निमीष, ए निमीष,
गौरीनी दोन- तीन आवाज दिले, पण निमीषचं आईच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं.
खिडकीच्या बाहेर एकांतात दूरवर काहीतरी बघत बसला होता तो.
कधीकधी आवाज कानावर पडूनही तो हाकेला ‘ओ’ देत नसे. आपल्याच विश्वात मग्न. आजूबाजूला, घरात काय चालू आहे हे त्याच्या गावीही नसायचं.
निमीष आज एकोणवीस वर्षाचा तरुण, पण वर्ष झाले तो घराच्या बाहेर सुद्धा पडला नाही. ना पुस्तक वाचणे, ना टीव्ही बघणे, ना मित्रांसोबत भटकणे, स्वतःला एका खोलीत डांबून घेतलं होतं, त्यानी.निमीष असा नव्हता कधी. लहानपणापासून खेळाडू आणि अभ्यासात हुशार, शाळेतल्या सर्व शिक्षक लोकांचा आवडता विद्यार्थी.
असं काय झालं की निमीष स्वतःला हरवून बसला.निमीष गौरी- विकासचं एकुलते एक अपत्य. आणि तेही बरेच वर्षे वाट पाहून जन्माला आलेलं. म्हणूनही असेल, गौरीनी त्याला खूप जपलं, त्याची जरा जास्तच काळजी घेतली. चांगला चार पाच वर्षाचा झाला तरी गौरीनी त्याला एकट्याला कोणाच्याही हाती दिलं नव्हतं. बालवाडी सुद्धा घराच्या जवळच निवडली. ती सुटेपर्यंत बालवाडीच्या बाहेरच बसून राहायची. बालवाडीच्या बाईकडे पण त्याच्याविषयी बारीक-बारीक चौकशा करायची डबा नीट खाल्ला की नाही? तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो की नाही? कुणाशी भांडतो का? इत्यादी, इत्यादी.
कधी कधी त्या बाईपण वैतागून जायच्या प्रश्नांनी.गौरीच्या काळजीच्या छत्रातच निमीष हळूहळू मोठा होत होता. तरी गौरी त्याला जास्त बाहेर जाऊ द्यायची नाही.
बाहेरच्या वातावरणात तो आजारी पडेल किंवा चुकीच्या मुलांशी मैत्री होईल याची सतत काळजी असायची तिला. तिच्या अशा वागण्याने निमीषही चिडून म्हणायचा, ‘आता मी लहान नाही, मलाही कळतं’, पण गौरीनी काही आपलं वागणं बदललं नाही.
एकच मुलगा,सगळं लक्ष एकावरच. घरातली तिची कामे आवरली की उरलेल्या वेळात ती निमीषच्या मागेच असायची.
निमीष अभ्यासात तसा हुशारचं,पण एखाद्या परीक्षेत एखादा मार्क जरी कमी पडला तरी गौरी त्याला सतत बोलायची. पुढच्या परीक्षेत असं नाही झालं पाहिजे, म्हणायची.
निमीष अभ्यासात कधीच कमी नव्हता पण गौरी च्या सततच्या बोलण्याने, उपदेशाने, अति काळजीने, सारख्या तगाद्याने खूप वैतागला होता. गौरी स्वतःहून त्याच्या अभ्यासाकडे, अक्षरा कडे लक्ष द्यायची. अधून-मधून कोचिंग क्लासेस मध्ये जाऊन पण बघून यायची. त्यामुळे निमीष घरी आला की चिडचिड करायचा.
निमीष मॅट्रिक मध्ये 95 टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झाला. गौरी आणि विकास दोघेही खूप खुश झाले. गौरी तर एवढी खुष, की कॉलनीत घरोघरी जाऊन सांगितले आणि पेढे वाटले.दोघांनी त्याच्या पुढच्या शिक्षणाचे नियोजन सुरू केले. दोघांच्याही निमीष कडून खूप अपेक्षा होत्या. त्याला काय शिकायचं, काय करायचं हे विचारलंच नाही.
त्यांना निमीषला आयआयटी इंजिनियर करायचं होतं.
त्यानुसार त्याला पुढच्या शिक्षणासाठी कोट्याला ठेवण्याचा विचार झाला. तेही त्याला न विचारता. लहानपणापासून खूपशा गोष्टी त्याच्यावर लादल्या गेल्या होत्या. आता त्यालाही त्याची सवय झाली होती.
कोट्याला त्याला होस्टेलवर राहायचे होते. गौरीने खूप सूचना, उपदेश, सल्ले देऊन त्याची रवानगी केली.
कोट्याला तो आई वडिलांपासून दूर, एकटा असला तरी त्यांच्या अपेक्षांचं ओझं त्याचा सोबत होतं.
तिथे गेल्यावर ही मोबाइल फोनवरून विचारपूस आणि सूचना चालूच असायच्या.
नंतर नंतर तो गौरीचे फोनही कमी घ्यायचा. अभ्यासाचे, क्लासेसचे कारणे द्यायचा.
कोट्याला गेल्यावर तो एकदम मुक्त झाला. इतक्या मोकळ्या वातावरणात तो कधी जगलाच नव्हता. खूप दिवस तो असेच स्वैर जगला. अभ्यासासाठी बसला की गौरीचे बोलणे, आवाज त्याच्या कानात घुमायचा.
त्याला अभ्यास करतांना गौरीच्या बोलण्याची, सततच्या तगाद्याची सवय झाली होती.
हळूहळू त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालं, क्लासेस ला जाणं कमी झालं.
याचा परिणाम त्याच्या बारावीच्या result वर झाला, दहावीच्या टक्केवारी पेक्षा बारावीतली टक्केवारी एकदम घसरली.
गौरी दिवसभर रड रड रडली. तिला आता वाटायला लागलं की तिनी खूप त्रास दिला, जाच केला निमीषचा.
आणखी कहर म्हणजे निमीष entrance exam सुद्धा Qualify झाला नाही .
कॉलेजमधून विकासला फोन आला. बरेच दिवसात निमीषनी एकही क्लास अटेंड केला नव्हता.
निमीषचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. तो खूप डिप्रेस्ड राहायचा. विकास त्याला घेऊन वापस घरी आला. गौरीला सक्त ताकीद दिली विकासनी, ‘निमीषला असं काहीही बोलू नको की ज्यामुळे त्याला त्रास होईल’.
निमीषचं शांत राहणं गौरी आणि विकासला अस्वस्थ करत होतं.
हुशार, खेळाडू निमीषचे आयुष्य उमलण्याआधीच कोमेजलं होतं.*चूक कुणाची ????*
निमीषवर मनोविकार तज्ञाकडे उपचार सुरू केले.
गौरीनी कुठल्यातरी महाराजकडे जाऊन निमीषची जन्म कुंडली दाखवून ‘तसेही’ उपाय केले.
वर्ष सरले निमीष डिप्रेशन मधून बाहेर आलेला नव्हता.
डॉक्टरांनी गौरीला आश्वासन दिलं, थोडा वेळ लागेल पण निमीष यातून नक्की बाहेर येईल.‘निमीष ए निमीष, अरे जेवायला ये’ गौरीनी त्याला दोन-तीन आवाज दिले.
निमीष खिडकीबाहेर, एकटक दूरवर काहीतरी बघत होता……
*मोहिनी राजे पाटनुरकर*
विचारणीय
खूप छान लिहिले..
विचार करायला लावणारी कथा, खुप छान लिहिलंय
Heart touching story 🌹🌹🌹
सद्य परीस्थिती ला अनूसरून