आर्किड फ्लाॅवर…!
आर्किड फ्लाॅवर…!

आर्किड फ्लाॅवर…!

मैत्रीणीबरोबर वर्गाबाहेर जातांना अंश रोजच रूही दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे बघायचा.
पण आज अंशच्या बाजूने जातांना बाकाच्या अर्धवट बाहेर आलेल्या खिळ्यामधे रूहीची ओढणी अडकली होती… जाता-जाता मागे काही खेचल्यासारखे जाणवले म्हणून रूही थांबली.
अंश ने मुद्दामहून तर नाही ओढली न ओढणी…असे उगाचच मनात आले. भीत-भीत मागे वळून पाहिले तर बाकाच्या खिळ्यामधे ओढणी अडकलेली होती.
रूही दोन पावले मागे आली आणि बाकाच्या खिळ्यामधे अडकलेली ओढणी मोकळी करून निघाली.
अंश…रूहीच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने बघू लागला. ती तेथुन निघाली पण अंश अजूनही तिच्याकडे बघतच होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी…
(रूमची खिडकी उघडत-उघडत रमा)
…यार रूही ऊठ ना सकाळ झाली, सूर्य डोक्यावर आलाय किती वेळ झोपणार अजून?…
हो ग…
काॅलेज कॅन्टीनमध्ये वाढदिवस साजरा करायचाय आज रूहीचा.
योगायोगाने काॅलेजचा शेवटचा दिवस आणि रूही तुझा वाढदिवस एकाच दिवशी आले.
हा उठले बघ… रमा…
जोपर्यंत तुला मी उठवत नाही ना तुला जागच येत नाही आळशी रूही…
चल उठ लवकर उठ रूही…
आजचा दिवस खूप बिझी असणार आहे.
आळशी नाही ग रमा मी स्वप्नात… माझ्या स्वप्नातल्या राजकुमार सोबत होते…तितक्यात तू उठवले.
रूही तू तुझ्या स्वप्नातील राजकुमार बद्दलच विचार करत असणार.. कधी मिळणार तुला स्वप्नातला राजकुमार ?
माहिती नाही यार…रमा
अरे हा..
तुझ्या आवडत्या ऑर्किड फुलांची पुष्पगुच्छ आणायचे आहे न रूही ?.
हो न रमा मीच म्हटले माझ्या रस्त्यात आहे मी घेवून येते.
चल आपण तयार होवून निघू या.

फुलदाणीच्या दुकानमध्ये पोहोचल्यावर…
मला ऑर्किड फुलांनी सजवलेले पुष्पगुच्छ द्या.. रूही आणि अंश एकाच वेळेला दुकानदाराला… सांगता-सांगता दोघांची नजरा-नजर झाली आणि दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले.
आर्किड फुलांनी सजवलेल्या पुष्पगुच्छ कडे बघून आज चार_पाचच पुष्पगुच्छ शिल्लक आहेत रूही मनातच पुटपुटली.
काका मला ऑर्किड फुलांनी सजवलेले सर्व पुष्पगुच्छ पॅक करून द्या रूही बोलली.
सतरा-अठरा वर्षाची रूही.. दिसायला सुंदर, गोरीपान, लोभस, निरागस, उंचीपुरी… काळेभोर लांबसडक मोकळे सोडलेले केस तिच्या अंगकाठीला शोभून दिसत होते.
समोर आलेली एक केसाची बट मागे करत, मला ते सर्व पुष्पगुच्छ हवे आहेत. तुम्ही दुसरा घ्या रूही अंशला म्हणाली.
अंशनी एक पुष्पगुच्छ उचलला…हा एक पुष्पगुच्छ मला घेऊ दे.
आजचा दिवस माझ्यासाठी खुप खास आहे. वाढदिवस आहे माझा आज कृपा करून मला घेऊ द्या सर्व पुष्पगुच्छ रूही बोलली.
ठीक आहे… म्हणतं अंशने हातातला पुष्पगुच्छ रूही समोर धरला.
रूहीने अंशच्या हातातून पुष्पगुच्छ घेतांना अनावधानाने हाताला झालेला अलगद स्पर्श अंश आणि रूहीला जाणवला.
बाय द वे…
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला”,
म्हणतं रूहीच्या समोर एक हात पुढे करून उभा असलेल्या अंशला न्याहाळत त्याच्या हातात हात मिळवत रूही आभारी आहे म्हणाली.
“माझे नाव अंश”..
“माझे नाव रूही”…
एकमेकांनी औपचारिक परिचय दिला.
पण दोघेही हात धरून एकमेकांकडे बघतच राहिले.

रूही मनातच स्वतःशी बोलली…या आधी कधी बोलले नव्हते पण का कुणास ठाऊक ह्याच्यासोबत बोलतांना परकेपणा जाणवत नाही.

आण बेटा मी पॅक करून देतो सर्व पुष्पगुच्छ काका बोलले…दोघेही दचकून कावरेबावरे झालेत आणि झटकन हात बाजूला केला.
पण हाताला झालेला स्पर्श विसर पडणारा नव्हता. दोघांच्याही मनाचा ताबा सुटला होता. प्रेमाच्या भावना एकमेकांशी जुळू लागल्या होत्या.
काकांनी पुष्पगुच्छ पॅक करेपर्यंत दोघेही नजर चोरून एकमेकांकडे बघत होते.
घे बेटा सर्व पॅक झाले.
काकांनी पार्सल दिलेले…रूही पार्सल घेऊन निघाली…
पण रूही दिसेनाशी होईपर्यंत अंश रूहीकडे बघतच राहिला. रूहीचा झालेला तो पहिला स्पर्श,

“क्षणिक झालेला पहिला स्पर्श स्पर्शून गेला आणि अलगद मनामधे पहिल्या स्पर्शाची जाण दरवळून गेला”.

“कदाचित रूही माझं पहिलं प्रेम… “.

अंश तिथुन घरी गेला खरा पण अंश चे कशातही लक्ष लागत नव्हते.
राहून-राहून पुन्हा-पुन्हा रूहीचाच विचार मनात येत होता.
इकडे…
काॅलेज कॅन्टीन मधे सर्व मैत्रिणी रूहीची वाट बघत होत्या… कारण सर्वांच आधीच ठरलेलं की, रूहीचा वाढदिवस कॅन्टीनमध्ये साजरा करायचाय…केकही तयार होता.
तितक्यात ठरल्याप्रमाणे रूही कॅन्टीनमध्ये आली. रूही मैत्रिणीमधे येऊन बसल्यावर एकीने रूहीसमोर केक ठेवला…एकसुरात सर्व मैत्रिणींनी “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय रूही” म्हंटले.
रूहीकडून केक कापण्याची अनौपचारिक क्रिया पार पडली..
सर्व मैत्रिणींनी केक फासला…फस्त केला…आणि रूहीच्या आवडते ऑर्किड फुलांची पुष्पगुच्छ रूहीला भेट दिली.
पण रूही स्वतःच्याच तंद्रीत होती. मैत्रिणींनी मोबाईल वर गाणं सुरू केले…

“प्यार मे होता है क्या जादू
तू जाने ना मै जानू…”

रूही अजूनच अस्वस्थ झाली…
तिच्या डोक्यात फक्त अंशचाच विचार सूरू होता.
अग रूही आम्ही किती मज्जा करतोय…तु अशी विचारमग्न होऊन काय बसलीस..ए न यार किती मज्जा येतेय…
काही नाही ग..असेच यार.
काय ग….
रूहीला स्वप्नातला राजकुमार मिळाला वाटतो…
रूहीच्या चेहरऱ्यावर लाल छटा उमटली…

अंश तु पुस्तक उलटे धरून वाचतोय…
ओह…(अंश)
अंश काय रे प्रेम बिम झाले की काय? गेली काही दिवसात तु विचलित दिसतोय अंश…
नाही रे समेह.
अंश चल तुला आज नविन आईस्क्रीम पार्लर मध्ये घेऊन जातो…मागच्याच आठवड्यात उद्घाटन झाले आहे,
ऑर्किड आईसक्रीम पार्लर नाव आहे.
तुझी मनःस्थिती पण ठीक होईल… समेह बोलला.
अरे समेह तू गेला होतास का तिथे?.
नाही रे अंश.
अंश तिथे आइस्क्रीमचे रोल मिळतात.
काहीच काय समेह…
आइस्क्रीम रोल!…मिळतात?.
होय अंश आईसक्रीम रोल मिळतात.
आईस्क्रीम चे रोल…समेह हे काय नविनच!…

अंश आणि समेह दोघेही संध्याकाळी आईस्क्रीम पार्लर मध्ये गेलेत.
आत मध्ये प्रवेश केल्यावर वेटरने स्वागत सर म्हणून स्वागत केले. दोघेही ठराविक टेबलवर बसलेत.
आजूबाजूला सुमधुर संगित सुरु होते.
वेटरने पाणी टेबलवर आणूण ठेवले. आणि मेनू कार्ड समोर ठेवलं.
अंश आज तुझ्या आवडीचं आईस्क्रीम खाऊ या.
होय…चालेल समेह… मी निवडतो…
असे म्हणून अंशने मेनू कार्ड ऑर्डर देण्यासाठी हातात घेतला.
आपल्या खिशाचा अंदाज बघून अंशने आईस क्रीम रोल विथ थ्री कलर्स ची ऑर्डर दिली.
वेटर ऑर्डर घेऊन आत गेला.

दोघेही आईसक्रीम येईपर्यंत इकडे-तिकडे बघु लागले.
बाजूच्या भिंतीवर ओशो चे काही सुविचार लिहिलेले होते.

“तुम भूलकर भी किसी और जैसा होने की कोशिश मत करना”.

अंशची सहज समोर नजर गेली पाहून अचानक दचकला.

समोर लिहिलेले होते की,

“क्षणिक झालेला पहिला स्पर्श स्पर्शून गेला आणि अलगद मनामधे पहिल्या स्पर्शाची जाण दरवळून गेला”.

अंश गडबडला.
अचानक अंशचे चेहर्‍यावरचे भाव बदलले…
अंश समेह पासून स्वतःची चलबिचलता लपवू शकला नव्हता.
अंश अचानक काय झाले तुला?.
तू असा चलबिचल का झालास?. काही नाही रे समेह…असेच…
म्हणून त्याने वर पाहिले तर सिलिंग ला एक आर्किड झुमर…लावलेले होते.
अंश थोडा जास्तच अस्वस्थ झाला. इकडे-तिकडे नजर फिरवली असता अंशच्या लक्षात आले की, पार्लरच्या चारही कोपऱ्यात एकसारखे ऑर्किड फुलांची पुष्पगुच्छ सजवलेले आहे.
अंशला अस्वस्थ झालेले पाहून समेह हैराण झाला…अरे असं काय झाले?. तू एवढा अस्वस्थ का झाला आहेस?. अंश ईथे किती सुंदर वातावरण आहे…
“सुमधूर संगिताचे सूर कानावर पडताहेत… चारही बाजूने ऑर्किड फुलांची फुलदाणी सजविलेली आहे. अंश बघ ना सीलिंग ला पण आर्किड झूमर लावलेली आहे”.

…काय मनमोहक अंतर्गत सजावट केली आहे.
ऑर्किड फुलांचा प्रेमी दिसतो आहे हा…
हा नाही ही…अंश बोलला.
कायss ही…!
अंश तू ओळखतो का?.
अंश दचकला…नाही रे समेह.
अंश तुला बरं वाटत नाही आहे का?. काही नाही समेह..अरे असेच.
तेवढ्यात आईसक्रीम आले…
वेटर ने ऑर्डर चे पात्र टेबलवर ठेवले.
ज्या पात्रा मध्ये आईस्क्रीम रोल सजवला होता, त्या पात्रा वर देखील ऑर्किड फुलांची चित्र होती.
समेहनी आईस्क्रीम खाण्यास सुरुवात केली.
पण ….
अंश बोलू लागला…
समेह ऑर्किड फुल रूहीच्या आवडते फुल…
अंशने समेह ला रूहीची पहीली भेट कशी झाली ते सांगू लागला…

“भेटली का रे पुन्हा रूही?”. समेह ने विचारले.
नाही रे म्हणत अंश दोन्ही हात डोळ्यावरून फिरवू लागला..
तितक्यात….
“रमा मी बाहेर जाऊन येते ग…”
हे वाक्य अंशच्या कानावर पडले, आवाज परिचयाचा वाटला म्हणून …
अंशने झटकन आवाजाच्या दिशेने बघितले…
समोरून रूही येत होती…
रूहीला बघता क्षणी अंश ताडकन उभा राहिला.
पार्लरमधे अंशच्या ताडकन उभे रहाण्याने रूही चे लक्ष वेधल्या गेले आणि चालता-चालता रूही थांबली.
दोघांची नजरा-नजर झाली… दोघांचेही पहिलं प्रेम समोरा-समोर उभे होते.

स्मिता औरंगाबादकर

7 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!