१९७२ साली आलेला पहिला मराठी रंगीत चित्रपट पिंजरा.
अतिशय समर्पक नाव असलेला,दिग्गज मराठी कलाकारांची जुगलबंदी असलेला,जगदीश खेबूडकरांच्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी सजलेला चित्रपट. संगीत राम कदम यांचे.
ह्या लावणीला आवाज दिला उषा मंगेशकर यांनी.
श्रीधर मास्तर (डाॕ.लागू) आणि तमाशात लावणी गाणाऱ्या चंद्रकला (संध्या) यांचा सूडाच्या भावनेतून सुरु झालेला प्रवास.
मास्तर क्षणिक मोहामुळे पिंजऱ्यात अडकत जातात.
त्या पिंजऱ्यातून त्यांची सुटका शेवटपर्यंत होत नाही.पिंजऱ्यात त्यांना अडकवणाऱ्या चंद्रकलेच्या हातातही काही उरत नाही. मास्तरवर अपमानाचा
सुड उगवणारी चंद्रकला कायम अपराधीपणाच्या भावनेत झूरत राहते.मास्तरसारख्या देवमाणसाला मी दुःखाच्या खाईत लोटले….ही बोच तिला सलत राहते.
मास्तराने गावात तिचा तमाशाचा फड रंगू दिला नाही.अपमानीत चंद्रकलेच्या सुडाचा प्रवास ‘तुम्हांवरी केली मी मर्जी बहाल’ ह्या लावणीने सुरु होतो.
ब्रह्मचारी मास्तरने आजवर मोहावर विजय मिळवला असतो. पण चंद्रकलेला एकदा भेटायच्या मोहात खोलवर गर्तेत अडकत जातात.
तिला भेटून मास्तर जायच्या तयारीत असतात पण चंद्रकला जणू त्यांची शिकार हातून जाऊ द्यायला तयार नाही.सावज टप्प्यात आले आहे.
ती त्यांनी जाऊ नये म्हणून आर्जव सुरु करते.
तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल
तुम्हावर माझी मर्जी बसली आहे.आता थांबा जरा.इतक्यातच जाण्याची घाई करु नका.
पापण्यांची तोरणं बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते काळजातली पिर्ती
जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल
मी डोळ्यांवर तोरण बांधली आहेत.ती पण कसली? तर माझ्या ह्या अलवार पापण्यांची.
नाजूक पापण्यांची तोरणे बांधून माझ्या ह्दयातील उधळलेले प्रेम तुम्हाला माझ्या नजरेत दिसेल.
माझ्या जवळ या, आणि माझ्या काळजातलपवलेल गुपीत विचारा मला.
हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल
तुम्ही नका जाऊ.
बघा तुम्ही जाणार या कल्पनेने माझ्या काळजातील हूरहूर वाढली आहे.ही हूरहूर तुमच्या बद्दल मला वाटणाऱ्या प्रितीतून निर्माण झाली आहे.
या.माझ्या जवळ.तेव्हाच मला जाळणारा विरह संपेल आणि गुलाबी कोड्याचे उत्तर सापडेल.
लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच र्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ
मास्तर थांबा नं.
तुम्ही थांबावे म्हणून मी किती आर्जवे करावी.
तुमच्या पायाशी मला तुमच्याबद्दल वाटणारे प्रेम मी ओवाळून टाकते.ही रात अशीच राहावी तुमच्या संगतीत,तुमच्या प्रितीत पहाटेने उगवून आपल्या प्रेमात अडथळा आणू नये…..
चंद्रकलेचे विभ्रम,लडिवाळपणा मास्तरच्या संयमावर मात करतात आणि
”नको चंद्रकला….शब्दांनी आणि सूरांनी माझी वाट अडवू नकोस, या असल्या मोहानं मी नको त्या पिंजर्यात सापडेन”
हे शब्द अंधारलेल्या रातीत विरुन जातात.
मास्तरांच्या आयुष्यात आता हा अंधारच राहणार.











खुप मस्त समीक्षण प्रीती
मलाही हे गाणं खूप आवडते.
⭐⭐⭐⭐⭐
सुरेख मांडणी👌🏻👌🏻
Wahh
Sundar
खूपच छान लिहीले आहे.
Thank you
खूप मस्त ..
सुंदर
खूप मस्त लिहिले आहे ….जुन्या काळात घेऊन गेली …