सुंदरा मनामध्ये भरली-marathi story
सौ. प्रिया (गोस्वामी ) देशपांडे
खूप दिवसांचं माझ्या मावस भावाचं म्हणजे अरविंदचं मी पुण्यात सुट्टीला यावं असं आग्रहाचं निमंत्रण होतं आणि योगायोगानं कॉलेजात असतानाच माझी पुण्यात येणार असलेल्या प्रतिभासंगम कार्यक्रमासाठी निवड झाली.
सुदैवानं पुण्यात जाण्याचा योग लवकरच आला.
असं म्हणतात ‘ज्यानं नाही पाहिलं पुणे त्याचं जीवन उणे’
म्हणून ही उणीव मागे ठेवली नाही.
संधी मिळताच तात्काळ बॅग भरली आणि पुण्यास रवाना झाले .
दोन दिवसाचा कार्यक्रम मजेत पार पडला आणि मग मी फोनवर अरविंद शी संपर्क साधला तेव्हा तो लगेच मला घ्यायला आला. आम्ही दोघे त्याच्या घरी गेलो तिथे गेल्यावर मला खूप प्रसन्न वाटले कारण अरु माझ्यासारखाच साहित्यिक विचाराचा होता. तो सावरकरां प्रमाणे बुद्धिवादी विचारांचाही होता. त्याच्या घरातील बैठकीत समोरच सावरकरांचं मोठं छायाचित्र भिंतीवर लावलेलं होतं.
तो ध्येयवादी विचारांचा होता म्हणूनच त्याने अन् त्याचे माझे विचार अधिक जुळत असत. अरु तसा बिझी माणूस होता. एका नामांकित कंपनीत तो इंजिनियर. वयाने जरी माझ्यापेक्षा मोठा असला तरी तो मला लाडाने दीदीच म्हणायचा .
पुण्यात त्याचा दोन रूमचा ब्लॉक होता . अजून तरी तो एकटाच राहत होता. किती वेळा तरी त्याला सर्वांनी दोनचे चार हात करण्याचा सल्ला दिला होता.
पण छे ! तो मनावर घेत नव्हता.
बऱ्याच चांगल्या मुली त्याला सांगूनही येत होत्या पण त्याने मनावर घेतले तर ना !
माझ्या येण्याने तो अगदीच सुखावला होता. घरात एकटाच राहणारा पुरुष पण घर कसं संसारिक वाटत होतं . इतकं कि घरात काय हवं काय नको वेळोवेळी निरीक्षण करत होता. विशेष म्हणजे अरुला बाहेरचं खाणं मुळी आवडतच नव्हतं.
पुरणपोळी म्हणजे त्याचा जीव की प्राण होती. त्यामुळे त्याने स्वयंपाकास खास बाईच लावली होती.
पण मी तिथे गेले आणि त्याला आनंद झाला, तो का ? तर आता त्याला पुरणपोळी आणि सोबतच रोज एक पदार्थ खायला मिळणार होता.
पुढे आमचा रोजच फिरायला जाण्याचा कार्यक्रम ठरू लागला. ड्युटी संपताच तो लवकर घरी परतायचा आणि पुणे पाहण्यात वेळ कुठे निघून जायचा कळतच नव्हते.
दिवस अगदी कसे मजेत जात होते मला येऊन आज चार दिवस झाले होते . या चार दिवसात शनिवारवाडा , पर्वती, सिंहगड बरंच काही पाहून झालं होतं .
आज पाचव्या दिवशी अरुने मला विचारलं ,
दीदी आज कोठे जायचं सांग ना?
माझं काय, तू नेशील तिकडे .
मला फक्त बघण्याशी मतलब
मी लगोलग उत्तर फेकले .
चल आज आपण सारस बागेत जाऊया . मी तयार झाले आणि आम्ही दोघे बस स्टॉप वर गेलो. पुण्यात घराबाहेर पडणं काही अंबाजोगाई एवढं सोपं नाही याचा अनुभव येत होता. पण हळूहळू मलाही सवय होत होती .
स्थानकावर पोहोचलो तेव्हा एका पाठोपाठ एक बसेस येत होत्या.
प्रवाशांना खचून दाबून आपल्या पोटात घेत होत्या आणि नदीतून एखादी लाट पुढे सरकून दिसेनाशी व्हावी तशा दूरवर दिसेनाशा होत होत्या. पण आमच्या उपयोगाची एकही बस येत नव्हती .
अरु बस पहात होता तर मी मात्र इकडे तिकडे नजर फिरवून त्या उंच इमारतींना बघून या आधुनिकीकरणाचे कौतुक पहात होते.
रस्त्यावरचा गजबजाट,गाड्यांची वाहतूक पाहून हा रस्ता कधी शांत नीरव झोपत असेल की नाही याच विचारात मी दंग होते.
एवढ्यात एका उमद्या तरुण मुलीने त्याच्या खांद्यावर चक्क हात टाकलेला मी पाहिला .
कदाचित ती माझ्याच वयाची असावी.
बावीस,तेवीस वर्षाची . वर्ण सावळा उंची जेमतेम पाच फूट नाक म्हणजे बसलेलं क्रिकेटचे ग्राउंड . अंगावर कपडे तोकडेच, तोंडात पानाचा तोबरा,खांद्यावर टाकलेली ती पर्स, तोंड नको तेवढं भरवलेलं , केसांचा नको तो अवतार केलेला आणि चप्पल तीन इंची टाचेची. एकूणच भारतीय संस्कृतीचे अधःपतन पाहायला मिळत होतं . बघून वाईट वाटलं.
मी अवाक् होऊन तिच्याकडे पहातच राहिले ती अरुला म्हणत होती,
चलने का क्या सहाब? दीडशे रुपये ओन्ली.
यावेळी अरुची उडालेली धांदल ही माझ्या नजरेतून चुकली नाही कदाचित त्याचाही पहिलाच अनुभव असावा.
मी मात्र निःशब्द ,निस्तब्ध बघतच राहिले.
अपना पास वाला स्टार हॉटेल हे ना l देखो साब क्या बात है? सहाब आप कुछ परेशान है कोई प्रॉब्लेम हो तो बता दो l हम कल मिलेंगे l वैसे मेरा नाम जाई है l
तिने एकाच दमात सारी प्रश्न उत्तरे पूर्ण केली . तसा आपल्या खांद्यावरचा तिचा हात जोरदार हिसक्याने बाजूला सारला आणि तिच्यावर हळुवार एक नजर टाकली.
सुदैवाने एवढ्यातच आमची बस आली बस मधे बसल्यावर अरुने या प्रकरणाचा माझ्यासमोर खुलासा केला.
दीदी या पुण्यात बघ हे असंच चालतं.
कशी ही संस्कृती!
ही माणसं कशी जगत असतील देव जाणे.
बुधवार पेठ भागात तर विचारायलाच नको . पण मध्येच बोलता बोलता तो शांत व काहीसा अस्वस्थ वाटत होता. हे निश्चित .
पुढे माझा दिवस मजेत गेला सारसबाग म्हणजे तर सुंदरच पण ती जाई काही केल्या माझ्या नजरेसमोरून जात नव्हती.
सारसबागेतलं ते प्राणी संग्रहालय पाहिलं आणि अरु मला म्हणाला,
दीदी त्या मघाच्या जाई पेक्षा या प्राण्यांचे जीवन किती सुखी आहे नाही का ?
तुला फारच तिच्याबद्दल क्षणातच आपुलकी वाटायला लागली रे !
मी गमतीने म्हटलं आणि आम्ही घराच्या वाटेने परत फिरलो स्टॉप वर उतरल्यावर ही अरुने इकडेतिकडे शोधक नजरेने बघितलं.
कदाचित जाईला.
क्रमशः
Next Part
https://marathi.shabdaparna.in/२-सुंदरा
प्रिय वाचक,सुंदरा मनामध्ये भरली…..पहिला भाग कसा वाटला?
Comment मधून नक्की कळवा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
Wah
छान