माझ्या निष्पाप,साध्याभोळ्या मुलीला फसवताय तुम्ही. चला शाश्वत, संपदा अशा लोकांना पोलिसातच द्यायला हवे.
असे म्हणत रागातच मनोहरराव बाहेर पडले.त्यांच्या मागोमाग शाश्वत आणि संपदाही बाहेर आले.
शाश्वतने मनोहररावांना शांत करुन गाडीत बसवले.
घरी वसुधाताई अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत वाटच बघत होत्या,सुखदा शांतपणे बसून होती.तिघेही घरी आले. शाश्वतने मनोहररावांच्या हाताला आधार देत त्यांना घरात आणले.सोफ्यावर बसवले.
वसुधाताईंनी घाईघाईने पाणी आणले.
नजरेनेच संपदाला काय झाले विचारले.सुखदा फक्त सगळीकडे टकमक बघत होती.
न राहवून वसुधाताईंनीच शक्य तेवढ्य सौम्यपणे विचारले,
काय झाले? काय म्हणाले चित्रकार मानस?
अग तो काय म्हणणार? आपल्या सुखाची फसवणूक केली त्याने.कानावर हात ठेवून अनभिज्ञतेचा आव आणतोय.
मनोहरराव चिडून उत्तरले.
ऐकून वसुधाताईच्या काळजाचा ठोका चुकला.
मग? आता? आता काय करायचे?
काय करायचे म्हणजे ? त्याचा विचार डोक्यातून काढून टाकायचा.माझ्या सुखाशी लग्न करायला कोणीही तयार होईल.तेच योग्य राहील.आपल्या भोळ्या सुखाला फसवले त्याने.
मनोहररावांनी हे वाक्य बोलताच सुखदा रागाने उठून तिच्या खोलीत गेली.
सुखदा दिवसभर तिच्याच खोलीत होती.संपदा मध्ये मध्ये जाऊन बघत होती.संध्याकाळ झाली.
शाश्वत संपदाला तू थांब दोनेक दिवस आईबाबांबरोबर. असे सांगून परत गेला.
संध्याकाळी संपदाने सुखदाला बाहेर बोलवले.
सगळ्यांनी सुखदाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
वसुधाताई म्हणाल्या,
सुखा या वयात होतात अशा चुका. बरे झाले मानस कसा आहे हे आपल्याला लवकरच समजले.देवानेच वाचवले आपल्याला. आता त्याचा विचार काढ बघू मनातून.
सुखदा ओरडली,
आई तुला कळतयं का तू काय बोलते आहेस ते?
हे तिघे मानसकडे जातील ,घरी येऊन त्यांच्याबद्दल काहीही सांगतील आणि मी त्यावर विश्वास ठेवावा.एवढी मुर्ख नाहीय मी.
आई अग,तू तर आई आहेस माझी. तू तरी समजून घेशील असे वाटले मला.तू पण यांच्यावरच विश्वास ठेवत आहेस.
म्हणजे आम्ही खोटे बोलतोय असे वाटते का सुखा तुला?
संपदाने विचारले
हो.तुम्ही सगळे खोटे बोलताय.ताई तू तरी…..
सुखदा रडत रडत खोलीत गेली.
संपदाने आईबाबांची समजूत काढली.
ठीक होईल हळूहळू.विसरेल ती मानसला.
मनोहरराव संतापले होते,
मानसला चांगलाच धडा शिकवायला हवा. चित्रकाराच्या बुरख्याआडून मुलींना फसवतो.
बाबा शांत व्हा. सुखा सध्या समजून घेण्याच्या मनःस्थितीत नाही. तिच्यासाठीही धक्कादायकच आहे हे.मी समजवते तिला.
संपदा जेवणाचे ताट घेऊन सुखदाच्या खोलीत गेली.
सुखदा बसून होती. गालातल्या गालात हसत होती.
तिच्या हातात मानसचा फोटो होता.
संपदाने आवाज दिला,
सुखा
सुखदाने फोटो पर्समध्ये ठेवला.
क्रमशः
सुखदा का अशी वागतेयं….वाचत रहा पुढील भाग खालील लिंकवर
प्रिती गजभिये
आभास.. खरंच सर्व भाग खूप छान लिहिलेत. पुढे काय .. उत्सुकता वाढत आहे..
छान