एकटेपणा,वाट बघणे आणि आठवण
ह्या तिन्ही गोष्टी उदासी देणाऱ्या. आणि त्यात वेळ जर रात्रीची असेल तर विरहभावना अधिक तीव्र बनते.
पण ह्या तिन्ही भावना एकत्र करुन गीतकार योगेशने जे गीत लिहिले ते ऐकतांना कुणाला आठवण्यातही किती सुंदरता आहे हे जाणवते.
केवळ तिच्या आठवणीने नायकाचे मनोविश्व बदलून जाते.त्या विश्वात सगळ्या मनोहर गोष्टी आहेत.
सुगंध पसरवणारा वारा , सुवासिक चंदन, नभातील तारका,फुले. सगळे नायिकेच्या आठवणीने प्रसन्न झाले.
नायक दूरवर उभा आहे.तो गात असलेले गीत नायिकेपर्यंत पोहचत आहे.
नायक किशोरकुमारच्या आवाजातुन गात आहे.
कातरता,उदासीनता ह्या गाण्यातील शब्दांमध्ये असलेल्या भावना आवाजात तंतोतंत उतरल्या आहेत.
नायिकेला दुरवरुन गाण्याचे सूर ऐकू येत आहेत.
तो तिच्या आठवणीत रमतो आणि त्याचे अवघे जग बदलून जाते. त्याच्या ह्दयाच्या तारा छेडल्या जातात आणि त्यातून मधूर सूर बाहेर पडत आहे.
आए तुम याद मुझे, गाने लगी हर धड़कन
ख़ुशबू लाई पवन, महका चंदन
आए तुम याद मुझे …
तुझी आठवण आली आणि ह्दयाच्या ठोक्यातून सुरेल स्वर बाहेर पडायला लागले.वाहता वारा सुगंध घेऊन आला.आणि चंदन आधी होते त्यापेक्षाही सुगंधीत झाले.
जिस पल नैनों में सपना तेरा आए
उस पल मौसम पे मेंहंदी रच जाए
और तू बन जाये जैसे दुल्हन
आए तुम याद मुझे …
ज्याक्षणी तू स्वप्नात येतेस तो क्षण आजूबाजूचे वातावरणच भारावून टाकते. मेंदी लावून सजते.आणि त्याक्षणी जणू तू माझी नववधू असतेस.
जब मैं रातों में तारे गिनता हूँ
और तेरे कदमों की आहट सुनता हूँ
लगे मुझे हर तारा तेरा दरपन
आए तुम याद मुझे …
रात्री मी नभांगणातील तारका मोजतांना अलवार पणे तुझ्या पावलांची चाहूल ऐकतो.
त्या तुझ्या येण्याच्या भासातून प्रत्येक तारकांमध्ये मला तुझेच प्रतिबिंब दिसते.
हर पल मन मेरा मुझसे कहता है
जिसकी धुन में तू खोया रहता है
भर दे फूलों से उसका दामन
आए तुम याद मुझे …
क्षणागणिक माझे मन,ह्दय मला सांगत आहे,जिच्या आठवणीत तू रममाण झालेला आहेस,तुझ्या मनात सदा जिचे अस्तित्व आहे तिची ओंजळ फुलांनी भरुन टाक.
अँग्री यंग मॕन अमिताभने ह्या गाण्यात केलेला हळूवार अभिनय, सचिनदेव बर्मनचे संगीत आणि हृषीकेश मुखर्जीचे दिग्दर्शन असलेला १९७५ साली आलेल्या ‘ मिली ‘
सिनेमातील हे गीत आजही ऐकणाऱ्याच्या मनात रुंजी घालते.










अती सुन्दर समीक्ष्ण . 👏👏