प्रतिशोध- बदला कथा
वैशालीने सागरला समजावून सांगितले. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.तिलाही सागर चे हे वागणे कळत नव्हते.
तो काय काम करतो हे तो अजूनही तिला का सांगत नाही हे समजत नव्हते
दिवसभर तो कुठे जातो याबाबत तिला काही माहिती नसायची. घरी सासरे आणि नवरा असे त्रिकोणी कुटुंब होते .सासऱ्यांना विचारले तर,
तो विमा कंपनीत एजन्ट चे काम करतो असे सांगितले.लग्नाला वर्ष उलटून गेले होते.
ती आपला वेळ घालवण्या करता तिचा आवडता छंद म्हणजे घर सजावट करीत असायची. तिने घराचा कानाकोपरा कलात्मकतेने सजविला होता.
एकदा तिला सजावटीसाठी करिता जुन्या पद्धतीच्या डिझाइनच्या काचेच्या काही वस्तू पाहिजे होत्या. त्यासाठी ती जुन्या काचेच्या बाजारात जाण्यास निघाली. हा भाग तिच्या घरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर होता. रस्त्यावर वरून जाताना एका घरासमोर सागरची बाईक उभी असलेली तिला दिसली. तिने गाडी लांब उभी केली व तिथे पायी येऊन गेट उघडून दरवाज्यापर्यंत आली. दरवाजा बंद होता.
सागर आत मध्ये काय करीत असेल? हे कोणाचे घर असेल? तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले.
तिने दरवाजा वाजवला. जरा वेळाने प्रतिसाद न आल्याने डोअर बेल वाजवली. थोड्या वेळात दार उघडले गेले. विस्कटलेले केस व अंगावरचे कपडे नीट करत साक्षी समोर उभी होती.
साक्षी वैशालीचीच कॉलेजची मैत्रीण होती ती.आणि मागून सागरचा हळू आवाज ऐकू आला,
कोण आहे साक्षी?
वैशालीला समोर बघून साक्षी चे अवसान गळाले. तिच्या तोंडून शब्द फुटेना. वैशाली साक्षीला आत ढकलत धावतच सागरच्या आवाजाच्या दिशेने गेली .सागर काही बोलायच्या आत तिने त्याच्या थोबाडीत मारली. साक्षी मागे उभी होती. तिचे केस ओढून तिला खाली पाडले व पुन्हा सागरच्या थोबाडीत दुसरी थापड लगावली. तिच्या रागाचा पारा पाहून दोघेही धास्तावले.पण प्रसंगावधान राखून सागर पुढे आला आणि म्हणाला,
जास्त तमाशा करू नको. तुला काय वाटते , मी तुझ्याशी तुझ्या रंगरूपावरून लग्न केले ?. तुझ्या डोळ्यातील व्यंगामुळे तुझ्याशी कोणी लग्न करत नव्हते. मी तुझ्याशी लग्न केले कारण तुझ्याजवळ भरपूर पैसा होता. आम्हाला जगण्यासाठी तो पुरेसा होता. आम्ही मागील तीन वर्षापासून एकत्र राहात आहोत. आता तमाशा बंद कर. रहायचे असेल तर राहा माझ्यासोबत अन्यथा निघून जा तुझ्या घरी.
या अनपेक्षित आघाताने वैशाली कोसळली .कशीबशी सावरून घरी आली. सामान आवरून माहेरी निघून गेली .तिला एकटीला सामानासह पाहून मम्मीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पप्पा घरी नव्हते. मम्मीने लगेच विचारले,
अगं वैशाली तू एकटीच कशी आली? आणि तेही अचानक, फोन नाही केला .आणि जावई बापू कुठे आहे?
मम्मी, तू जरा उसंत घे. मी आताच आली आणि तू लागली चौकशा करायला. मी येते फ्रेश होऊन असे म्हणून वैशाली बाथरूममध्ये गेली. दरवाजा बंद करून ती खूप रडली. मम्मीला कळू नये म्हणून चेहर्यावर पाणी मारुन बाहेर आली.दोघींनी सोबत चहा घेतला. जरा आराम करते म्हणून तिच्या खोलीत गेली. मम्मीने सागरला फोन लावला तो स्विच ऑफ येत होता. वैशालीच्या पप्पांना फोन केला तर ते एका बिजनेस मीटिंगमध्ये असल्याचे सांगितले.
मम्मी काळजीमध्ये वैशाली च्या खोलीपर्यंत जाऊन आली पण ती आराम करते म्हणून जरा सावकाश बोलू असे ठरवून आपल्या कामाला लागली.
सायंकाळी पप्पा आले वैशालीला बघून,
अरे वा म्हणजे आम्हाला सरप्राईज द्यायचे होते तर... म्हणत वैशाली ला जवळ घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले
कशी आहेस बाळा… हे ऐकून वैशालीने हंबरडा फोडला ती रडत रडत घडलेली सर्व घटना सांगून गेली . तिच्या मम्मी पप्पांच्या पायाखालची जमीन सरकली.
एवढा मोठा धोका ….माझ्या मुलीची फसवणूक…
रागाने लालबुंद झाले पप्पा. त्यांनी पोलिसांना फोन लावला .वैशालीने लगेच फोन हाती घेऊन कट केला,
ही माझी समस्या आहे अन् ती मीच सोडविल. तुमचा तुमच्या मुलीवर विश्वास आहे ना .बस्स ! मी इतर मुलींसारखी रडत, कुढत बसणार नाही .मी माझ्या अन्यायाचा , अपमानाचा बदला घेईल. त्याला त्याची चूक कबूल करून माफी मागावी लागेल.
मुलीच्या या खंबीरपणाने आणि आत्मविश्वासाने मम्मी-पप्पांना धीर आला. वैशाली आपल्या मम्मी पप्पांना दुःखी असलेले पाहू शकत नव्हती.
वैशालीने शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. मम्मी-पप्पांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले. ती बाहेर जरी शांतपणाचा देखावा करीत असली तरी तिच्या मनात वादळ घोंगावत होते. सतत साक्षी आणि सागर चा तो प्रसंग नजरेसमोर येत होता. त्यांचे वाक्य कानात घुमत होते .अशा वेळी तिच्या मनात एकच विचार येत होता तो म्हणजे माझ्या अपमानाचा प्रतीशोध…..
ती ज्या शहरात उच्चशिक्षणासाठी गेली होती तिथेच सुरजचा शो होणार होता. त्याचे पोस्टर्स चौकाचौकात लागले होते .त्या पोस्टर वरूनच वैशालीला त्याच्या शो बद्दल समजले होते . ती हा शो बघायला गेली. सुरज खूप छान गात होता. त्याचे सूर अंतःकरणाचा ठाव घेत होते .एवढी जबरदस्त जादू होती त्याच्या आवाजात की प्रेक्षक वर्ग त्याचे गाणे ऐकताना मंत्रमुग्ध झाला होता. कार्यक्रम संपल्यानंतर मुद्दाम वैशाली सूरजला भेटण्यासाठी थांबली होती. सुरज ची भेट झाली .त्याला तर स्वप्नच वाटले . तिनेच बोलायला सुरुवात केली.
तुझ्या शो ला तू मला बोलावणार असे ठरले होते ना!
सूरज म्हणाला, तुझा काही पत्ताच नव्हता एवढे वर्ष .आणि दोघेही खळखळून हसले.
कॉफी शॉप मध्ये जाऊन निवांत बसून बोलू या का?
सुरज ने विचारले .
..
क्रमशः
https://marathi.shabdaparna.
कथा आवडल्यास नक्की कळवा.
तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रोत्साहन आहे.
निर्मला मेंढे
पुढें काय ? उत्सुकता
👌👌