धुंद-marathi stri katha

धुंद-marathi stri katha

शालीन आज विधीबरोबरचे सर्व पाश तोडून निघाला.
अवंतिकाचा फोन आल्यापासून अस्वस्थ होताच तो.काहीतरी निर्णय तर घ्यावा लागणारच होता.अशा द्विधा मनःस्थितीत किती दिवस राहायचे?
महिनाभर विचार करुन दमला होता तो.
लग्नाच्या बंधनात जिच्यासोबत अडकलो ती विधी कि यौवनाच्या धुंद वयात जिच्या प्रेमात पडलो ती अवंतिका…..
निर्णय होत नव्हता.
शेवटी बंधनावर प्रेमाने मात केली.
खूप हिंमत करुन विधीला शेवटी सगळे सांगितलेच. काॕलेजच्या पहिल्याच दिवशी त्याला आवडलेली अवंतिका, तिचे नजर लागण्यासारखे सौंदर्य ,दोघेही एकमेकांच्या प्रेमात अडकले, फायनल झाले कि नौकरी शोधून लग्न करु असे स्वप्न मनी चिंतत शिक्षण संपले. अवंतिकाला नौकरी मिळाली आणि शालीनला अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी…काय करायचे? दोघांपुढेही पेच निर्माण झाला.
अवंतिकेला वाटत होते शालीनने इथेच थांबावे.दोघेही नौकरी करु. पण शालीनला नवे क्षितिज खुणावत होते.
दोनच वर्षांची गोष्ट आहे. पट्कन जातील. आताच लग्न केले पाहिजे असे नाही.दोन वर्षांनी करु.

अवंतिकाला घरचे लोकं दोन वर्ष थांबणार नाहीत हे माहीत होते.तिने खूप प्रयत्न केला शालीनला थांबवण्याचा पण तो नाही थांबला. गेला अवंतिकाला एकटे सोडून…
दोन वर्ष गेली .काही दिवस पत्र पाठवली एकमेकांना प्रेमात चिंब झालेली.पण हळूहळू कमी होत गेले सगळे.
शालीनचे शिक्षण संपले.तिकडेच त्याला नौकरी मिळाली. अवंतिकाला बोलवून घ्यावे म्हणून प्रयत्न करायचा तो पण ती कुठे आहे? काहीही कळत नव्हते.

काॕलेजच्या मित्र मैत्रिणींकडून पण काही कळत नव्हते.
मग त्यानेही अवंतिकाला शोधायचे प्रयत्न थांंबवले.
काही दिवसातच आईवडिलांनी शोधलेल्या विधीबरोबर त्याने लग्न केले. मध्ये पंधरा वर्ष गेली. शालीन आणि विधी आता कंटाळले अमेरिकेला.विधी आई बनू शकत नव्हती. घर दोघांनाही घर खायला उठायचे.आपल्याच माणसात राहावे म्हणून परत फिरले.

इथे आल्यावर सगळे जुने मित्र ,नातलग..यांच्यात दोघेही रमले.जुने मित्र भेटले कि अवंतिका आठवून हृदयात कळ यायचीच पण आता तिला शोधून काय होणार हा विचार करुन गप्प बसायचा. पण परत आल्यापासून तिची आठवण जास्त येत होती. काॕमन मित्र भेटले कि तिचे नाव निघायचेच. असेच एका मित्राकडून ती पुण्याला राहते हे कळले. हे समजल्यापासून शालीनची अस्वस्थता वाढायला लागली.
भेटू या का एकदा? अवंतिका कशी दिसत असेल? कशी असेल? सुखी असेल माझ्याशिवाय?

शालीनच्या मनात ती होतीच. 
पंधरा वर्षात जे सापडले नाही ते एका मित्रामुळे सापडले.मित्राने त्याला अवंतिकाचा नंबर दिला.
शालीनला संध्याकाळपर्यंत धीर धरवला नाही.त्याने लगेच फोन लावला.समोरुन तोच मंजुळ आवाज.
हलो…हलो…..मी…मी अरविंद…समोर स्तब्धता…लांबूनही शालीनला जाणवली. 
शालीन- अवंतिका मी शालीन…पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज….
इकडे शालीनच्या जीवाची तडफड वाढली.
माझ्याशी न बोलता फोन ठेवला.मला पूर्णपणे विसरली असेल का? ह्याच विचारात तळमळत रात्र  काढली.
पुन्हा करु का? नको.एक दोन दिवसानंतर करेन…..
पहाटे त्याचा फोन वाजला.झोपेतच त्याने उचलला….
शालीन अवंतिका बोलतेय रे….अर्धवट झोपेत असलेला शालीन खाड्कन उठला. 
अवंतिका अग केव्हाचा शोधत होतो तुला.
ऐक ना शालीन…तुझा नंबर आहे मजजवळ आता.मीच तुला फोन करत जाईल. 
ठीक  आहे.
दोघेही बोलले बराच वेळ.
नंतर कधीही शालीनने अवंतिकाला फोन केला नाही.तीच करायची. बोलायचे अधूनमधून पण आता बोलून समाधान होत नव्हते.
अवंतिका भेटूया ना आपण.
हो रे. मी सांगते ठरवून. 
भेटले दोघेही एकमेकांना खूप दिवसांनी.
शालीन खूप मिस् केले रे मी तुला.
तू मला सोडून गेला नी आयुष्य रिकामे झाले.तुझी आठवण नको म्हणून सगळ्यांशी बंध तोडले मी.
तू बरी आहेस नं अवंतिका?
आनंदात आहेस?
हो रे.
पण तू देश सोडून नसता गेला तर याहून वेगळे राहिले असते.
हो.पण कधी कधी काही काही निर्णय घेतांना तेच बरोबर वाटतात.नंतर पश्चाताप होतो,वाईट वाटतं पण उपाय नसतो.
 
हो रे.गेले ते दिवस.
चल ,शालीन उशीर होतोय.
दोघे अधूनमधून अवंतिकाच्या मर्जीनूसार भेटत गेले.
प्रेमात तर आधीच होते आता ते प्रेम वाढत चालले होते.
शालीनला आता अवंतिकेशिवाय जास्त दिवस राहणे अशक्य आहे हे जाणवू लागले. तिच्या प्रेमाची धुंद दिवसेंदिवस चढत होती.
अवंतिका आपण कायम सोबत राहू असे नाही होऊ शकणार का?
आपले संसार मोडावे लागतील.
मला चालेल अवंतिका.
अवंतिकाही तयार झाली. विधीची समजूत घालून शालीनने सोडचिठ्ठी मिळवली.
अवंतिकानेही सोडचिठ्ठी मिळाल्याचे सांगितले.
दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा दिवस ठरवला.
शालीन तयार झाला आणि वेळेवर कोर्टात पोहचला.अकरा वाजताची वेळ होती.अकरा,साडेअकरा,बारा……घड्याळ पुढे पुढे जात राहिले. काय झाले असेल?का उशीर होतोय अवंतिकाला…..तेवढ्यात मोबाईलवर मैसेज आला…..
 
शालीन आता तुला जसे वाटतेय  अगदी तसेच तू मला सोडून गेला तेव्हा वाटले होते. अशीच घालमेल झाली होती ह्दयात.
जो मला अर्ध्या वाटेवर सोडून गेला त्याच्यासाठी मी माझा नवरा ,मुले सोडेन का…….
 
  प्रिती 
 
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
 
Email
whatsapp no,
9867408400
 
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
 
 

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

 
 
 
 
 

6 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!