सूरज म्हणाला,
तुझा काही पत्ताच नव्हता एवढे वर्ष .
आणि दोघेही खळखळून हसले
. कॉफी शॉप मध्ये जाऊन निवांत बसून बोलू या का? सुरज ने विचारले .
वैशालीने उत्तर दिले, हो अगदी.. .
वैशाली सुरज सोबत बोलण्यास उत्सुक होती. ते दोघे बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा करत होते . मी येथे एम बी ए करून पुढे पप्पांचा व्यवसाय सांभाळणार असल्याचे वैशालीने सूरजला सांगितले.
तुझे लग्न झाले का?
वैशालीनेच सुरुवात केली. सूरज म्हणाला,
आता तर करिअरची सुरुवात आहे. सध्याच लग्नाचा विचार नाही .
माझे तर लग्न झाले.
वैशालीने स्पष्ट केले. सुरज ला आश्चर्याचा धक्का बसला.
माझ्याशिवाय दुसर्या कोणाशी लग्नच कशी करू शकते ?
तो मनात पुटपुटला.
तू मस्करी करीत आहेस ना ?
तो म्हणाला. ती गंभीर होत, तिची सर्व कहाणी सूरजला सांगितली. साक्षी व सागर ने मिळून तिला कसे फसवले हे सांगताना तिच्या आसवांनी आगीचे स्वरूप धारण केले होते .विशेष म्हणजे साक्षी ही वैशालीची कॉलेजची मैत्रीण असल्याने सूरजला हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला . शेवटी वैशाली म्हणाली,
सुरज ..वेळ पडल्यास तू माझी मदत करशील ना ?
अरे हे काय विचारणे झाले ?तुझ्यासाठी मी काहीही करेन.
सूरजने तिला आश्वासन दिले. वैशालीची परिस्थितीवर मात करण्याची हिम्मत पाहून सूरजने तिला मनोमन दाद दिली.
तिकडे सागर ,साक्षीचा वैशाली कडून मिळणाऱ्या पैशाचा ओघ त्यांनी ठरविलेल्या मुदतीपूर्वीच थांबल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली . त्यावरून त्यांच्यात खटके उडू लागले. अशातच सुरजचा शो त्यांच्या शहरात असल्याच्या जाहिराती झळकू लागल्या. साक्षीने शो ला आवर्जून उपस्थित राहण्याचे ठरवले.ती शो ला गेली व त्यानंतर सूरजला भेटली .अत्यंत भडक मेकअप मध्ये व आधुनिक पेहरावात अतिशय आकर्षक दिसत होती ती.
तिच्या बोलण्यातील हावभावावरून ती सुरजला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सूरजने ओळखले .त्याला वैशाली व सागर बद्दल काहीच माहित नसल्याचे त्याने साक्षी सोबतच्या संभाषणामध्ये दाखविले. सुरजचा स्वतः चा स्टुडिओ होता . तिथे प्रादेशिक भाषेतील सिनेमाची शूटिंग सुरू असल्याचे व त्याला संगीत सूरजने दिल्याचे त्याने साक्षीला सांगितले.
सुरजचे वडील मोठे व्यवसायी होते .एकूण सुरजची आर्थिक परिस्थिती सधन होती.त्याने साक्षीला पहिल्या भेटीतच चांगला प्रतिसाद दिला होता. पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन साक्षी तेथून निघाली.
अधेमधे साक्षी सुरजला फोन करून भेटण्याचा आग्रह करी.सुरजही वेळात वेळ काढून तिला भेटू लागला. दोघांच्या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले. साक्षी सुरज कडे लग्नाची मागणी करू लागली.
तिकडे सागर ही श्रीमंत मुलीच्या शोधात होताच. नेहा एका उच्चपदस्थ अधिकार्याची मुलगी आहे. हे बघून तो तिच्या मागे लागला.
त्याला वैशालीच्या वेळेचे दिवस आठवले. तिने त्याला मम्मी पप्पांकडून कित्ती पैसा पुरविला होता.तो नेहा बाबत ही तेच स्वप्ने रंगवू लागला.सुरुवातीला नेहाने त्याच्या परिस्थितीवरून त्याला दाद दिली नाही.
पण सागर ने स्वतः मोठा व्यवसायी असल्याचे भासवून तिला आपल्या जाळ्यात ओढले होते. त्या अनुषंगाने त्याला किंमती कपडे, गाडी, मोठमोठ्या हॉटेल मध्ये तिला घेऊन जाणे, विविध प्रसिद्ध ठिकाणी फिरायला नेणे , किमती भेटवस्तू देणे इत्यादीसाठी खर्च करताना वैशाली कडून मिळालेला पैसा केव्हाच संपून तो कर्जबाजारी झाला त्याला, हे कळले नाही. तो नेहाकडे लग्नाचा वेळोवेळी विषय काढू लागला पण गोड बोलून ती वेळ मारून न्यायची. त्याला नेहा सोबत लग्न केल्याशिवाय पर्याय नव्हता .ज्यांनी कर्ज दिले होते ते सर्वजण सागरजवळ पैशाची मागणी करीत होते .त्यावरून त्याचा अपमान करीत होते. काही तर मारण्याच्या धमक्याही देत होते.
ठरल्याप्रमाणे सुरज ने साक्षीला व नेहाने सागरला लग्नास होकार दिला. त्यावेळी लग्नाचे संपूर्ण आयोजन व खर्च सुरज व नेहा करतील असे स्वतः सुरज ने साक्षीला व नेहाने सागरला सांगितले. साक्षी व सागर हे फक्त विवाहाच्या वेळी आपल्या आई-वडिलांसोबत येतील असे ठरले.
लग्नाचा दिवस उजाडला तो एक भव्य सुशोभित हॉल होता .खाण्यापिण्याची सर्व चोख व्यवस्था केली होती. लग्नाला उपस्थित पाहुण्यांमध्ये साक्षी ,वैशाली ,सुरज चे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी आणि वैशाली चे मम्मी-पप्पा साक्षी चे आई वडील सुरज चे आई वडील आणि सागर चे वडील प्रामुख्याने उपस्थित होते. साक्षी नवरीच्या वेषात छान सजली होती. सागरही नवरदेवाच्या वेषात सजून तयार होता. दोघांनाही एकमेकांबद्दलच्या लग्ना बाबत माहिती नव्हते .लग्नाची तयारी झाली होती. स्टेजवर वधू साक्षी व वर सुरज तसेच वधू नेहा व वर सागर यांना आणण्यात आले. साक्षी व सागर एकमेकांना बघून आश्चर्यचकित झाले. काय होत आहे हे कळायच्या आत वैशालीने माईक हातात घेऊन उपस्थित पाहुण्यांना संबोधून स्क्रीनवर सागर व साक्षी यांचे एकत्र छायाचित्र स्क्रीनवर दाखविले. त्यानंतर तिने स्वतःचे सागर सोबत लग्नाचे काही फोटो स्क्रीन वर दाखविले. व या दोघांनी मिळून मला कसे फसविले याची थोडक्यात माहिती दिली. उपस्थित सर्व मित्र मैत्रिणी साक्षीचे आई-वडील यांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. एवढे नीच कृत्य साक्षी कशी करू शकते असा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर होता.
साक्षी तुला लाज कशी वाटत नाही असा एकच सूर उपस्थितां मधून निघाला.आणि सागरला तर पोलिसात दिले पाहिजे असे सर्वांचे मत पडले. तोच नेहाने उठून ताडकन सागरच्या थोबाडीत मारली. तसेच पायातील सॅंडल काढून तिने स्टेजवरच त्याला चांगला सडकला. ते पाहून तेथे उपस्थित वैशालीच्या मैत्रिणीही स्टेजकडे धावल्या व त्याला मिळेल त्या वस्तूने मारू लागल्या. तो नेहाच्या व सर्वांच्या तावडीतून कसाबसा पळून जाण्यात यशस्वी ठरला.
साक्षीला तर मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. ती सुरज कडे नजर सुद्धा टाकू शकली नाही . तिने मिळेल त्या मार्गाने स्वतःला सोडवून पलायन केले.
वैशालीने साक्षी व सागरला अनोख्या पद्धतीने धडा शिकविला होता. तिचा प्रतिशोध पूर्ण झाला होता. तिने दीर्घ सुस्कारा टाकला. हे सर्व घडवून आणण्यासाठी सूरजने तिला किती सहकार्य केले होते हे आठवून तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि नजरेनेच त्याला थँक्यू म्हटले . त्याने नजरेने तिला आश्वस्त केले.
घडलेल्या घटनेने सर्व उपस्थित स्तब्ध झाले होते. वातावरण तणावपूर्ण झाले होते .अशातच सूरजने माईक हाती घेतला. आणि वैशाली समोर खाली वाकून अत्यंत अदबीने तीला विचारले,
“विल यू मॅरी मी..”
वैशालीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने त्याला मिठी मारली. आणि दोघांचे लग्न तिथेच लावण्यात आले. वैशालीच्या मम्मी-पप्पांना आपल्या मुली बद्दल अभिमानाने उर भरून आला.
समाप्त
कथा आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या.प्रिय वाचक,तुम्हीही शब्दपर्ण वेबसाईटर लिहू शकता.
प्रतिशोध सुरुवातीपासून वाचण्यासाठी खालील लिंक बघा
निर्मला मेंढे
छान प्रतिशोध
सुरेख कथानक