दुपारी चारची वेळ. भंडारीच्या घरातला फोन खणखणला. घरातली कामे आटपून दोन्ही सुना आपापल्या खोलीत आराम करत होत्या. पुरुष मंडळी कामानिमित्त घराबाहेर गेलेली.
हळूहळू पावले टाकत वय वर्षे ७० असलेल्या श्रवणच्या आजोबांनी फोन उचलला आणि घाबरून पटकन ठेवून दिला .
कोणी तरी थट्टा केली असेल… खरी की खोटी ?
थोडावेळ फोनच्या आसपासच घुटमळले. बेचैन झाले. कोणाला सांगावे ? सुनांना आवाज द्यावा का?
या विचारात असतानाच पुन्हा फोनचा आवाजाने भानावर आले.
यावेळेस त्यांनी फोन उचललाच नाही. खूप वेळ फोनची घंटा वाजण्याच्या आवाजाने रामेश्वर भंडारी च्या सुना बाहेरच्या खोलीत आल्या. फोन वाजून बंद झाला होता. पुन्हा एकदा फोन खणखणला यावेळेस मोठ्या सुनेने घेतला.
..….. हॅलो……
दोन तासापूर्वी लहान सुनेचा कविताचा तीन वर्षाचा मुलगा श्रवण शेजारच्या घरी खेळायला जातो म्हणून हट्टीपणा करत होता. आदल्याच दिवशी त्यांच्या शेजारी असणाऱ्या मुलीचा वाढदिवस होता. ३० डिसेंबर चा तो दिवस .
लहान मोठी मुले जमून मुलांची पार्टी झाली. मौज मज्जा मस्ती आणि धिंगाणा.
दुसऱ्या दिवशीही ३१ डिसेंबरला त्यांनी शेजारी जाण्याचा बाल हट्ट केला. तसे या दोन्ही घराच्या बाजूच्या खिडक्या समोरासमोर होत्या पण घरी जाताना रस्त्यावर येऊन थोडा वळसा घेऊन जावे लागे. त्याला एकट्याला बाहेर पाठवायची कविता ची तयारी नव्हती पण त्याच्या गोंधळापुढे ती नमली.
शेजारी खूप वर्षाचे सलोख्याचे संबंध असल्याने ती तयार झाली . दुकानात काम करणाऱ्या एका मुलासोबत कोपर्यापर्यंत सोडायला तिने सांगितले.
त्याला दोन तास उलटले. मुलगा आपल्याला सोडून थोडं दुसरीकडे रमतोय एका दृष्टीने तिला बरे वाटले. आणि ती आराम करायला गेली.
फोनच्या आवाजाने बाहेर आली.
तो खंडणी वाल्याचा फोन होता.
हॅलो……तुमचा मुलगा श्रवण आमच्या ताब्यात आहे. तो जर तुम्हाला सुखरूप हवा असेल तर मी सांगतो तेवढी रक्कम तयार ठेवा . अती हुशारी दाखवाल तर मुलगा गमावून बसाल.
कडक आवाजात उघड उघड धमकावले. खंडणीसाठी केलेला फोन होता.
कविता धावत शेजार्यांकडे गेली पण श्रवण शेजार्यांकडे आलेलाच नव्हता . घरात एकच गोंधळ उडाला .
कविताने तर रडायलाच सुरुवात केली.
सहाजिकच ना !
तीन वर्षाचा श्रवण तिला सोडून कुठेही जात नव्हता म्हणुन शेजारी पाठवण्यासाठी सुद्धा ती तयार नव्हती. आजोबा तर थरथर कापायला लागले.
मोठ्या सुनेने दोघांनाही सावरले आणि आधी नवरा आणि दिराला फोन करून बोलावून घेतले
थोड्याच अवधीत ही बातमी त्यांच्या कॉलनीत पसरली. शेजारचे मित्र-मैत्रिणी भंडारी कडे धावून आले.
भराभर मित्रांनी फोन करून श्रवण कोणत्या गावातल्या नातलगाकडे तर गेला नाही ना याची चौकशी केली.
दुकानातल्या मुलाला घरी बोलावून चांगलाच दम दिला.
*मी श्रवणला शेजारी गेट पर्यंत सोडून आलो होतो* तो गयावया करून सांगत होता.
श्रवणचे बाबा तर वेड्यासारखे गल्लोगल्ली शोध घेत फिरू लागले.
मैत्रिणी कविताला धीर देत होत्या . इतकं सगळं घडेपर्यंत संध्याकाळ झाली अंधार पडला . तशी कविता आणखीनच घाबरली .नशीबाने श्रवणला आपलं नाव पत्ता सांगता येत होते.
आता विचार सुरू झाला
पोलिसांना कळवावे की नाही?
कळवले तर श्रवणच्या जीवाला धोका.
भंडारीचा एक मित्र पोलीस इन्स्पेक्टर होता .
त्याला सांगायचे ठरवले .
इन्स्पेक्टर मकरंद तातडीने भंडारी कडे दोन कॉन्स्टेबल सह हजर झाले. आल्या आल्या त्यांनी आधी घरातली गर्दी हटवली. भंडारी कुटुंबांना त्यांनी हिंमत दिली .
‘मी आहे ना, श्रवण च्या केसालाही धक्का लागू देणार नाही’ ,
तेव्हा कविता थोडी शांत झाली.
मकरंद यांनी पोलिसांची तीन पथक तयार केले एक पथक सीसीटीव्ही फुटेज ची पडताळणी करत होते . दुसरे पालकांची चौकशी करून कुणाशी वैर आहे का? ते तपासत होते .तर तिसरे पथक गुन्हेगारांची माहिती काढत होते.
त्या मार्गात असणाऱ्या दुकानांच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही तपासण्यात आले तर श्रवणचा हात पकडून दोन मुले जाताना दिसले . पाठमोरी असल्याने चेहरे नीट दिसले नाही. पण श्रवणने शांतपणे त्यांचा हात धरला होता यावरून ती मुले माहितीतली असावी असा अंदाज मकरंदानी बांधला.
शेजारीपाजारी किंवा व्यवसायामध्ये कुणाशी भांडण किंवा वैर जेणेकरून बदला घेण्याच्या उद्देशाने श्रवणचे अपहरण केले गेल्याची शक्यता मकरंद त्याच्या दृष्टीने नाकारता येत नाही .
तिसऱ्या पथकाने गावात मुले पळवणारी टोळी तर सक्रिय नाही ना ?
याचा तपास लावला.
पोलीस स्टेशन मध्ये अजून कोणाची मिसिंग कंप्लेंट आली का ? याची खातरजमा केली .
बस स्टँड, रेल्वे स्टेशन मध्ये जाऊन काही संशयित व्यक्ती आढळतात का ते सुद्धा पाहिले?
कुठेही तपास लागत नव्हता. 31 डिसेंबर असल्याने रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर वर्दळ गोंगाट होता. रात्री एक पर्यंत लोकांच्या पार्ट्या, फटाके उडवणे , रोषणाई होती.
अशा गोंधळात अपहरणकर्त्यांनी श्रवणला दुसरीकडे कुठे हलवले तर शोध घ्यायला अवघड जाईल, अशी काळजी पोलिसांना वाटत होती. त्यात भंडारीचे अन् त्यांचे सलोख्याचे संबंध होते, ते दडपण काही वेगळेच.
भंडारी हे बऱ्यापैकी सधन कुटुंब होतं. रामेश्वर भंडारी एका कॉटन मिलच्या मॅनेजर पदावरून निवृत्त झाले होते.
घरात सुबत्ता नांदत होती
पण अपहरणकर्त्यांनी खंडणी म्हणून मागितलेली रक्कम अगदीच मामुली होती. यावरून अपहरण पैशासाठी झालेले नव्हते . मकरंद यांचा तर्क .
कोणी तरी बदला घेण्याच्या हेतूने हे दुष्कृत्य केलंय.
” काय पैसे लागले ते लागू द्या, पण श्रवण सुखरूप घरी येऊ दे ”
भंडारी कुटुंब देवाकडे मागणं मागत होते.
उशिरा रात्री शेजारील गावच्या शेतकऱ्याचा पोलिस स्टेशनला फोन आला.
रात्री शेतात गुऱ्हाळ होतं . बाजूच्या शेतात एका झोपडीत मुलाच्या ओरडण्याचा आवाज येत होता . आम्ही लपून पाहिलं तर तीन चार वर्षाचा एक मुलगा अंगावर बऱ्यापैकी व्यवस्थित कपडे, चांगले स्वेटर घातलेले .मारवाडी भाषेत आईकडे न्या म्हणून रडत होता. त्याच्या सोबत असणाऱ्या दोन्ही माणसांचा कडे बघून तो त्यांचा मुलगा नाही, हे लक्षात येत होतं.
इनस्पेक्टर मकरंद तातडीने तिथे पोहचले.
दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता मकरंद श्रवण ला घेऊन आले. ते दोन दिवस भंडारी कुटुंबाने कसे काढले त्यांचे त्यांना माहिती.
भंडारे यांच्या आनंदाला पारावर नव्हता.
गुन्हेगार मिळाला.पण गुन्हेगार कोण असेल याबद्दल
सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
दोन्ही गुन्हेगार रामेश्वर भंडारी च्या ओळखीचे निघाले.
विकास गावंडे, सुनील मानकर .
रामेश्र्वर भंडारी ज्या मिल मधे होते त्याच मिलमधले कामगार.वर्कर मिलमध्ये एका अपहार प्रकरणी त्यांनी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा त्यांना झाली होती.
तुरुंगाची हवा खाल्ल्यामुळे नंतर त्यांना कोणी नौकरी दिली नाही.हे सगळे भंडारीमुळेच झाले या भावना आणि गरिबी यातून त्यांनी हा कट शिजवला.
आणि लहानग्या श्रवणचे अपहरण केले.
रामेश्र्वर भंडारी ज्या मिल मधे होते त्याच मिलमधले कामगार.
कविताने मकरंद यांच्या पायावर डोके टेकले.
इनस्पेक्टर मकरंद म्हणाले,
उपकार मानायचेच तर शेतकऱ्याचे माना..त्याने फोन नसता केला तर त्यांनी श्रवणला…….
मोहिनी राजे पाटनुरकर