अभंग- विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले
आज निरुपणासाठी घेतलेला अभंग हा माऊलींच्या समाधीक्षणाच्या जवळ नेणारा आहे. अज्ञानी मनाला ज्ञानिया करणारा आहे. सदर अभंगातील वैराग्य हे विश्वापासून दूर जाणारे नाही तर विश्वात राहून येथील सुख-दुःखे वेचणारे, देहापासून दूर राहून देखील विश्वाचा दैहिक भाव जपणारे मन आहे. ते मन अतीव कोमल असले तरी तितकेच दृढनिश्चयी आहे. अवघ्या जगतासाठी दाटून आलेला कारुण्य भाव हा माऊलींच्या ध्यान अवस्थेचा आशय आहे, सारसर्वस्व आहे. माऊलींनी विश्वात्मक देवाकडे स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. जे काही मागितले ते केवळ चराचरासाठी! दूरितांसाठी!!
पैलतिरी असलेल्या अनादी तत्वाच्या ओढीकडे लागलेले ज्ञानीयांचे मन अजिबात गुंतागुंतीचे नाही. तर त्यात केवळ अपार कैवल्य जाणवते. माउलींनी अभंगात योजलेल्या प्रतिमा ह्या अतिसूक्ष्म भावभावना रेखाटणार्या तर असतातच. परंतु विशाल, विराट आणि अद्भुत तसेच आपल्याला सहजासहजी न कळणारे मनोगत देखील एखाद्या प्रतिमेतून व्यक्त करतात. ज्ञानेश्वरांच्या अभंगांचा अर्थ लावणे हे जितके सहज सोपे तितकेच कठीण देखील. कारण प्रत्येक वेळी वाचताना त्यातून नवनवीन अर्थ उलगडत जातो. आणि हेच अभिजात साहित्याचे व्यवच्छेदक लक्षणदेखील असते. आजचा अभंग हा निरोप देण्यासाठी काहीसा कठीण आणि तितकाच मन व्याकूळ करणारा, सोबतच ‘धवळले जगदाकार’ दाखवणारा आहे. त्यामुळे त्याचे निरूपण करताना अतिशय आनंद देखील झाला आणि माझेदेखील मन कणवतेने भरुन आले.
विश्वाचे आर्त
आई इंद्रायणीच्या काठावर भल्या पहाटे बसलो होतो. आसपास कोणीही नव्हते. केवळ आईसोबत संवाद साधत होतो. तिला मनातील गुज सांगत होतो. तिने देखील गावोगावीचे, खेड्यापाड्यातील तिच्यासोबत वहावत आणलेले मनोभाव माझ्यापुढे मांडले. तिच्या प्रवाहासोबत माझा हा मुक्त संवाद नेहमीच व्हायचा. कधी ती भरभरून बोलायची तर मी ऐकायचो आणि मी बोलायला लागल्यावर माझ्याकडे कौतुकाने पाहत ती ऐकायची.
मायलेकरांचे हे शब्दांविना बोलणे केवळ दोघांपुरतेच होते. ती केवळ दोघांच्या भावनांची मिरासी होती, जहागिरी होती. तिथे इतर कोणासही जागा नव्हती. मी त्या बाबतीत थोडासा एकलकोंडा आहे. एकांतात रमणारा आहे. मला निरामय संवाद साधायला आवडतो. कारण ते बोलणे नकळत काळजात खोलवर उतरत जाते. ते बोलणे अगदी सच्चे असते, प्रामाणिक असते, कोणतेही हातचे न ठेवता व्यक्त झालेले असते.
आज देखील बोलता-बोलता असाच स्वतः हरवत गेलो. अंतर्मनाची यात्रा नकळत करायला लागलो. आपोआपच डोळे मिटले गेले. आजूबाजूचा नीरव शांततेचा आवाज मनाच्या गाभाऱ्यात निनादायला लागला. तो निनाद अनाहत नाद होता. वैराग्याची वल्कले बाजूला सारत मन गावकुसाबाहेर पोहोचले. वाड्या वस्तीत गेले. तेथील दुःखाच्या, अभावाच्या आर्त स्वराला मी ओंजळीत घेतले. तिथून लगेच शेतशिवारात गेलो. तिथे पाखरे माझी वाटच पाहत होते.
त्यांच्या चोचीसाठी शब्द आणि पोटासाठी दाणे देऊन आलो. कणसांत भरलेल्या पिकांवर हात फेरून आलो. वाऱ्याला काय सांगावे? त्याला लगेच दिशा कळते. कुठे वाहायचे ते समजते. ती समज त्याला निसर्गत:च आलेली! पण तो देखील जिवाभावाचा आहे म्हणून त्याच्याशी देखील हितगुज घातले. येताना पायवाटेवर फुलपाखरे भेटली.
मी भेटताच अंगाखांद्यावर खेळायला लागली. ‘ कुठेही जाऊ नकोस!’ म्हणायला लागली. त्यांना कसे सांगावे की, माझ्या पायात भोवरा पडलेला. मग घडीभर त्याना जोजवत आणि परतून येण्याचे आश्वासक बोल देत माळावर आलो. माळ तर मला नेहमीच स्थितप्रज्ञासारखा आणि आधार देणारा महापुरुष तसेच डोळ्यांपुढे आदर्श ठेवावा असादेखील वाटला आहे.
माळावर माझा एक आवडता खडक आहे. त्या खडकावर अगदी निवांतपणे बसलो. मी अवघ्या जगाचे दुःख पाहून आलो होतो. त्या दुःखांना मनात घेऊन आलो होतो. प्रत्येकाच्या मनातील सल, उणीव, अभाव माझ्या डोळ्यातून बाहेर यायला लागले. पांझरा मला लागले.
मी तसाच त्या खडकावर लवंडलो. उंच उंच आकाशाकडे पाहायला लागलो. कुठे राहतो तो? त्या निळ्या आभाळात? की त्याही पलीकडे? माहित नाही. परंतु तो आहे हा दृढ विश्वास मनात आहे म्हणूनच मी लगोलग विश्वाचे आर्त माझ्या नजरेतून त्याच्यापर्यंत पोहोचवला लागलो.
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले
अवघेची झाले देह ब्रह्म
मी केवळ कारुण्याचा स्वरच विश्वात्मक देवाला ऐकवला असे नाही तर मनात फुललेल्या शब्दांचा सोहळा देखील त्याला दाखवला. माझ्याच अभंगांचे निरूपण त्याला करून दाखवले. पळसफुलांचा भगव्या वैराग्याखाली दडलेल्या काही कविता त्याला वाचून दाखवल्या. आणि खरेतर कविता हेच माझे आवडीचे वालभ होते. जिव्हाळ्याचे जग होते.
परंतु ती कविता मला स्वतःपुरती ठेवायचे नव्हती. तिच्या माध्यमातून साकार आणि निराकार दोन्ही जगताचा मागोवा घेतला. अक्षरांच्या ओळींतून मी मला आणि आजूबाजूच्या जगण्याला शब्दातून मांडले. स्वतःपासून सुरू केलेली ही यात्रा कधी दिंडी बनली कळलेच नाही. अवघ्या गावाचे मनोभाव टाळ, मृदंग घेऊन माझ्या दिंडीत सामील झाले. आणि दिंडीचा टिपेचा स्वर हा विश्वात्मक देवा तुझ्यापर्यंत पोहोचवत आहे.
आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले
नवल देखिले नभाकार गे माये
ती बघ घरट्यातून निघालेली पाखरा उडायला लागली आहेत. त्यांच्या कोमल पंखांची फडफड तुला ऐकू येत आहे ना. तो फडफडाट पोटभर दाणे टिपण्यासाठी करावयाच्या प्रवासाचा आवाज आहे. परंतु त्यांच्या कंठात तुझेच गीत आहे तुझेच स्मरण आहे. ते ऐक तू.
अतिशय गोडवा असतो बघ त्यात. आणि हो, आमच्या हाताना आभाळाला स्पर्श करण्याची ताकद दे. तुझे दिगंत खूप अद्भुत असते म्हणे! त्यात विहार करायचा आहे. त्या पलीकडे असणाऱ्या चांदण्यांच्या अंगणात फिरायचे आहे. तुझ्या त्या चांदणलेल्या जगाला देखील आमच्या शिवाराचा रानमेवा द्यायचा आहे.
बापरखुमादेविवरु सहज निटू झाला
ह्रदयी न दाविला ब्रह्माकारे.
असं हे पसायदान मागत मागत खडकावरुन उठलो. माळावरील पायवाट उतरायला लागलो. आई इंद्रायणी तिकडे वाट पाहत होती. तो अंतर्मनातील प्रवास पुन्हा आईच्या कुशीत घेऊन आला. मन स्थिर झाले होते. आता मी मुक्त व्हायला लागलो. पैलतीराची असं खुणावयाला लागली. पण माझ्या अनादी यात्रेची तयारी आईपासून लपवायची होती. फार हळव्या मनाची आहे ती! चला, मी तयारीला लागतो. तिच्यासाठी आणि तिच्यावर आधारित काही कविता लिहून ठेवतो.
https://marathi.shabdaparna.in/अभंग-आजि-सोनियाचा-दिनु
संतोष जगताप.
https://marathi.shabdaparna.in/अद्भुत