठी कथा-कादंबरी

उलटे पडले फासे-९
मराठी कथा-कादंबरी
 भाग ९
विनय हरवला पण त्याची डायरी राहूल,मनिषच्या हाती आली.डायरी वाचल्यानंतर दोघांनीही सुधरायचे ठरवले. ज्याच्यामुळे त्यांचे आयुष्य बदलले,आयुष्याला दिशा मिळाली त्या विनयला त्यांनी शोधायचे ठरवले.विनय त्यांच्या आयुष्यात  मित्रापेक्षा मार्गदर्शक ठरला.
आता पुढे वाचू या
राहूलचे मनोगत
भाग-९
एक दिवस असेच मी आणि मनिष खोलीत बसून होतो.मनिष म्हणाला.विनय सध्याच वापस येईल असे वाटत नाही.
 त्याचे पुस्तके तरी व्यवस्थित  लावून ठेवू.
मी आणि मनिषने त्याचे पुस्तके लावायला घेतली. वह्या,पुस्तके सगळे किती टापटीप होते. सुवाच्च अक्षरात होते सगळे लिहून. पुस्तके,वह्या लावता लावता डायरी दिसली. मी ती वाचावी कि नाही या संभ्रमात होतो.तेवढ्या वेळात मनिषने ती उघडून वाचायला सुरुवात देखील केली.
एकेक पान वाचता वाचता डोळ्यातीन आसवे डायरीवर पडायला लागली. आमच्याबद्दल किती निर्मळ मन होते त्याचे.आम्ही सुधरावे म्हणून खूप  प्रयत्न  केले आणि   आम्ही.
आमचा आम्हालाच राग यायला लागला.
आई,बाबा,बाई यांच्या समजवण्याने जे काम झाले नाही ते या डायरीने केले.एका क्षणात आम्ही आमच्यात बदल करण्याचे ठरवले,
आम्ही वाल्याचे वाल्मिकी होणार होतो.
दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन आधी आम्ही पूर्ण वर्गासमोर चोरीची कबुली दिली. विनयबद्दलचे मळभ दूर केले.
तो आता वर्गात आधीपेक्षाही आवडता झाला.
पण तो कुठे  आहे?
हा प्रश्न सगळ्यांनाच छळत होता.
आम्ही होस्टेलवरुन त्याचे बाबा ज्या आॕफिसमध्ये काम करायचा तिथला नंबर घेऊन फोनही केला.पण त्यांनी ते आता इथे कामाला नाही एवढेच उत्तर दाले.
परीक्षा  झाल्यावर त्याच्या गावी जायचे आम्ही ठरवले.
दिवस सरत होते.परीक्षा जवळ येत होती.
आम्ही विनयमुळे अभ्यासाला लागलो होतो.
परीक्षेचे form भरले.परीक्षेची तारीख आली.पण विनयचा पत्ता नव्हता.आता तो दहावीची परीक्षा देणार नाही हे नक्की
झाले. त्याचे वर्ष वाया जाणार या विचाराने सरांना आणि  बाईंना खूप वाईट वाटत होते.
आमच्यात झालेला बदल बाईंच्या,सरांच्या लक्षातही आला.
दहावीची परीक्षा संपली. अभ्यास केला त्यामुळे पेपरस् चांगले गेले.
आता आम्हाला होस्टेल सोडावे लागणार होते.आम्ही आधी विनयच्या घरी जायचे ठरवले.त्याचा पत्ता होताच आमच्याजवळ.
विनयचे सामानही सोबत घेतले.त्याची डायरी मनिषने मनिषच्या सामानात ठेवली. आम्ही त्याच्या गावी पोहचलो.
गाव साधारण.जास्त मोठे  नाही आणि छोटेही नाही.पत्ता हातात घेऊन शोधत शोधत घराजवळ पोहचलो.घराला मोठे कुलूप होते.दाराला  मनोहर मोरे अशी धूळ बसलेली पाटी होती.
आम्ही आजूबाजूला चौकशी केली. त्यांच्या शेजाऱ्यांनी दिलेली माहिती फार धक्कादायक होती.
विनयचे वडील कोणाकडून तरी लाच घेतांना पकडले गेले.
आयुष्यभर स्वतःची तत्वे सांभाळत जगणाऱ्या मनोहर मोरेंनी आरोप होताच आत्महत्या केली.तो धक्का सहन न होऊन त्यांची आईही गेली. आतापर्यंत प्रतिष्ठित समजले जाणारे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले.
गावात झालेली बदनामी सहन करणे विनयच्या आईला कठीण  होत होते.
गरजेपुरते सामान आणि विनय,विणाला सोबत घेऊन तिने गाव सोडले कुणाला काहीही न सांगता.
माझा आणि मनिषचा काही विश्वासच बसत नव्हता यावर.
तेवढ्यात शेजारी बोलले
ते बघा विनयचे मित्र पंकज आणि विजय येत आहेत.त्यांना माहित असेल काही.
 ते दोघेही जवळ आले.आणि शेजाऱ्यांना सांगायला लागले,काका  विनयच्या वडिलांनी लाच घेतलीच नाही.कोणी दुसऱ्यानेच त्यांच्यावर आळ आणला.
 त्यांचे म्हणणे ऐकून सगळे अवाक् झाले.
 ज्या कारणासाठी विनयचे वडील,आजी गेले ते कारण घडलेच नव्हते तर.
 अरेरे! किती वाईट झाले होते. काय म्हणावे दैवाला?
 कोणीतरी चूक  केली आणि  विनयचे संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाले.विनयचे वडील,आजी यांना जीव गमवावा लागला.
 एका घराचे स्वप्न कायमचे हरवले.
 आम्ही हताश होऊन वापस आलो. विनयला कुठे शोधायचे हा प्रश्नच होता.
 विजय आणि पंकजला आम्ही आमचे पत्ते दिले आणि विनयची काही माहिती मिळाली तर कळवायला सांगितले .
दहावीचा निकाल लागला. आम्ही दोघेही पास झालो. हे सगळे विनयमुळे झाले होते.
विनयच्या नसण्याने या आनंदाला दुःखाची झालर होती.
मी आणि  मनिषने एकाच काॕलेजमध्ये ॲडमिशन घेतली.
सुरूवातीला विजय आणि पंकजला पत्र पाठवून विनयबद्दल विचारत होतो,नंतर ते कमी होत होत बंद झाले.
हळूहळू विनयला शोधण्याचे प्रयत्न कमी होत गेले. आयुष्यात दुसऱ्या बऱ्याच गोष्टींनी प्रवेश केला.आमच्या मनातील विनयचे अस्तित्व संपले नाही पण कमी होत गेले.
आयुष्य पुढे पुढे जात राहीले.मी आणि मनिष ग्रॕज्युएट झालो.   मी एमपीएससीची तयारी सुरु केली आणि  मनिषने लाॕ काॕलेजला अॕडमिशन घेतली.
आमचे दोघांचे मार्ग आता वेगवेगळे झाले होते.पण मैत्री तेवढीच घट्ट होती.
मधून मधून मनिष विनयच्या डायरीबद्दल बोलत राहायचा.
कुठे असेल विनय ?
हा प्रश्न अनुत्तरीत होता.
पुढे मी एमपीएससी होऊन पोलीसखात्यात लागलो आणि  मनिष सरकारी वकील बनला.
माझे लग्न माझी शाळेतील मैत्रीण अर्पिताशी झाले.
मनिष काॕलेजमध्ये शिल्पाच्या प्रेमात पडला. शिक्षण संपल्यावर दोघांनी लग्न केले.
लग्नानंतर मनिषच्या स्वभावात बदल होत गेला. वडील आणि  बहिणीच्या  अचानक जाण्यामुळे घरापासून दुरावलेल्या मनिषला आता घराबद्दल ओढ वाटू लागली. त्याचे अस्तव्यस्त जीवन जरा स्थिरावले.
नशिबाने आम्ही एकाच शहरात आहोत.
आणि  आता अचानक……विनय सापडला पण अशा अवस्थेत.
विनयची अशी अवस्था का झाली असेल?
क्रमशः
Previous Link
Next Part
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

https://www.facebook.com/Jeevangaanesaptsuranche/

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!