पहिलं मोरपीस
पहिलं मोरपीस

पहिलं मोरपीस

पहिलं मोरपीस
आकाशने पळत जाउन ट्रेन पकडली आणि गाडीने तिसरी शिट्टी मारून रामपुर सोडले.
 कामे आटपून स्टेशनवर पोहोचायला उशीर झाल्याने तो गडबडीत जी मिळेल त्या बोगीत घुसला होता.  तिकीटावर चा बोगी आणि सीट नंबर बघितला आणि टीसी कडे चौकशी करून आकाश त्याच्या आरक्षित बोगी कडे निघाला.
त्याच्या बाजुच्या सीटवर एक तरुणी बसली होती.  तिचे लग्न झालेले होते , त्याने लगेच ताडले.  दोन्ही बाजूच्या आणि समोरच्या तीन-चार सिट रिकाम्याच होत्या. आकाशने आजुबाजूला नजर फिरवली ते पाहून मागचा एक गृहस्थ म्हणाला,
त्या रिकाम्याच राहणार आहेत. मीच रिझर्व केल्या त्या.  आम्हाला आजुबाजूला कोणी नको. तुमचं रिझर्वेशन आधीच झालेलं होतं म्हणून तुम्ही इथे आहात’.
 
 त्याच्या बोलण्यात अजिबात नरमाई नव्हती.
 आकाश आश्चर्याने बघतच राहिला.
 तो म्हणाला,
 ‘मी मल्हारराव पाटील,  ही माझी बायको मनोरमा’. 
कडक स्वभावाच्या पाटीलने मनोरमा बायको असल्याचे सांगुन , आकाशने घसट वाढवु नये, असा विचार केला असेल.
आकाशला आणखी एक धक्का बसला नवरा त्या तरुणी पेक्षा जवळपास दुप्पट वयाचा, आणि विक्षिप्त.
मनोरमाची नजर मात्र खाली खिळली होती आणि चेहर्‍यावर खिन्न उदास भाव.
 तिच्या मनात काही चलबिचल चालु असावी असं सहजच आकाशला वाटलं.
मल्हारराव पाटीलने स्वतःची ओळख करून दिली.
 त्यांचा होलसेल कपड्यांचा मोठा व्यवसाय आहे, सारंगपूर मध्ये. आजुबाजूच्या मोठ्या शहरांमध्ये त्यांच्या शाखा पण आहेत.
‘मी आकाश, इंटेरिअर डिझायनर आहे.  बहुतेक वेळा फिरतीवर असतो.  आताही मी एका ऑफिसचे इंटेरियर ठरवून वापस घरी निघालो’. 
 मनोरमाचा विचार करतच आकाशला डोळा लागला. सकाळी जाग आली तेव्हा पाटील नवरा-बायको सामान आवरून बसले होते. मनोरमाच्या चेहर्‍यावर तेच रात्रीचे भाव,  दडपणाखाली जगत असावी.
एकाच गावातले दोघेही असल्याने सहाजिकच  पाटील नी आकाशचा मोबाईल नंबर घेतला.  निघताना स्वतःचं व्हिजीटिंग कार्ड द्यायला विसरले नाही.
आकाश घरी आला,  सवयीप्रमाणे सगळे आवरलं.
आई थोडी चिडल्या सारखी दिसली.
‘ काय झाले आई ?’ 
अरे ! आता तरी लग्नाचा विचार कर रे’. 
 ‘किती दिवस तुझं करू आता ?’
‘ आई ! सुरू झालं का तुझं पुन्हा ‘.
‘ जोशी काका आले होते काल,  दोन तीन ठिकाणं सांगितली, तुझही वय वाढतंय रे आकाश ‘
 
आकाश काहीच न बोलता खोलीत निघुन गेला. पाकिटाच्या छोट्या कप्प्यातुन वसुधा चा फोटो बाहेर काढला .
 
*23 सप्टेंबर आज वसुधा चा वाढदिवस*
 
 दोन वेण्या,  मोगर्‍याचा गजरा.  वसुधा चा दहावीचा फोटो तो,  परीक्षेचा हॉल तिकीटचा.
*प्रेमाचं पहिलं मोरपीस त्या वयात फुललं होतं* . 
 
शाळेतल्या अल्लड वयापासुन आकाशला वसुधा आवडायची.  पण पुढे तीन वर्षे सोबत असुनही त्याची हिंमत झाली नाही तिला सांगायची .
 मनातल्या मनात तो तिला ‘वसु’ म्हणायचा.  साधी सालस काहीशी अबोल वसुधा त्याला पहिल्या भेटीतच आवडली होती.   मोगर्‍याच्या गजरेत त्याचं मन गुंफलं गेलं होतं आणि तिला कल्पनाही नव्हती.
 ती दिसावी म्हणुन त्याने कधीही कॉलेजला दांडी मारली नव्हती.  मोगर्‍याचा दरवळ ती आल्याची वर्दी आकाशला आधीच द्यायचा. तिचा खाली पडलेला गजरा त्याने किती दिवस सांभाळुन ठेवला होता.
त्या फोटोने खुप आठवणी जागृत केल्या होत्या त्याच्या.
कुठे असेल वसुधा ? 
 बरेच दिवस असेच निघुन गेले अधुन मधून आकाश ची आई त्याच्या लग्नाचं टुमणे लावायची.  आकाश उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून न्यायचा.
 एक दिवस ऑफिस साठी निघताना मल्हारराव पाटीलचा फोन आला.  आकाशला वाटलं नव्हतं मल्हारराव सारखा माणूस कधी त्याला फोन करेल. पाटीलने रेल्वेतली ओळख काढून विचारणा केली .  मनोरमेचा  केविलवाणा चेहरा आकाशच्या डोळ्यासमोर आला .
मल्हाररावांना घराचे इंटेरियर करायचं होतं.  आकाश सांगितल्याप्रमाणे पाटीलच्या घरी पोहोचला.
 घर कसलं प्रचंड मोठा महाल.  श्रीमंती सगळ्या वास्तु मधुन , वस्तू मधुन ओसंडून वाहत होती. जुन्या पद्धतीचे बांधकाम होते .
पण मनोरमेला कुठलेही सुख लाभलं असं वाटत नव्हतं. मल्हाररावाने बोलावल्या वरच मनोरमा चहा नाश्ता घेऊन आली .
आकाशने  सगळं घर फिरून पाहिलं.
मल्हारराव आकाश मध्ये इंटेरियरच्या कामाचा पक्क झालं .
कामामुळे त्याच्या पाटीलच्या घरच्या खेपा वाढल्या होत्या. त्याला कळत नव्हतं पण मनोरमेशी बोलणं , तिला बघणं हळुहळू आकाशला आवडु लागलं होतं.
  इतके वर्षात आकाशला असं कधीच जाणवलं नव्हतं.  वसुधा त्याच्या मनात ठाण मांडुन होती.  पण तिला
शोधायची धडपड तरी त्याने कुठे केली होती.
 आकाशला  अचानक बाहेरगावी कामासाठी तब्बल एक महिन्यासाठी जावे  लागणार होतं.  पाटीलकडचे राहिलेले कामे आल्यावर करतो सांगुन त्यांनी मल्हाररावची माफी मागितली. आणि महिन्याभरासाठी निघून गेला.
 महिन्याने आकाश वापस घरी आला.
 यावेळेस आईची चिडचिड नेहमीपेक्षा जास्त होती.
‘ आकाश ,  किती दिवस शेजारी पाजाऱ्यांनी,  नातलगांनी सांभाळायचं मला ? तु फिरतीवर असतो 
 न बोलता आकाश मल्हारराव पाटील कडे निघुन गेला.
 कामे अर्धवट राहिली होती.
 मनोरमानी दार उघडलं आणि आकाश बघतच राहिला. त्याला थोडं विचित्र वाटलं.
 मनोरमा विधवेच्या वेषात समोर आली होती .
घर सुने सुने आणि भकास वाटत होतं.
‘ पंचवीस दिवस झाले मल्हारराव हार्ट फेल होऊन गेले होते’
 
 मनोरमा पोरकी , एकटी झाली होती .
मल्हाररावांकडचे तिला फारसे नातेवाईक नव्हतेच.
 मल्हाररावांच्या विक्षिप्तपणा मुळे नातलग आणि शेजारी तिचे फारसे संबंध नव्हते.
 आकाशच्या येण्या जाण्याने ती थोडी बोलकी झाली होती. आकाशच्या मनोरमेच्या घरच्या चकरा वाढल्या होत्या. मनोरमा ही कधी नव्हे ते आकाशजवळ मल्हारराव बद्दल मोकळं बोलत होती.
‘ मल्हाररावांचा स्वभाव बाहेरच्या लोकांसाठी वेगळा आणि माझ्यासाठी वेगळा होता . ते संशयितासारखे वागत म्हणुन मीच कोणाशी अकारण संबंध ठेवले नाहीआम्हाला अपत्य पण नाही. डॉक्टरांनी मल्हाररावात दोष सांगितल्यापासुन ते त्याचा राग माझ्यावर काढीत ‘.
 हळुहळू मनोरमा मनातला मळभ दूर करत होती.
 आता तिला थोडं हलकं झाल्यासारखं वाटलं. दिवसागणिक आकाशचे येणे वाढले होते.
 *त्यात आकाशरावांचे आकाश आणि मनोरमाची रमा कधी झाली कळलेच नाही* . 
 
आईलाही आकाश मधला हा बदल जाणवल्याशिवाय राहिला नाही .
 आकाश खूष दिसतो यातच समाधान मानत होती. तरीपण ‘ वसु ‘नावाचे मोरपीस अगदी टवटवीत होते.
*23 सप्टेंबर वसुचा वाढदिवस* .
त्याने पाकिटातुन फोटो काढून त्यावर हात फिरवला. शुभेच्छा दिल्या.
 दुपारी अचानक मनोरमेचा फोन आला .
‘आकाश आज जेवायला इकडे ये,  तुझ्या आवडीचं नॉनव्हेज करते’.
 
 मनोरमा आज खूष होती.
तिने ठेवणीतली आवडीची गुलाबी रंगाची साडी नेसली होती.  मोगर्‍याचा गजरा माळला होता. हलकासा मेक-अप केला.
 मोगर्‍याचा गजरा आकाशचा वीक पॉईंट होता.
‘ काय आज स्वारी खुशीत दिसते , काय लॉटरी लागली की काय ? 
‘आज खुप दिवसांनी एका गोष्टीचा आनंद व्यक्त करावा वाटतोय ‘. 
काय विशेष ? मल्हाररावांचा खजिना सापडला की काय तुला ?’  
‘चेष्टा करू नको रे,  खरंच कारण आहे तसं. आज माझा वाढदिवस आहे ‘.
 
 आकाशचे डोळे विस्फारले .
अरे आज माझ्या एका जुन्या मैत्रिणीचा सुद्धा वाढदिवस आहे , चला दोघींचाही बर्थडे साजरा करू ‘ 
 असं म्हणुन आकाशने वसुचा फोटो बाहेर काढला.
 मनोरमाने पटकन ओढून घेतला आणि स्तब्ध झाली.
 तु ssss अजुनही विसरला नाही वसुधाला ?’
 
 आकाशचे शब्द आतल्याआत विरले.
 त्याला हा धक्का अनपेक्षित होता .
म्हणजे sssss तुला कसे माहीत , वसुधा ?
  ‘कारण मीच वसुधा आहे ‘.
 
 आकाशला हे सगळं स्वप्नवत वाटत होतं,  पण ते खरं होतं.
 पंधरा ते वीस वर्षानंतर भेटणारे ते एकमेकांना ओळखू शकले नाही .
‘ वसुधा किती बदल झाला तुझ्यात , मी मुळीच ओळखले नाही’.
 *आकाशने भलेही वसुला ओळखले नसेल पण त्याच्या हृदयाने तशी ग्वाही दिली होती* .
म्हणुन तो मनोरमेकडे आकर्षित होत होता .
 पण मनात वसुच्या आठवणीचा *मोरपिसाचा ठसा* पक्का होता .
परिस्थिती आणि अचानक घेतलेल्या आयुष्यातील वळणांनी तिचा चेहरामोहराच बदलून टाकला होता .
 दहावी झाल्यानंतर दोघे वेगळे झाले होते .
मी बारावीत असतांनाच माझे वडील वारले . आमच्यावर दुःखाचा आणि कर्जाचा डोंगर कोसळला . अशातच आईला माझ्यासाठी कोणीतरी मल्हाररावांचे स्थळ सांगितलं . मुलीला जास्त शिकवली तर पुढे लग्नाला अवघड होईल , असा आईच्या डोक्यात भरवलं . 
कधी न पाहिलेल्या श्रीमंतीला आई हुरळून गेली आणि वयातले अंतर न बघता माझं लग्न लावुन दिलं , मनाविरुद्ध. 
 इकडे मी मल्हाररावांची दुसरी बायको,  पहिलीचं नाव मनोरमा म्हणुन मी पण मनोरमा झाली . 
 भरपुर पैसा , भौतिक सुखवस्तु . पण मला काही सुख लाभलं नाही .
 
*आकाशचे लुप्त होत चाललेले मोरपीस त्याला पुन्हा सापडले होते* .
 त्याला त्याची वसु हवी होती , जी की त्याला कधी भेटली नव्हती .
 पण आता ती मल्हाररावांची विधवा होती .
आई स्वीकरेल की नाही  ??
इतक्या वर्षानंतर आकाशने आज वसुधा समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली .
 दुसऱ्या दिवशी वसुधाला घेऊन तो घरी आला, आईला दाखवायला .
‘ वसुधा ते मनोरमा ‘ चा प्रवास आकाश ने आईला सांगितला .
 ‘ अच्छा ! ही आहे का तुझ्या पॉकेट मधली वसुधा?’ 
आईने त्या दोघांना एकत्र यायला कुठलीच हरकत घेतली नाही .
आकाशला सुखी झालेले बघणे,  ही एकच इच्छा होती तिची .
*वसुधाला नवीन मोरपीस गवसले होते आणि आकाशचे मोरपिस नव्या तेजाने झळकत होते*.
         *मोहिनी राजे पाटनुरकर*

https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील कविता

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

9 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!